ब्रेकिंग न्यूज़

स्मितें जयाचीं चैतन्यफुलें

  •  सोमनाथ कोमरपंत, मडगाव

‘अक्षय कविता बाकीबाबांची’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन आज १९ रोजी सायंकाळी ५.३० वा. पणजीत इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभागृहात होणार आहे. यावेळी अध्यक्ष पद्मश्री सुरेश आमोणकर असतील, तर प्रमुख वक्ते प्रा. अनिल सामंत (अध्यक्ष गोवा मराठी अकादमी). तद्नंतर अनन्वय फाउंडेशनतर्फे ‘बाकीबाब’ ह्या त्यांच्या जीवनकाव्यावर आधारित कार्यक्रम डॉ. माधवी वैद्य सादर करतील. या कार्यक्रमानिमित्ताने बाकीबाबांविषयी-

मराठी कविकुलातील एक श्रेष्ठ कवी म्हणून बा. भ. बोरकर यांची कीर्ती सर्वदूर पसरलेली आहे. त्यांच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, त्यांच्या नितांत मधुर कवितेची मोहिनी जनमानसात तिळमात्रही कमी झालेली नाही. वेलीवर सहजतेने फुले फुलावीत तशा त्यांच्या अंतरंगातून स्फुरलेल्या कविता पुनःपुन्हा आठविल्या जातात, आळविल्या जातात. ‘विसरूं म्हणत विसरेना’ असा हा आनंदानुभव आहे. या रसिकप्रियतेचे रहस्य काय असेल बरे? एक तर गोमंतभूमीसारख्या निसर्ग-लावण्याचे वरदान लाभलेल्या प्रदेशाचे तितकेच लावण्यमय प्रतिरूप बोरकरांच्या कवितेत अनुभवायला मिळते. ‘प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट’ असे गदिमांनी उद्गार काढले आहेत, ते काही खोटे नाहीत. बोरकरांची पर्जन्यसूक्ते हा मराठी काव्यशारदेचा अनुपमेय अलंकार आहे. निसर्गानुभूती आणि प्रेमानुभूती यांची गळामिठी जिथे पडलेली आहे ती कविता वाचणे हा एक आनंदयोग आहे. या दोहोंमधील सीमारेषा निश्‍चित करणे ही कठीण बाब आहे. यांमधील अद्वैत अनुभवणे हाच खरा आल्हाद आहे. ऐंद्रिय अनुभूतींच्या पलीकडे जाऊन अतींद्रिय सौख्य प्राप्त करून देण्याचे ब्रीद ज्ञानदेवांनी आपल्या समर्थ शब्दकळेतून बाळगले. पूर्वसूरींमधील नेमके हेच अंतःसूत्र बा.भ. बोरकरांनी पकडले. ज्ञानदेवांचा सौंदर्यविलास आणि तुकारामांच्या अभंगातील आशयसामर्थ्य हा त्यांच्या अभिमानाचा विषय. संवेदनक्षम वयापासून त्यांच्या अंतःश्रुतींनी दोहोंमधील सत्त्व शोषून घेतले. आपल्या कवित्वशक्तीचा शोध बोरकरांना फार लवकर लागला. स्वयंप्रेरणेने आणि स्वप्रयत्नांनी त्यांनी हा वेल वाढविला. अत्यंत निगुतीने आयुष्यभर जपला. अंतःप्रेरणेने शब्दशिल्प घडविताना या कविमनाची धारणा कोणती होती?
शारदेच्या झुंबराचे शब्द अद्भुत लोलक…
सशक्त सौंदर्यवादाची धारा ज्यांच्या आत्मशक्तीने पाच दशकांहून अधिक काळ आपल्या कवितेद्वारा पुढे नेली, अशा बा.भ. बोरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे कोणकोणते पैलू अधोरेखित करावेत?
