ब्रेकिंग न्यूज़

स्त्रियांवरील वाढते अत्याचार चिंताजनक

  • शंभू भाऊ बांदेकर

एका बाजूने हजारो वर्षापासून सुसंस्कृतपणाची आपल्या देशाची परंपरा सांगणार्‍या देशात आता स्त्रियांवरील अत्याचारांची परंपरा जणू जन्माला घातली जात आहे. प्रत्येकाने विचार करण्यासारखीच अशी ही बाब आहे.

केंद्र सरकार काय किंवा राज्य सरकार काय, स्त्रियांच्या सबलीकरणासाठी त्यांच्यावर होणारे जुलूम, जबरदस्ती, अत्याचार नाहीसे करण्यासाठी प्रयत्नशील असते. ते सरकार मग कुठल्याही राजकीय पक्षाचे असो, त्यांनी स्त्रीमुक्तीसाठी आणि स्त्री सबलीकरणासाठी प्रयत्नशील राहण्याचे जणू व्रतच घेतलेले असते; पण असे असूनही आजची स्त्री भयमुक्त आहे, निर्धास्त आहे असे मात्र म्हणता येणार नाही.
याचे कारण म्हणजे राजधानी दिल्लीपासून देशाच्या गल्लीपर्यंत कुठल्या ना कुठल्या अबलेवर जुलूम, जबरदस्ती होतच असते. तिला छळणूक, पिळणूक आणि अत्याचार यांना सामोरे जावे लागते ही स्त्रीला देवतेच्या रूपात पुजणार्‍या या देशासाठी शरमेची गोष्ट म्हणावी लागेल.

देशाच्या स्वातंत्र्याला सत्तर वर्षे उलटून गेली तरी येथील स्त्री मात्र दीन, शोषित, पीडित अशीच राहिल्याचे चित्र आपणास दिसते. महिला – मग ती कोणत्याही सामाजिक घटकांतील असो – श्रीमंत, गरीब, उपेक्षित, शहरी असो – अथवा ग्रामीण या सर्वांच्या सबलीकरणाची गरज असल्याची चर्चा, संवाद, परिसंवाद गेली अनेक वर्षे चालू आहेत. महिलावर्गात क्षमता असूनही जर त्यांना वंचित ठेवले असेल तर त्यांचे प्रामुख्याने सबलीकरण करणे, त्यांना त्यांच्या पायावर उभे राहता येईल इतकी ती सबल बनली पाहिजे हे माहीत असूनही ज्या प्रमाणात त्यांच्यासाठी पेटून उठले पाहिजे म्हणून क्वचितच सत्ताधारी प्रयत्नशील असतात.
राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा बाबतीत महिलांना बाजूला सारले असेल, त्यांना त्यांच्या हक्कांपासून डावलले गेले असेल, तर त्या सबल होतीलच कशा?

आणखी विशेष म्हणजे ती महिला दलित, दरिद्री, अशिक्षित असेल, ग्रामीण असेल तर त्यांच्यासाठी खास प्रयत्नांची गरज असते. सत्ताधार्‍यांना हे कळत नाही असे नाही. कळते पण वळत नसल्यामुळे आपल्या वाचनात नेहमी कुठे ना कुठे महिलेवर आगळीक केल्याचे आपल्या वाचनात येते आणि ‘स्त्री जन्मा किती ही तुझी हीन, दीन, करुण अवस्था’ असे वाटून मन भरून येते.

हे सारे लिहीत असताना पाच, सहा वर्षांपूर्वी देशाची राजधानी नवी दिल्लीत एका तरुणीवर झालेला सामूहिक बलात्कार व त्यात तिचा झालेला मृत्यू याची प्रकर्षाने आठवण होते. ही घटना म्हणजे एका रात्री दिल्लीमध्ये एका चालत्या बसमध्ये अत्यंत क्रूर अशा सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या २३ वर्षीय तरुणीचा तब्बल तेरा दिवसांच्या जीवघेण्या संघर्षानंतर सिंगापूर येथील माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला होता.

माणुसकीला काळीमा फासणार्‍या नराधमांच्या या अत्यंत हीन दर्जाच्या वागणुकीमुळे सारा देश हादरला होता. देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यापासून विविध थरातील नामवंतांनी या दुष्कृत्याचा निषेध करीत आपल्या भारतासारख्या सुसंस्कृत व प्रगतीशील देशात अशा घटना घडाव्यात याबद्दल तीव्र संताप व्यक्त करत अशा वृत्तीच्या नराधमांना जास्तीत जास्त कडक व लवकरात लवकर शिक्षा झाल्याशिवाय देशवासीयांच्या मनातील अस्वस्थता कमी होणार नाही, अशा प्रतिक्रिया ऐकू आल्या होत्या.

ज्या बलात्कार पीडित तरुणीचा मृत्यू झाला होता तिच्या वडिलांची प्रतिक्रिया आजही माझ्या मनाचा थरकाप उडविणारी बनून राहिली आहे. तिच्या वडिलांनी म्हटले होते, माझा आणि माझ्या कुटुंबाचा एकमेव आधार असलेली माझी मुलगी राहिली नाही, हे दु:ख पचवणे सोपे नाही. ती आता परतही येणार नाही, पण तिच्या मृत्यूमुळे दिल्लीतील आणि देशातील इतर मुलींचे जीवन सुरक्षित झाले, तर माझे दु:ख थोडे तरी हलके होईल.

काळजावर दगड ठेवल्याशिवाय एखाद्या पित्याकडून अशी प्रतिक्रिया उमटू शकेल काय? धन्य त्या पित्याची. त्यांनी व्यक्त केलेली इच्छा प्रत्यक्षात आली तर ते स्त्री जातीवर केलेले फार मोेठे उपकार ठरणार आहेत.

त्यानंतर ठळक अशी घटना आठवते ती पुणे येथे दोन – तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या एका मुलीच्या संदर्भातील घटनेची. पुणे सारख्या गजबजलेल्या शहरात भर रस्त्यावर तरुणीवर अत्याचार करणारी घटना घडली. कायद्याच्या आणि समाजाच्या दृष्टीने घडलेली ही कुवार्ता वर्तमानपत्रात छापून आल्यावर आठवड्याच्या दरम्यान पिंपरी-चिंचवड परिसरात रिक्षाने जाणार्‍या एका महिलेवर रिक्षा चालक व त्याच्या मित्राने बलात्कार केल्याची बातमी वाचनात आली.

त्यानंतर आपण पाहिले तर अशा घटना कुठे ना कुठे आपल्या वाचनात येतात व एका बाजूने हजारो वर्षापासून सुसंस्कृतपणाची आपल्या देशाची परंपरा सांगणार्‍या देशात आता स्त्रियांवरील अत्याचारांची परंपरा जणू जन्माला घातली जात आहे. प्रत्येकाने विचार करण्यासारखीच अशी ही बाब आहे. एकीकडे आपण महासत्ता होण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करीत आहोत, तर दुसर्‍या बाजूने स्त्रियांवर अत्याचारांचे आक्रमण होत आहे. देशाची शान, देशाची मान राखण्यासाठी अशा अपमानकारक व लज्जास्पद घटनांना आळा बसणे ही काळाची गरज आहे. त्यासंबंधी संबंधितांनी गंभीरपणे विचार करणे आणि मुख्य म्हणजे कृती करणे गरजेचे आहे.