स्वयंसेवी संस्थांचे योगदान

स्वयंसेवी संस्थांचे योगदान

  •  अनुराधा गानू
    (आल्त-सांताक्रूझ, बांबोळी)

समाजातील लोकांनी समाजातीलच गरजू, गरीब लोकांच्या मदतीसाठी चालवलेल्या संस्था म्हणजेच एनजीओ. पण त्या चालवण्यासाठी, कार्यरत ठेवण्यासाठी आपल्याच समाजातील दानशूर व्यक्तींची जितकी गरज आहे त्याहीपेक्षा जास्त गरज सेवाभावी वृत्ती असणार्‍या आणि अशा गरजू लोकांसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन तळमळीने काम करणार्‍या कार्यकर्त्यांची आहे.

एन्.जी.ओ. म्हणजे नक्की काय? तर नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच बिगर सरकारी स्वयंसेवी संस्था. समाजातल्याच काही लोकांनी समाजातल्याच लोकांच्या मदतीसाठी चालवलेली संस्था. अशा संस्थांना सरकारकडून मदत मिळत नाही, तर समाजातलेच लोक आपल्याला जमेल तसा खारीचा वाटा उचलून अशा संस्थांना आर्थिक सहाय्य करत असतात. अशा देणग्यांच्या बळावरच या संस्था चालतात. सध्या तरी अशा संस्थांचे प्रमाण वाढतेच आहे कारण आजच्या काळाची ती गरज बनली आहे. अशा संस्थांचे मुख्य काम असते ते समाजातील दीन-दुबळे-गरीब-गरजू-असहाय्य-निराधार लोकांना मदत करणे. मग ती मदत आर्थिक असेल किंवा शारीरिक किंवा मानसिकही असू शकेल. पण मदत करणं, असहाय्य लोकांना आधार देणं हा या संस्थांच्या कार्याचा मुख्य प्राण असतो, गाभा असतो.

पूर्वीच्या काळी अशा सेवाभावी संस्थांची संख्या जवळजवळ नगण्यच होती. कारण बर्‍याच वेळा एखादं मोठं कुटुंब- विशेषतः एकत्र कुटुंबच अशा स्वयंसेवी संस्थांसारखं काम करायचं. अशा कुटुंबात कोणावर कोणताही प्रसंग आला तरी एकमेकांना मदत मिळायची. अशा कुटुंबात कुणी निराधार, असहाय्य नसायचेच! जसं एखादं मोठं नावाजलेलं घराणं असेल तर त्या घरात अनेक गरजू मुलांची सोय केली जात असे. त्या काळात अशी अनेक घराणी एनजीओच होती. फक्त त्यांच्यावर एन.जी.ओ. असा शिक्का मारला जात नव्हता किंवा हे काम करणार्‍यांना ‘सोशल वर्कर’ असं नावंही मिळत नसे. शिवाय या कामासाठी सरकारकडूनही मदत मिळत नव्हती. कोकणातून वगैरे शिक्षणासाठी आलेल्या मुलांना सहज कोणीही ठेवून घेत असे.
पूर्वीच्या काळी वाडा संस्कृती होती. हा वाडा म्हणजे एक एन.जी.ओ.च असायचा. वाड्यात कोणाला कसलीही अडचण आली, कोणी आजारी पडलं तर सगळेजण त्याच्या मदतीला हजर असायचे, स्वतःचे पैसे खर्च करूनसुद्धा ही मदत केली जायची. परत त्या पैशांचा हिशोब कोणीही विचारत नसे. अशाप्रकारे एकमेकांच्या गरजेला सगळा वाडा तयार असायचा. हेसुद्धा एक सामाजिक कार्य म्हणायला हरकत नाही. फक्त त्याला एनजीओचं लेबर चिकटवलेलं नसायचं. लोकसंख्या भरमसाठ वाढली. साहजिकच वृद्ध, अनाथ मुलं, निराधार असहाय्य स्त्रिया, मतिमंद, मुकी, बहिरी मुलं यांचीही संख्या वाढली. काळ बदलला. लोकांची मानसिकता बदलली. माणुसकी हळुहळू संपत चालली. विभक्त कुटुंबपद्धती आली. घरातून लोक फ्लॅटमध्ये आले. जागेचा संकोच होऊ लागला. लहान लहान जागेत अशा माणसांना सांभाळणं अवघड होऊन गेलं आणि त्यामुळेच आत्ता प्रचलीत आहेत अशा खाजगी स्वयंसेवी संस्थांचा उदय झाला.
या संस्था जशा वेगवेगळी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून स्थापन झालेल्या आहेत तद्वतच त्यांचे कार्यसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे चालवले जाते.
साधारणतः विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात स्वयंसेवी संघटना शासनाच्या बहुविध विकासकामांत सहभागी होऊ लागल्या आहेत. समाजात जागृती व्हावी व मूलभूत हक्कांची जाणीव करून देण्यासाठी या संस्था भाषणे, चर्चासत्रे, पथनाट्ये, साहित्य, महाजालक इ. माध्यमांद्वारे लोकजागृतीची कामे करीत आहेत. त्याचप्रमाणे लोकांना असलेल्या समस्यांची जाणीव शासनाला करून देण्यासाठी त्या मोर्चे, निदर्शने, रास्ता रोको, उपोषण, घोषणा इ. मार्गांचा अवलंब करतात. समाजकल्याणाच्या दृष्टीने स्वयंसेवी संघटनांचे योगदान फार मोठे आहे, हे निर्विवाद होय.
तसेच काही संस्था वृद्धाश्रम चालवतात. काही वृद्धाश्रमांमध्ये वृद्धांना मोफत सेवा दिली जाते. त्यांच्या जेवणाखाण्याचा, राहण्याचा, औषधोपचारांचा सगळा खर्च संस्थेतर्फे केला जातो. अशा संस्थांमध्ये गरीब, निराधार किंवा गरजू वृद्धांची संख्या जास्त असते. हे वृद्ध आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात आणि त्यांची सक्षम मुलं त्यांना विचारत नाहीत. असे वृद्ध निराधार होतात. त्यांनी मग वृद्धापकाळात जायचं तरी कुठे? अशा व्यक्तींसाठी वृद्धाश्रमाशिवाय दुसरा चांगला कोणताच पर्याय उरत नाही. अशा संस्थांना सर्व थरातील लोकांकडून आर्थिक सहाय्य मिळते.

