ब्रेकिंग न्यूज़

स्मार्ट सिटीखालील कामांची माहिती द्यावी : गोसुमं

स्मार्ट सिटी योजनेखाली २०१६ सालापासून आतापर्यंत पणजीत कोणती विकासकामे केली याची सविस्तर माहिती भाजप सरकारने द्यावी, अशी मागणी काल गोवा सुरक्षा मंचने पत्रकार परिषदेत केली. स्मार्ट सिटीसंबंधीची एक श्वेतपत्रिकाही सरकारने लोकांपुढे ठेवावी, अशी मागणीही गोसुमंच्या नेत्या ऍड. स्वाती केरकर यांनी केली.
आपले उमेदवार सुभाष वेलिंगकर ११ हजार मते मिळवून विजयी होतील असा दावा यावेळी आत्माराम गावकर यांनी केला.

दीडशे कोटींचे सीसीटीव्ही कॅमेरे शहरात बसवल्याने शहराचा विकास होणार नाही. पणजी शहरात सर्वत्र घाण पसरली असून त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली असल्याचे ऍड. केरकर म्हणाल्या. ह्या पार्श्‍वभूमीवर स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात नेमके काय करण्यात आले व त्याचा जनतेला कोणता फायदा झाला हे कळायला हवे, असे त्या म्हणाल्या. स्मार्ट सिटी म्हणजे काय ते पहायचे असेल तर इंदूरला चला. तेथे स्मार्ट सिटी अंतर्गत नेत्रदीपक अशी कामे झाली असल्याचे त्या म्हणाल्या.
गोसुमंचचे प्रचार प्रमुख महेश महांबरे यावेळी म्हणाले की पक्षाने २ मे रोजीपासून प्रचार सुरू केला होता. तेव्हापासून आतापर्यंत पक्षाचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांना मतदारांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळू लागला आहे.

बाबुश मोन्सेर्रात व भाजप यांच्यात साटेलोटे आहेत हे पुन्हा एकदा सिध्द झाल्याचे सांगून स्वत: बाबुश यानी भाजपचे संघटन मंत्री सतीश धोंड हे आपले चांगले मित्र असून आपण त्यांना भेटायला भाजपच्या कार्यालयात गेलो असे सांगितल्याचे महांबरे म्हणाले.