एका बोरकरांमध्ये अनेक बोरकर सामावलेले होते. उत्तम कवी म्हणून त्यांची गणना मराठी काव्यविश्‍वात तरुण वयातच झाली होती. बोरीच्या नितांत रमणीय निसर्गाच्या परिसरात वाढलेले, घरात सात पिढ्यांपासून चालत आलेल्या भजनी परंपरेतून प्रेरणा घेणारे, केशवसुत, बी, ना. वा. टिळक, बालकवी, विनायक, दत्त व गोविंदाग्रज यांच्या कवितेचे परिशीलन करणारे आणि समकालीन कवींच्या रचनेविषयी ममत्व बाळगणारे बोरकर, रामायण-महाभारत या आर्ष महाकाव्यांवर तसेच कालिदास, भास, भवभूती इत्यादींच्या अभिजात वाङ्‌मयावर निस्सीम प्रेम करणारे बोरकर, रवींद्रनाथ टागोर आणि अरविंद घोष यांच्या प्रतिभाधर्माशी संवाद साधणारे बोरकर, शिक्षक बोरकर, कथाकार बोरकर, कादंबरीकार बोरकर, ललित निबंधकार बोरकर, चरित्रलेखक बोरकर आणि अनुवादक बोरकर अशा प्रतिभेच्या अनेकविध रूपकळा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सामावलेल्या होत्या. या प्रत्येक पैलूचे तेज निराळे होते. प्रत्येकात वैशिष्ट्यपूर्णता होती. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कवित्वशक्तीचा जो अक्षय साठा होता, तो या सर्व शक्तींवर मात करणारा होता. असे हे कवितारूपाने कवीचे जगणे भाग्याचे होते. ते बाळकृष्ण भगवंत बोरकर या प्रतिभावंताला लाभले. शतकातून एखाद्या कवीला ते लाभत असते. ते एका परीने त्या प्रदेशाच्या भावसंचिताचे देणे असते. म्हणून त्या प्रदेशाला अशा प्रतिभावंताविषयी अभिमान वाटतो. त्याच्याविषयीची ममत्वाची भावना सतत अंतःकरणात वास करीत असते. पूर्वसूरींनी अशा प्रतिभावंताविषयी म्हणून ठेवलेले आहे ः
जयन्ति ते सुकृतिनः रससिद्धाः कवीश्‍वराः |
नास्ति येषां यशः काये जरामरणजं भयम् ॥
बा.भ. बोरकर कविता करत नव्हते. कविता त्यांना होत होती. त्यांच्याकडे चित्रकाराची दृष्टी होती. ते स्वतः कुशल चित्रकार होते. त्यांच्या घरात त्यांच्या वडिलांनी निगुतीने व रसिकतेने जपलेली राजा रविवर्मा या नामवंत चित्रकाराची चित्रे होती. त्या चित्रातील पौराणिक संदर्भ बोरकरांना ज्ञात होते. संगीतकलेशीे त्यांचे नाते होते. शब्दांमधील अंतःसंगीत ते जाणून होते. त्यांच्या कवितेतील शब्दकळा आणि लय हे सारे सांगून जाते. ‘जीवन-संगीत’, ‘आनंदभैरवी’, ‘चित्रवीणा’ आणि ‘गितार’ ही त्यांच्या कवितासंग्रहाची शीर्षके त्यांचे संगीतप्रेम सुचवितात.
नितांत रमणीय सृष्टीची रूपकळा घेऊन आलेली बा. भ. बोरकरांची रसप्रसन्न कविता हा ऋतू्‌ंचा अष्टौप्रहर चाललेला लावण्यमहोत्सव होता. ही चित्कळा अम्लान स्वरूपाची. रसिकांची चित्तवृत्ती तिच्यामुळे फुलून येते, बहरून येते. या कवितेच्या वाचनाने होणार्‍या आनंदाचे वर्णन त्यांच्याच कवितेतील शब्दांनी करावे लागेल. चांदणकाळी आंदणवेळ…
माणसाच्या लौकिक जीवनातील दुःखे नाहीशी करून अपार्थिव क्षितिजाकडे नेणारी बोरकरांची कविता. त्यांच्या अमोघ वाणीचा ओघ प्रपातासारखाच…. अविरत वर्षाव करणारा… हृदयात आनंदोर्मी निर्माण करणारा. जीवनाच्या समग्रतेला भिडणारे बोरकर जेव्हा अनुभवाचे बोल काव्यात्म पातळीवर नेतात तेव्हा सामान्य माणसाला जीवनातील तापत्रय विसरायला लावतात. उदा.
