स्मिथचे ऑनलाईन क्रिकेट प्रशिक्षण

आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल असलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ टाकला आहे. या व्हिडिओद्वारे त्याने नवोदितांना क्रिकेटमधील काही फटके खेळण्याची पद्धत दाखवली आहे. स्मिथने त्याच्या पहिल्या ऑनलाईन क्लासमध्ये क्रिकेट शिकणार्‍या खेळाडूंना ड्राईव्ह करण्याची योग्य पद्धत सांगितली. त्याचबरोबर चेंडूचा स्विंग कसा ओळखायचा आणि त्यावेळी कशा प्रकारे ड्राईव्ह करावे हेही त्याने सांगितले. ३० वर्षांच्या स्मिथने ३ मिनिटाचा हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. त्यासोबत कॅप्शन देत त्याने लिहिले आहे की, मला खूप लोकांनी फलंदाजीच्या काही टिप्स देण्यास सांगितले होते. हा व्हिडिओ मी ज्याला पहिली अधिकृत स्विंग मानतो त्यावरील आहे. मी काही दिवसात फलंदाजीच्या दुसर्‍या स्विंगची पद्धत देखील शेअर करेन. तुम्हाला काय बघायचे आहे ते सांगा.’

स्मिथने या व्हिडिओत ‘ड्राईव्ह’ फटका कसा खेळायचा. यासाठी पायांच्या योग्य हालचाल कशी करायची. याबरोबरच स्मिथने ड्राईव्हचा हा फटका खेळताना वेगवेगळ्या तर्‍हेने दोन्ही हातांचा कसा खुबीने वापर करायचा याचे ज्ञान दिले आहे. स्मिथला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्येही गणले जाते. तो त्याच्या दमदार फलंदाजीने गोलंदाजांना चिंतेत टाकत असतो. मात्र, आनंदाची गोष्ट ही आहे की, हाच फलंदाज आता त्याच्या फलंदाजी शैलीचे सर्वांना ऑनलाईन प्रशिक्षण देत आहे.