स्थानिक उद्रेक

मांगूर हिलमध्ये जे घडल्याची भीती होती, ते कोरोनाचे स्थानिक संक्रमण झाल्याचे आजवर झालेल्या चाचण्यांच्या निष्कर्षांतून समोर आलेले आहे. जसजशा चाचण्या वाढतील, तशी कोरोनाबाधितांची ही संख्या वाढू शकते. हे केवळ मांगूरहिल परिसरापुरते हे स्थानिक संक्रमण किंवा ‘लोकल ट्रान्समिशन’ आहे की आतापर्यंत ते बाहेरील भागांमध्ये सामाजिक संक्रमणाच्या म्हणजे ‘कम्युनिटी ट्रान्समिशन’च्या रूपात पसरले आहे हे अजून स्पष्ट नाही. ज्या मच्छिमारी कुटुंबातील व्यक्तीमध्ये सर्वप्रथम कोरोनाची लक्षणे आढळली, त्याच्याकडूनच हा संसर्ग त्या परिसरात पसरला असही ठामपणे सांगता येत नाही. कोरोना फैलावाचा मूळ स्त्रोत कोणी वेगळाही असू शकतो. कोरोनाच्या बाबतीत पुन्हा पुन्हा स्मरण करून देण्याजोगी बाब म्हणजे त्या विषाणूची बाधा झालेल्यांपैकी बहुतेक लोक हे ‘एसिप्म्टोमॅटिक’ म्हणजे लक्षणविरहित असल्याने त्यांना आपण कोरोनाबाधित आहोत आणि आपल्यामुळे तो आजूबाजूच्या लोकांत पसरू शकतो ही कल्पनाच नसते. त्यामुळे ते स्वतःच्याही नकळत कोरोनाचे वाहक बनलेले असतात. मांगूर हिलमध्ये कोरोना अशाच व्यक्तींद्वारे पसरत गेला आहे.
कोरोनाचे सामाजिक संक्रमण हे सर्वांत धोकादायक असते, कारण त्यात तो कोणाकडून कसा कुठे संक्रमित झाला हे शोधणे शक्य नसते. त्याचे मूळही सापडत नाही आणि तो कोठवर पोहोचला आहे हेही कळत नाही. त्यामुळे त्याचा प्रसार रोखणेही कठीण असते. त्या पूर्वीचा टप्पा ज्याला मानले जाते, त्या स्थानिक संक्रमणाच्या बाबतीत ज्या परिसरात असा कोरोनाचा उद्रेक झाला आहे, त्याला निर्बंधित क्षेत्र घोषित करून तेथील लोकांना बाहेर पडण्यास प्रतिबंध करता येतो. मांगूर हिलमध्ये मच्छिमारी कुटुंब कोरोनाबाधित आढळताच राज्य सरकारने सर्वप्रथम त्या परिसराला सीलबंद केले. त्यामुळे आता जे रुग्ण सापडले आहेत, ते त्या परिसरातील लोकांच्या केलेल्या कोविड तपासण्यांत सापडलेले आहेत. अर्थात, यापैकी बरेचजण हे कोठे ना कोठे नोकरीला असतील. व्यवसायानिमित्त वा अन्य कारणांनी गावाबाहेर पडलेले असतील. त्यामुळे कोरोना विषाणूचा धारणा-काळ असलेल्या चौदा दिवसांत यापैकी किती लोक कुठे कुठे वावरले, त्यांच्या नजीकच्या संपर्कात कोण आले हे सगळे आता शोधावे लागणार आहे. कोरोनाचा सामाजिक संसर्ग झालेला आहे की नाही हे त्यानंतरच स्पष्ट होईल.
कोरोनाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या नियमावलीनुसार त्याने बाधित झालेल्या रुग्णांची नावे सहसा जाहीर केली जात नाहीत. तसे केल्यास त्यांच्यावर सामाजिक बहिष्कारासारखे पाऊल समाजाकडून उचलले जाऊ शकते हे त्याचे कारण आहे. परंतु नावे जाहीर न करण्यातील धोका असा की त्यांच्या संपर्कात आलेल्यांपर्यंत ती माहिती न पोचल्याने ते स्वतःहून पुढे येऊ शकत नाहीत व आपण कोरोनाबाधित असू शकतो याबाबत अनभिज्ञच राहतात. यावेळी जनतेला किमान हे रुग्ण मांगूरहिलचे असल्याचे तरी सांगण्यात आले. राज्यात सुरवातीच्या काळात जे रुग्ण सापडले होते, ते नेमके कोणत्या भागातील आहेत हेदेखील सांगितले गेले नव्हते.
