स्वच्छतेची ऐसी तैसी

स्वच्छतेची ऐसी तैसी

–  अनुराधा गानू 
आल्त-सांताक्रूज, बांबोळी
स्वच्छतेबद्दल आधी जनजागृती करावी लागेल. स्वच्छता म्हणजे काय? अस्वच्छता म्हणजे काय? त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम काय… हे लोकांना पटवून द्यावं लागेल आणि मगच स्वच्छता अभियान राबवावं लागेल.
नुकताच केव्हातरी पेपरमध्ये पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींचा केरळच्या एका किनार्‍यावर कचर्‍याची बॅग हातात घेतलेला असा फोटो बघितला. वाटलं ७० वर्षात साठलेला कचरा ते एकटे किती स्वच्छ करणार. तरीपण गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यांनी आता स्वच्छता मोहीम चालू केलीय.
खरं म्हणजे कचरा, घाण किंवा मळ अनेक प्रकारचा असतो आणि तो काढावा तर लागतोच. स्वच्छता ही फक्त रस्त्यावरची आणि गल्ली बोळातलीच नसते, माणसाने आपलं मन, आपले विचार आणि आपलं शरीरही स्वच्छ ठेवले पाहिजे. काही माणसं कायम वाईटच विचार करतात. दुसर्‍याला, देशाला फसवून आपले खिसे भरण्याच्या भावनेचा मळ काही लोकांच्या मनात ठासून भरलेला असतो. काही काही लोक २-२ दिवस आंघोळच करत नाहीत, पर्यायाने स्वतःचं शरीरच स्वच्छ ठेवू शकत नाहीत तेथे रस्ते गल्ल्या कसे स्वच्छ ठेवणार आणि एवढी सगळी स्वच्छता एकटा माणूस किती करणार? ते जाऊ द्या.
बरेच वर्ष मी युनिव्हर्सिटीच्या रस्त्यावर सकाळच्या निवांत वेळी फिरायला जात होते. हल्ली हल्ली त्या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य झालं. अर्धा रस्ता घाण व कचर्‍याने भरलेला उरलेल्या अर्ध्या रस्त्यावर गुरं आणि कुत्री आणि त्यांनी केलेली घाण. रस्त्याच्या मधून चालावं म्हटलं तर खड्‌ड्यात पाय मुरगळण्याची भीती. शेवटी ठरवलं या दिव्यातून चालायला जाण्यापेक्षा वजन वाढलेलं परवडेल. आणि दिलं सोडून फिरणं बिरणं. आता पंचायतीने तिथे स्वच्छता केलीय म्हणून कचरा उडवायला लोकांनी आता दुसरी सोयीस्कर जागा शोधून काढलीय. बरं कॉलनीतले रस्ते स्वच्छ होते तेही कोणाला बघवले नाही. रात्री ९ वाजल्यानं तिथे अस्वच्छता अभियान चालू होते. खायचं, प्यायचं, प्लेटस्, कॅन, उष्टं तिथंच उडवायचं आणि निघून जायचं. मराठीत एक म्हण आहे. थोड्या सभ्य शब्दात सांगायचं तर ‘ज्या ताटात खायचं, त्याच ताटात घाण करायची’ असं आहे. आणि हे कोणी साधेसुधे लोक नाहीत हं, भविष्यात ज्यांच्या हातात आम्ही देश सोपवणार आहोत ते तरुण, ती नवी पिढी.
सकाळी सकाळी ताज्या स्वच्छ हवेत फिरायला जाणारे लोक जवळजवळ प्रत्येकाच्या हातात एक कचर्‍याची पिशवी असतेच. इकडे तिकडे आधी बघतात, आणि मग नाकासमोर बघून हातातली कचर्‍याची पिशवी भिरकावून देतात. पायी चालणारी ही बिचारी साधी माणसं. पण मर्सीडिजसारख्या गाडीतून काच खाली करुन कचरा भिरकावणार्‍यांची संख्याही कमी नाहीयेय. मग तो कचरा उडेल तिथे पडेल. तरी हल्ली सरकारनं म्हणजे त्या त्या गावातल्या पंचायतीने म्युनिसी पालटीनं जागोजागी मोठ मोठे कॅन ठेवलेत कचर्‍यासाठी. पण ते वेळेवर उचलत नसल्यामुळे ते कॅन ओसंडून वाहात असतात. शिवाय भिरकावलेला कचरा कॅनमध्ये पडलाय का नाही हे बघायला थांबतोय कोण?