… जळल्यावांचुन नाही ज्योती कढल्यावाचुन नाहीं मोती…
प्रपंचविज्ञान त्यांनी किती जाणीवपूर्वकतेने समजून घेतले होते हे त्यांच्या प्रगल्भ जीवनविषयक दृष्टिकोनातून प्रत्ययास येते.
लौकिक जग आणि अलौकिक सृष्टी, अनुरक्ती आणि विरक्ती या सार्‍या जीवनवृत्तींचे आत्मभान असलेला गतपिढीतील हा मोठा प्रज्ञावंत कवी. त्यांच्या कवितेविषयी आणि त्यांच्या समग्र जीवनचरित्राकडे न्याहाळून पाहताना विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात जन्मलेला आणि ऐंशीच्या दशकात या जगाचा निरोप घेतलेला हा मोठा माणूस. गांधीजींसारख्या महामानवाच्या चरित्राविषयी त्यांना निरतिशय आकर्षण. ‘महात्मायन’ त्यांनी लिहिले नसेल, पण ‘महात्मायन’ त्यांच्या हृदयांतरी होते.
बा.भ. बोरकर हे कुटुंबातील ज्येष्ठ. वडिलांच्या मृत्यूनंतर कौटुंबिक जबाबदारी ते समर्थतेने पेलत होते. त्यांचे अध्यापनाचे कार्य मोठ्या निष्ठेने चालले होते. गोव्याच्या पारतंत्र्याचे दुःख त्यांना सतत सलत होते. या उपेक्षिता ऊर्मिलेच्या दुःखकळा त्यांच्या कवितेतून व्यक्त होत होत्या. १८ जून १९४६ रोजी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोमंतकाच्या मुक्तिसंग्रामाचे रणशिंग फुंकले. गोमंतकीय तरुण-तरुणींनी त्याला योग्य तो प्रतिसाद दिला. डॉ. लोहियांच्या हाकेला ओ देण्यासाठी सारेजण पुढे सरसावले. त्या दिव्य क्षणाची स्पंदने बा.भ. बोरकरांच्या ‘स्वातंत्र्याची सिंहगर्जना’ या कवितेतून प्रभावी शब्दांत व्यक्त झाली. एवढेच नव्हे तर ऐन तारुण्याच्या नव्हाळीत कौटुंबिक जबाबदार्‍या असूनही गोव्याच्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी उडी घेतली. त्यांच्या कवित्वशक्तीइतकेच त्यांनी टाकलेले हे कृतीशील पाऊल उल्लेखनीय. बोरकरांनी राष्ट्रभक्ती व्यक्त करणार्‍या कविता लिहिल्या. गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम जागता रहावा म्हणून मराठीतून आणि कोकणीतून काव्यरचना केली. महात्मा गांधींची महत्ता अधोरेखित करणार्‍या काही कविता लिहिल्या. बोरकरांच्या काव्यधारेतील हीदेखील महत्त्वपूर्ण धारा आहे, हे नमूद करावेसे वाटते.
