स्मिथने दाखवला इंग्लंडला इंगा!

>> ८ बाद १२२ वरून ऑस्ट्रेलियाची मजल २८४ पर्यंत

ऍशेस कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिला दिवस ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथने गाजवला. संकटमोचनाची भूमिका पार पाडताना स्मिथने संघाला २८४ धावांपर्यंत पोहोचवत १४४ धावांची धीरोदात्त खेळी केली.
संघ ८ बाद १२२ असा चाचपडत असताना तळातील दोन खेळाडूंनी हाताशी धरून स्मिथने इंग्लंडच्या तोंडाला फेस आणला.

नाणेफेकीचा कौल जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कांगारूंनी मिचेल स्टार्क व जोश हेझलवूड यांना बाहेर बसवत पीटर सिडल व जेम्स पॅटिन्सन यांचा संघात समावेश केला. कांगारूंच्या डावाची सुरुवात भयावह झाली. भरवशाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर केवळ २ धावा करून माघारी परतला. ‘रिव्ह्यू’चा वापर केला असता तर त्याला आपली विकेट राखणे शक्य झाले असते. बॅन्क्रॉफ्ट व ख्वाजा यांनादेखील प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे पाहुणा संघ ३ बाद ३५ अशा संकटात सापडला. स्मिथने यानंतर ट्रेव्हिस हेड (३५) याच्यासह चौथ्या गड्यासाठी ६४ धावांची भागीदारी केली.

संघाचे शतक फलकावर लागण्यापूर्वीच हेड माघारी परतला. या विकेटनंतर कांगारूंच्या डावाला गळती लागली. ३ बाद ९९ अशा स्थितीतून त्यांची ८ बाद १२२ अशी केविलवाणी स्थिती झाली. स्मिथ एका बाजूने नांगर टाकून उभा असताना दुसर्‍या टोकाने केवळ हजेरी लावण्याचे काम फलंदाजांनी केले. पीडर सिडल (४४) याने स्मिथला चांगली साथ दिली.

या द्वयीने नवव्या गड्यासाठी ८८ धावांची भागीदारी रचत संघाला दोनशेपार नेले. स्मिथने यानंतर नॅथन लायन (१२) याला सोबतीला घेत शेवटच्या गड्यासाठी ७४ धावा जोडल्या. या दरम्यान त्याने आपले २४वे कसोटी शतक पूर्ण केले. आपली शतकी खेळी त्याने १६ चौकार व २ षटकारांनी सजवली. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉड सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ८६ धावांत पाच गडी बाद केले. कसोटीच्या एका डावात पाच किंवा जास्त बळी घेण्याची त्याची ही १७वी वेळ ठरली.

धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डावः कॅमेरून बॅन्क्रॉफ्ट झे. रुट गो. ब्रॉड ८, डेव्हिड वॉर्नर पायचीत गो. ब्रॉड २, उस्मान ख्वाजा झे. बॅअरस्टोव गो. वोक्स १३, स्टीव स्मिथ त्रि. गो. ब्रॉड १४४, ट्रेव्हिस हेड पायचीत गो. वोक्स ३५, मॅथ्यू वेड पायचीत गो. वोक्स १, टिम पेन झे. बर्न्स गो. ब्रॉड ५, जेम्स पॅटिन्सन पायचीत गो. ब्रॉड ०, पॅट कमिन्स पायचीत गो. स्टोक्स ५, पीटर सिडल झे. बटलर गो. अली ४४, नॅथन लायन नाबाद १२, अवांतर १५, एकूण ८०.४ षटकांत सर्वबाद २८४
गोलंदाजी ः जेम्स अँडरसन ४-३-१-०, स्टुअर्ट ब्रॉड २२.४-४-८६-५, ख्रिस वोक्स २१-२-५८-३, बेन स्टोक्स १८-१-७७-१, मोईन अली १३-३-४२-१, ज्यो डेन्ली २-१-७-०
इंग्लंड पहिला डाव ः रॉरी बर्न्स नाबाद ४, जेसन रॉय नाबाद ६, अवांतर ०, एकूण २ षटकांत बिनबाद १०
गोलंदाजी ः पॅट कमिन्स १-०-३-०, जेम्स पॅटिन्सन १-०-७-०

जेम्स अँडरसन जायबंदी
इंग्लंडचा ३७ वर्षीय स्विंग गोलंदाज जेम्स अँडरसन जायबंदी झाला आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात केवळ चार षटके गोलंदाजी केल्यानंतर त्याने मैदान सोडले. पोटरीचा स्नायू दुखावल्यामु्‌ळे त्याने पुढे गोलंदाजी केली नाही. त्याच्या दुखापतीबाबत इंग्लंड संघाने अजून अधिकृत काहीही जाहीर केलेले नाही.