पण अशाही काही संस्था आहेत ज्या तिथे राहणार्‍या लोकांकडून काही ठरावीक रक्कम घेतात, जसे बांदिवडेचे ‘स्नेहमंदिर’. अशा आश्रमात वास्तव्य करणारे वृद्ध हे गरीब नसतात. ते आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात, पण गरजू असतात. कोणाला मुलंबाळं नसतात तर कोणाची मुलं परदेशात स्थायिक झालेली असतात. त्यांना माणसांच्या सहवासाची, म्हातारपणच्या काठीची गरज असते. अर्थात या दोन्ही प्रकारच्या आश्रमातून वृद्धांची सोय मात्र चांगली होते.

मतिमंद किंवा मुकी, बहिरी, विशेष मुलं जर घरी एकेकटीच वाढली तर त्यांच्या प्रगतीचा, विकासाचा वेग मंदावू शकतो. पण अशी अनेक मुलं जेव्हा एकत्रितरीत्या राहतात, खेळतात, वाढतात तेव्हा त्यांच्यामध्ये विलक्षण प्रगती होताना दिसते. शिवाय त्यांना शिकवणारे खास प्रशिक्षित अशी तज्ज्ञ मंडळी त्यांच्या सोबत असतील तर त्यांच्या प्रगतीचा वेग बघायलाच नको. गोव्यातील अशा संस्थांची उदाहरणं द्यायची झालीत तर म्हापशातील ‘आनंद निकेतन’ किंवा फोंड्यातील ‘लोकविश्‍वास प्रतिष्ठान’ या संस्था विशेष मुलांसाठी खूप चांगले काम करत आहेत.