बोरकरांच्या प्रेमकविता हा स्वतंत्र विवेचनाचा विषय आहे. त्यांनी शारीरमानस प्रीतिभावना व्यक्त करणार्‍या उत्कट कविता लिहिल्या. प्रीतीचे विभ्रम प्रकट करताना त्यांनी विमुक्त वृत्तीने लिहिले, पण अभिरुचिसंपन्नतेचे भान कुठेही सुटू दिले नाही. त्यांच्या प्रतिमाविश्‍वात अनेक पौराणिक संदर्भ येतात. त्यामुळे या कवितांना अभिजाततेचे लेणे प्राप्त होते. पाश्‍चात्त्य कवितेचे परिशीलन त्यांनी केले होते, पण त्यांची कविता पूर्णतः पाश्‍चात्त्य वळणाची होत नाही. त्यातील आधुनिकतेचा अंतःसूर तेवढा ते स्वीकारतात. जुन्या-नव्या कवितेच्या संगमावरील ही वैशिष्ट्यपूर्ण कविता आहे. पुन्हा ती बोरकरस्पर्शाची कविता आहे.

प्रेमभावनेच्या अनेक परी त्यांनी रंगविल्या. त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या भा.रा. तांबे यांच्याप्रमाणे तृप्त सहजीवनाविषयीच्या कविताही त्यांनी लिहिल्या. प्रेमानुभूतीतील शृंगारानुकूलता हादेखील बोरकरांच्या प्रेमकवितेतील गुणविशेष होय. ‘करि सुंदरी स्वरशृंगार’ ‘कशी तुज समजावुं सांग’, ‘रोइं सखी’, ‘तुझी माझी प्र्रीत’, ‘सायुज्यमुक्ति’, ‘क्षणभंगुर जरि जीवन’, ‘जपानी रमलाची रात्र’, ‘प्रणयमुग्धेस’, ‘आपण दोघें लहरी ग’, ‘पाठमोरी पौर्णिमा’, ‘तुझे आगमन’, ‘धांवा ऐकून’, ‘घरांतले चांदणे’, ‘सखि ये गे’, ‘प्रीती तुझी’, ‘नकोस पाहुं वळून’, ‘उर्वशीच तू जाया’, ‘गृहलक्ष्मीस’, ‘स्पर्श’, ‘सजवुं कार्तिक मास’, ‘स्मृति’, ‘छेड अशीच शरीरसतार’, ‘तुझ्याजवळी’, ‘डोळे तुझे बदामी’, ‘माझी बेगम’, ‘माझ्यापरी’, ‘आगीचे पाखरूं’, ‘तुला पाहताना’, ‘सायुज्य’, ‘कोठेतरी सांग खुळे!’, ‘मानिनीस’, ‘बारा मास एका क्षणी’, ‘डाळिंबीची डहाळीशी’, ‘मी नंदाघरची बावडी ग’, ‘मीलनक्षेत्र’, ‘मृदु मद गति ती येते तेव्हा’ आणि ‘विरले सगळे सूर’ अशा कितीतरी प्रेमकवितांमधून बोरकरांनी प्रीतिविभ्रमांची चित्रे रेखाटली आहेत. ‘तव नयनांचे दल’ या प्रेमकवितेत भावकोमल स्वरांत कवी उद्गारतात.. तव नयनांचे दल हललें ग
‘क्षितिजी आलें भरतें ग’ या कवितेत ः झाले ते नयन तुझे दोन निळीशार फुले यातील ‘निळीशार फुले’ ही प्रतिमा नितांतरमणीय वाटते. तसेच ः …. रातराणि! श्‍वास तुझे झाले सुकुमार गंध
यातील गंधसंवेदना…… ओझरता स्पर्श तुझा गमली जणुं गार वीज यातील स्पर्शसंवेदना आणि …. नखशिखान्त रुणझुणली… यातील नादसंवेदना यांच्या साहचर्याने प्रियकराच्या मनातील प्रेमभावनेची कमान उंचावत नेली आहे.