मांगूर हिलमध्ये कोरोना संक्रमितांची जी मोठी संख्या अचानक पुढे आली, त्यामुळे गोमंतकीय जनता हादरून गेलेली दिसते आहे. ही भीती अनाठायी नाही, परंतु असे प्रकार कोणाच्या ना कोणाच्या बेफिकिरीमुळे अधूनमधून घडतील हे वास्तव आता आपल्याला स्वीकारावेच लागेल आणि त्यानुसार अधिक खबरदारीही बाळगावी लागेल. सरकारकडून दरदिवशी दिल्या जाणार्‍या अधिकृत आकडेवारीवर विसंबून जनतेने निर्धास्त आणि बेफिकिर राहणे आत्मघातकी ठरू शकते. आरोग्य खात्याकडून रोज जी आकडेवारी जाहीर केली जाते, ती गोवा वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आलेल्या आरटी-पीसीआर चाचणीत दुजोरा मिळालेल्या कोरोनाबाधितांची असते. त्या आधी सर्वसामान्यपणे केल्या जाणार्‍या ट्रूनॅट चाचणी अहवालाच्या निष्कर्षांचा त्यात समावेश नसतो, कारण ती चाचणी तेवढी खात्रीशीर नाही. काणकाचे उदाहरण तर समोर आहेच. आरोग्यमंत्री मात्र जनतेला सावध करण्यासाठी म्हणा अथवा स्वतःची सक्रियता दाखविण्याच्या नादात म्हणा, ट्रूनॅट चाचणीचे आकडेही ट्वीट करीत असतात. मात्र, त्यामुळे जनतेच्या मनामध्ये सरकारच्या आकडेवारीप्रती संभ्रम आणि अविश्वास निर्माण होत असतो हेही लक्षात घेणे जरूरी आहे. आरोग्य खात्याची दैनंदिन पत्रकार परिषद नीला मोहनन फार चांगल्या प्रकारे हाताळत आहेत. कोरोनाच्या वस्तुस्थितीबाबत जनतेला त्यातून माहिती मिळत असते. ही माहिती जेवढी विस्तृत आणि वास्तववादी असेल, तेवढे जनतेच्या आणि सरकारच्याही हिताचेच ठरेल.
कोरोनाने राज्यात उचल खाल्लेली असताना भारतीय जनता पक्ष मात्र स्वतःच्या केंद्रातील सरकारच्या वर्षपूर्तीचा डांगोरा पिटण्याच्या प्रयत्नात आहे. चिनी वस्तूंवर बहिष्काराचे आवाहनही भाजप प्रदेशाध्यक्षांनी जनतेला नुकतेच केले. चीनची पूर्व सीमेवरील आगळीक निश्‍चितपणे निषेधार्ह आहे, परंतु बहिष्काराचे हे आवाहन वुहानपासून ममलापुरमपर्यंत उभय देशांत जे मैत्रिपर्व चालले होते त्याच्याशी आणि ‘मेक इन इंडिया’खाली चिनी कंपन्यांसाठी सरकारने ज्या पायघड्या अंथरलेल्या आहेत, त्याच्याशी विसंगत नाही काय? चिनी वस्तूंवर बहिष्कार घालायचा असेल तर त्यासाठी आधी केंद्र सरकारला आपली परराष्ट्र नीती बदलावी लागेल आणि ते सोपे नसते. त्यामुळे केवळ पक्षपातळीवरील हे बहिष्काराचे आवाहन हा कोरोनापासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याचा खटाटोप तर नाही ना? सद्यपरिस्थितीत मोदी सरकारच्या गेल्या वर्षभरातील कामगिरीचे ढोल पिटण्याचा प्रयत्न भाजपने न करणेच हिताचे ठरेल, कारण आज जनतेचे लक्ष केवळ कोरोना या विषयावर केंद्रित झालेले आहे. सद्यपरिस्थिती केंद्रातील आणि राज्यातील सरकार कसे हाताळते आहे ते जनता बारकाईने पाहते आहे. चांगल्या गोष्टींचे कौतुक करते आहे आणि चुकांबद्दल बोटेही मोडते आहे. त्यामुळे सरकारच्या यशापयशाचे मोजमाप तूर्त तरी कोरोनासंदर्भातील उपाययोजनांच्या आधारेच आम जनता करणार आहे.