भाजी मार्केटमध्ये जाण्याचा योग आलाय का कधी? तिथल्या बाहेरच्या भिंती बघा, खालचा अर्धा भाग पानाच्या पिचकारीने रंगीत झालेला दिसेल. वरचा अर्धा भाग मात्र स्वच्छ हं. उगीचच काय! कारण इतक्या उंचावर पिंचकारी टाकणारी माणसं किती उंच असावी लागतील. घाणीच्या प्रदूषणामुळे आरोग्य बिघडतं तेव्हा ते उपचारासाठी माणसं जातात त्या हॉस्पिटलमध्येही स्वच्छता कुठे दिसत नाही. पण गेटच्या जवळपास मात्र शेणाचं छान सारवण घातलेलं दिसत. आपल्या इथे रेल्वे स्टेशन, बस स्टॅडच्या जवळ घाणच घाण पसरलेली असते. इतकंच नव्हे तर एअर पोर्टच्या आसपासही भरपूर कचरा असतो. तो खाण्यासाठी मोठमोठे पक्षी किंवा पक्ष्यांचे थवे येतात. आणि त्यांची धडक बसली की विमानाचा ऍक्सिटडेंट होतो.
आपल्या इथे स्वच्छता अभियानाइतकंच अस्वच्छता अभियानही चालू आहे. त्यातून देवांची म्हणजे पवित्र अशा देवस्थानांची ही सुटका झालेली नाही. उत्तर भारताच्या ट्रीपला गेलो होतो. रामराज्यात म्हणजे अयोध्येला जाऊन आलो. सगळा भाग अतिशय अस्वच्छ. उघडी गटारं, सगळीकडे घाणीचे साम्राज्य. ज्या शरयू नदीमध्ये श्रीराम प्रभूंनी आत्मसमर्पण केलं, प्रभू रामांच्या पावलांच्या स्पर्शाने पवित्र झालेली नदी लोकांनी पार अपवित्र, अस्वच्छ करुन टाकलीय. नदीच्या पाण्याशी पोहोचेपर्यंत घाणीशी सामना करावाच लागला. प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीची जी अवस्था ती अवस्था श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाची- मथुरेची. गायी कुणाच्या असल्या म्हणून काय झालं स्वच्छता आणि त्या जागेचे पावित्र्य तर राखायलाच हवं ना! वाराणसी काशी विश्‍वेश्‍वराचा परिसरही असाच. नेपाळच्या पशूपती देवस्थानची स्थितीही तीच. याठिकाणी ईश्‍वरावरच्या अपार श्रद्धेने लोक दर्शनाला येतात. त्या ठिकाणची पवित्रता जपण्यासाठी तरी स्वच्छता ठेवावी की नाही? पण नाही.
आपण लोकांनी स्वच्छतेचा अर्थच असा घेतलाय की आपलं घर स्वच्छ ठेवा आणि तो कचरा दुसर्‍याच्या दारात उडवा. घाण तिथे असू द्या. म्हणून म्हटलं स्वच्छतेबद्दल आधी जनजागृती करावी लागेल. स्वच्छता म्हणजे काय? अस्वच्छता म्हणजे काय? त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम काय… हे लोकांना पटवून द्यावं लागेल आणि मगच स्वच्छता अभियान राबवावं लागेल. पण जेव्हा माणसं मन, विचार आणि शरीराने स्वच्छ होतील. त्यासाठी वेगळ्या अभियानाची गरच भासणार नाही.