परिणत वयात बोरकरांची प्रेमकविता प्रगल्भ होत गेली. या परिपक्वतेच्या खुणा त्यांच्या ‘कांचनसंध्या या कवितासंग्रहातील ‘विरहुली’, ‘चांदण्यात पारिजात माझ्या’, ‘क्षितिज’, ‘कधी कधी’, ‘वीस वर्षानंतर’, ‘तुझीच हांक अंतरी’, ‘याच नव्या डोहाकाठी’, ‘तुझ्या रानांत रे’, ‘चालीमधली वीज कुठे ती?’, ‘तूं सखी गे ऐस राणी’ ‘नाते’, ‘तूं सङाणी’, ‘गीत माझें गायलो मी’, ‘ती तुझी स्मितरेघ’, ‘जल-द तलावाकाठी’, ‘सांत्वन’ आणि ‘समुद्र बिलोरी ऐना’ या कवितांत आढळतात. प्रीतीचे आल्हाददायी चांदणे या कवितांत आढळते.

बोरकरांच्या जीवनदृष्टीत ‘सारेच जीवन आनंदाचे गान’ हा मूलमंत्र दिसून येतो. जशी दृष्टी तशी सृष्टी. त्यामुळे लौकिक सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन आपल्या काव्यसाधनेत निरामयतेचा प्रवास करण्याची असामान्य प्रेरणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. आयुष्यभर आनंदाचे आकंठ पान केल्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळीदेखील निराशेचा तवंग त्यांनी मनावर येऊ दिला नाही. त्यांच्या कवितेत जसे अनुरक्तीचे विभ्रम आढळतात तसेच विरक्तीचे सूरही आढळतात. ‘कांचनसंध्या’ या त्यांच्या कवितासंग्रहात ‘भाळविती अजुन रंग’, ‘आता माझा हात रिकामा’, ‘माझ्या मावळत्या उन्हा’, ‘याच निळ्या डोहाकाठी’ आणि ‘विसाव्याचे क्षण’ या कवितांमधील आशयसूत्रांमधून सकारात्मक अनुभूती आढळते. त्यांच्या मृत्यूनंतर संपादित केलेल्या ‘कैवल्याचे झाड’ या कवितासंग्रहात विरक्तिविषयक कविता आहेत. त्यांतील काही कवितांत निरवानिरवीची भाषा असली तरी सार्थपणे जगलेल्या जीवनाचे रंगतरंग आहेत. पुढील काळाची त्यामुळे त्यांना चिंता वाटत नाही. ‘काही अभंग’ या कवितेत बा.भ. बोरकर म्हणतात ः
आयुष्याची आता झाली उजवण,
येतो तो तो क्षण अमृताचा…
आयुष्याच्या उत्तरकालात बोरकरांनी ‘तमःस्तोत्र’ लिहिले. तिमिराच्या अंतरंगात त्यांना प्रकाशाची अनंत वलये दिसतात. त्यांचे हे प्रातिभ सामर्थ्य लोकविलक्षण मानायला हवे. ‘चिन्मयी’मध्ये परतीच्या वाटेवरचा प्रवास असला तरी त्यातील भावानुभूतीचे रंग न्याहाळले तर त्याचे सौंदर्यासक्त मन शेवटपर्यंत ताजे टवटवीत राहिले याचा प्रत्यय येतो. उदासी हा शाप नसून ते वरदानच आहे अशी कवीची धारणा आहे.