आज आपण बघतो की स्त्रियांसाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक कायदे सरकार करत असते. पण त्या कायद्यांच्या अमलबजावणीबाबत सगळीकडे आनंदीआनंदच दिसतो. त्यामुळे आजच्या या आधुनिक युगातसुद्धा अत्याचाराला बळी पडणार्‍या स्त्रियांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रिया, परित्यक्ता, घटस्फोटिता किंवा प्रौढ कुमारीका अशा स्त्रियांना ना घर ना आपली माणसं! अशा निराधार महिलांनी कुठं जावं? त्यांना कोण आधार देणार? त्यांचं आयुष्य कोण सुधारणार? असे अनेक प्रश्‍न उभे राहतात. अशा अनेक महिलांसाठी अनेक स्वयंसेवी संस्था या महिलांना आधार देण्याचं काम करत आहेत.
चंगळवादी संस्कृती, नीतिमत्तेचा अभाव यातून काही बाळं जन्माला येतात. त्या बाळांना असंच कोठेतरी सोडून दिलं जातं. अशा मुलांना आईची माया मिळावी, त्यांचं संगोपन आणि संवर्धन व्हावं यासाठी सेवाभावी संस्थांनी अनेक ठिकाणी अनाथ बालकाश्रम, बालिकाश्रम सुरू करून या मुलांना आधार दिला आहे. मातृछायेसारख्या संस्था यासाठी कार्यरत आहेत.

पण या सगळ्या संस्था फक्त आश्रमच चालवतात असे नाही तर अनेक स्वयंसेवी संस्था वेगवेगळ्या प्रकारे समाजातील घटकांसाठी कार्य करीत आहेत. काही संस्था रुग्णांना गरजेनुसार वैद्यकीय उपकरणे वापरण्यासाठी किमान भाडेपट्टीवर पुरवण्याचे काम करीत आहेत तर मातृछाया संस्थेचे रुग्णाश्रय दूरवरून येणार्‍या व परत परत तपासणीसाठी येणार्‍या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची तात्पुरत्या वास्तव्याची समस्या सोडवण्याचे काम करते. काही संस्था रुग्णांच्या उपचारासाठी आणि त्यांना औषधपाणी पुरविण्याचे काम करतात. या दोन वर्षातच ‘मेक्-अ-विश्’ या संस्थेने गोव्यात आपलं कार्य सुरू केलं आहे. लहान मुलं जी काही दुर्धर रोगानं पीडित आहेत, अशा मुलांना त्यांची इच्छा होईल तशी खेळणी, कपडे वगैरे पुरविण्याचे किंवा अशी मुलं ज्या इच्छा करतील त्या सगळ्या पुरविण्याचे काम करीत आहेत… जेणेकरून त्या बालकांचे उर्वरित आयुष्य आनंदात जाईल. शिवाय हा त्यांच्यावरच्या उपचारपद्धतीचाही एक भाग आहे.

काही संस्था अशाही आहेत ज्या वृद्ध व्यक्तींना पर्यटनाचा आनंद मिळवून देण्यासाठी काम करीत आहेत. बहुतेक घरातून तरुण मंडळी कुठेकुठे फिरण्यासाठी जात असतात. पण आपल्याच घरातील वृद्ध लोकांना आपल्याबरोबर नेण्यास ते तयार नसतात. अशा वृद्ध लोकांना माफक दरात पर्यटनाचा आनंद देणारी ‘ज्ञानदीप’ प्रतिष्ठान ही एक स्वयंसेवी संस्था आहे.

अशा प्रकारच्या समाजातील लोकांनी समाजातीलच गरजू, गरीब लोकांच्या मदतीसाठी चालवलेल्या संस्था म्हणजेच एनजीओ. पण त्या चालवण्यासाठी, कार्यरत ठेवण्यासाठी आपल्याच समाजातील दानशूर व्यक्तींची जितकी गरज आहे त्याहीपेक्षा जास्त गरज सेवाभावी मानसिक वृत्ती असणार्‍या आणि अशा गरजू, गरीब लोकांसाठी स्वतःला झोकून देऊन तळमळीने काम करणार्‍या कार्यकर्त्यांची आहे. आपली संस्कृती अशी आहे की नवीन पिढीने जुन्या पिढीतील वृद्धांची, ज्येष्ठांची काळजी घ्यायची, त्यांची सेवाशुश्रुषा करायची, त्यांना मायेची ऊब द्यायची. पण आज आपल्या संस्कृतीचाच र्‍हास होताना दिसत आहे. नीतिमत्तेची घसरण चालू आहे आणि त्यामुळे अशा स्वयंसेवी संस्थांची गरज अधिकच प्रकर्षाने भासू लागली आहे. त्यासाठी वाढत्या संस्थेत आज अशा संस्था काढण्याकडे अर्थातच लोकांचा कल वाढतो आहे आणि त्यामुळे समाजातील गरजू लोकांना आधाराचे स्थान लाभते आहे.