विरक्तीची भावना व्यक्त करतानादेखील आनंदानुभूतीचे रंग सामावून घ्यावेत ते बा.भ. बोरकरांनीच. ‘विझवून दीप सारे’ या कवितेत तिचा परमोच्च बिंदू साधलेला आहे ः विझवून दीप सारे मी चाललो निजाया. बोरकरांची काव्यप्रतिभा अशी विविधरूपिणी. मानवी जीवनातील सुख-दुःखाची, हर्षामर्शाची, हर्षोल्हासाच्या विविध रंगच्छटांची, अनेकविध विभ्रमांची, सृष्टीच्या अणुरेणूंशी एकतान होऊन नर्तन करणार्‍या संवेदनशील मनाची. या वृत्तीतून अवतरलेल्या अम्लान अशा पर्जन्यसूक्तांचा उल्लेख केल्याशिवाय त्यांच्या कवितेतील भाववृत्तींचा आलेख पूर्ण होणार नाही. पर्जन्याच्या अनंत रूपकळा बोरकरांनी गोमंतभूमीत अनिमिष नेत्रांनी न्याहाळल्या. त्याची एकेक सर त्यांच्या तनामनात पाझरू लागली. ‘जलद भरुनि आले’, ‘घन बरसे रे’, ‘झाले हवेचेंच दही’ इत्यादी कवितांतून पर्जन्याची नितांत रमणीय चित्रे आढळतात. बोरकरांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती, उत्तुंग कल्पनाविलास, शब्दकळेचे सौंदर्य आणि समृद्ध प्रतिमासृष्टी या गुणवैशिष्ट्यांचा येथे प्रत्यय येतो. बोरकरांच्या कवितेत जशी पावसाची चित्रे आढळतात, त्याचप्रमाणे येथील समृद्ध परिसराचे वैभव ते साकार करतात. कुळागर त्यांना प्रिय आहे. त्यातील तपशील हे केवळ तपशील वाटत नाहीत. रंगगंधाने विनटलेल्या सृष्टीची ती मनोहर चित्रे आहेत. येथे कधी कधी सोनचाफ्याची फुले सांडतात. फणसांत लोण्याची मोहळे घमघमतात. आंब्यात संध्यारंग खुलतात. त्यावर खारीची मुखनक्षी उमललेली असते. बोरीचा नितांत रमणीय परिसर हा हिरव्यागार कुळागारांनी संपन्न झालेला आहे. अशा निसर्गाच्या कुशीत या कवीची जडणघडण झालेली आहे. निसर्गाचे रंग त्याने पिऊन घेतलेले आहेत. त्यातूनच त्यांची सुकुमार शब्दकळा आणि प्रतिमासृष्टी साकार झाली आहे.
बा.भ. बोरकरांच्या कवितेची मोहिनी रसिकांवर पडलेली आहे. अभ्यासकांवरही ती पडलेली आहे. त्यांच्या कवितेची आजवर रसडोळस वृत्तीने केलेली समीक्षा ही त्या ममत्वाची खूण आहे. प्रा. एस.एस. नाडकर्णी यांनी ‘बोरकर-काव्यसमीक्षा (१९३७ ते २००८)’ या शीर्षकाखाली विवेचक प्रस्तावनेसह तिचे संकलन केले आहे. ‘बोरकरांची कविता’, ‘चांदणवेल’, ‘बोरकरांची प्रेमकविता’ व ‘कैवल्याचे झाड’ यांसारखी त्यांच्या कवितांची विविधांगी संकलने झाली आहेत. कितीतरी विशेषांक त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने प्रसिद्ध झाले आहेत. तरीही त्यांच्याविषयी अनेकांना अनेक गोष्टी सांगाव्याशा वाटतात. अधोरेखित कराव्याशा वाटतात. त्यांची कन्या मुक्ता आगशीकर यांनाही आपल्या आबांचा हा मौल्यवान आणि नवोन्मेषशाली कवितांचा नजराणा नवनीतरूपाने ठेवावासा वाटला. बदलत्या अभिरुचीच्या काळात बोरकरांचे अक्षयधन रसिकांपर्यंत जावे हे उद्दिष्ट मनाशी बाळगून त्यांनी केलेला हा प्रयत्न आहे. या कवितांबरोबरच त्यांना काव्यनिर्मितीविषयी आणि समग्रतेने वाङ्‌मयीन संस्कृतीविषयी चिंतन प्रकट करणारी भाषणे त्यांना येथे द्यावीशी वाटली. ‘सत्यकथा’मध्ये प्रसिद्ध झालेल्या पण अलक्षित राहिलेल्या सहा कविता प्रसिद्ध कराव्याशा वाटल्या. नव्या पिढीच्या रसिकांसमोर हा महत्त्वाचा दस्तऐवज मुक्ता अगशीकरांनी ठेवलेला आहे.

बाकीबाब ः मूर्तिमंत चैतन्य
कवी बा. भ. बोरकर ऊर्फ बाकीबाब म्हटल्याबरोबर मूर्तिमंत चैतन्य व सदा हसतमुख असलेली रूपकळा आठवते. कितीही तापत्रय सोसले तरी त्यांनी त्यांच्या कवितेवर वा व्यक्तिमत्त्वावर त्यांनी त्याचा ठसा उमटू दिला नाही.

काट्यांतूनि चाललो तिथे हा उमले कुसुमित पंथ… असे उद्गार त्यांनी काढले. काटे वाट्याला येणे हे प्रत्येकाचे भागध्येय, पण त्याची पर्वा न करता त्यांनी रसिकांना आपल्या अम्लान कवितांनी पाच दशके आनंद दिला. निसर्ग हा त्यांचा लहानपणीचा प्रिय सखा. त्याच्या प्रत्येक रूपकळेत त्यांना कवितेचा छंद गवसला. सहजता, रम्य कल्पकता, कोमल भावगर्भिता, सौंदर्याची ओढ व तिला मिळालेली उदात्ततेची जोड ह्याचा पंचसंगम त्यांच्या कवितेत आढळून येतो. १९३५ ते १९४५ हा कालखंड हा बोरकर – कुसुमाग्रजांचा… हे विधान ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकरांनी केले. एखादे दशक गाजवणारे कवी, लेखक पुढे जाऊन तितकेच प्रभावशाली राहतात, असे होत नाही. पण बोरकरांच्या बाबतीत तसे घडले नाही. अखेरपर्यंत म्हणजे त्यांची शेवटची कविता ‘तमःस्तोत्र’ पाहिल्यास त्याचा प्रत्यय येऊ शकतो.

गोव्यासारखा सृष्टीवैभव लाभलेला प्रदेश व त्यात बोरीसारख्या नितांत रमणीय गावात बालपण गेल्यामुळे त्यांनी ही निसर्गचित्रे शब्दकळेद्वारा टिपली. पावसाच्या अनंत रूपकळा त्यांनी अपूर्वाइने अनुभवल्या. कितीतरी कवितांमधून पावसाच्या भावमुद्रा चिरबद्ध करून ठेवल्या. त्याखेरीज त्यांनी सामाजिक जाणिवेच्या आध्यात्मिक, विरक्तीपर, अभंग अशा कविता लिहिल्या. त्यांच्या ह्या सर्व कविता मराठी कवितेचे अक्षय्य लेणे बनून राहिल्या आहेत. जितक्या वेळेला त्यांची कविता वाचू, तितक्या वेळेला कवी बोरकर नव्याने उलगडत जातात. कवी बोरकरांनी सगळे साहित्य प्रकार हाताळले. कथा, निबंध, ललित लेखन, कादंबरी, अनुवाद लेख. पण त्यांना कवी म्हणून घेण्यात जास्त आनंद होता. म्हणून ‘अक्षय कविता बाकीबाबांची’ – हे कॉफी टेबल पुस्तक प्रकाशन आज सायंकाळी साडेपाच वाजता इशा प्रकाशन व इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा यांच्या सहयोगाने करण्यात येणार आहे. अध्यक्ष पद्मश्री सुरेश आमोणकर. प्रमुख वक्ता प्रा. अनिल सामंत – अध्यक्ष गोवा मराठी अकादमी. तद्नंतर अनन्वय फाउंडेशनतर्फे ‘बाकीबाब’ ह्या त्यांच्या जीवनकाव्यावर आधारित कार्यक्रम सादर करतील डॉ. माधवी वैद्य. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
– मुक्ता आगशीकर
(बा. भ. बोरकर यांच्या कन्या)