स्तनाचा कर्करोग

डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

स्तनावर गाठ आल्यास त्याचा संबंध गर्भाशय, फलकोष, गर्भाशयातील अंतःस्त्वचा या सर्वांवर होत असल्याने सर्व जननेंद्रियांच्या ठिकाणी दुष्टी असते हे लक्षात घेऊन स्तनावरील प्रलेप, प्रदेह, परिसेचन, क्वाथ यांबरोबर योनिभागी चिकित्सा केल्यास रुग्णा पूर्ण बरी होते.

वाढत्या स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांमुळे महिला वर्ग थोडासा सतर्क होताना दिसत आहे. स्तनांमध्ये साधी जरी गाठ हाताला लागली तरी महिला डॉक्टरांकडे सल्ला घ्यायला येताना दिसतात. पूर्वी बर्‍याच स्त्रिया आरोग्याकडे दुर्लक्ष करायच्या. आता विविध प्रकारच्या रोगांच्या आगमनामुळे, स्त्री शिक्षित झाल्यामुळे, तसेच सरकारच्या विविध रोगांबाबतच्या जागरुकतेच्या धोरणांमुळे महिलावर्ग आपल्या आरोग्याकडे लक्ष देताना दिसत आहे. पण तरीही काही प्रमाणात स्तनाच्या कर्करोगाचे निदान जिथे पहिल्या टप्प्यावर व्हायला पाहिजे, तिथे आजही तिसर्‍या टप्प्यावरच स्तनाच्या कर्करोगाचे निदान होताना आढळते… असे कां?
त्यासाठी स्तनरोगाच्या कारणांबरोबरच स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे व त्याचे प्रतिबंधात्मक उपायही माहीत असणे फार महत्त्वाचे आहे. ‘स्तन’ हा स्त्रीशरीरातील महत्त्वाचा मृदू मांसल अवयव. अपत्यनिर्मितीनंतर अपत्य संगोपनासाठी या मांसल भागात मांसतंतू, वसा यांच्याबरोबरीने दुग्धवाही सिरा, स्तन्य निर्माण करणार्‍या ग्रंथी, दुधाचा पुरवठा करणार्‍या नाड्या, रसरक्त संवहन करणार्‍या धमन्या, सिर्‍या निर्माण होतात. स्तनभागी रस, रक्त, मांस, मेद हे धातू कार्य करीत असतात. आर्तव धातूचे स्तन हे प्रमुख स्थान आहे. त्यामुळे बर्‍याच वेळा आर्तव धातुमध्ये बिघाड झाल्यास त्याचा थेट परिणाम स्तनांवर होतो.
स्तनाच्या कर्करोगाची प्रमुख कारणे ः
– अविवाहित व अपत्यहीन स्त्रिया
– ज्या स्त्रियांचा विवाह उशिरा झालेला आहे
– ज्या स्त्रियांना पहिले मूल वयाच्या तिसाव्या वर्षानंतर झाले आहे.
– ज्या स्त्रियांच्या कुटुंबामध्ये आई, बहीण, आजी, अथवा कोणत्याही रक्ताच्या स्त्री नातेवाईकाला स्तनाचा कर्करोग झालेला आहे.
– खाण्यापिण्यातील नियमांचे पालन न करणे
– विषम चेष्टा असणे
– आहारातून कोणत्याही प्रकारे वज्र म्हणजे कठीण पदार्थ जाणे.
– वेड्यावाकड्या शय्येवर शयन करणे आणि कामजीवनामध्ये योग्य आसनांचा उपयोग न करता विषम चेष्टा करणे.
शरीर विकृतींबरोबर ‘मानसिक’ असे जे स्त्रियांमध्ये उत्पन्न होणारे दोष म्हणजे – स्त्री थकलेली असताना पती रात्री वेड्यावाकड्या चेष्टांनी त्रास देतो. अशा अवस्थेत स्तनांवर अनियंत्रित चेष्टा घडल्यास त्याचा परिणाम स्त्रीशरीर व मनावर होतो व स्तनरोगाला सामोरे जावे लागते.
– बराच काळ ‘कॉपर टी’ ठेवल्यास त्याचा परिणाम गर्भाशय-मुखावर होतो, तसेच स्तनांवरही होतो.
– कुटुंबनियोजनासाठी वापरल्या जाणार्‍या गोळ्या बराच काळ घेतल्यास त्याचा परिणाम गर्भाशय अंतःस्त्वचा, आर्तववाहिन्या व फलकोष यांवर होत असतो. त्यामुळे मूल आर्तववह स्रोतस दुष्ट झाल्याने स्तनोत्थ शोथ निर्माण होतो व शोथाचे झटकन ग्रंथीत रुपांतर होते.
– रजोनिवृत्तीच्या काळात स्तनरोग होण्याची शक्यता अधिक असते. अगदी किरकोळ कारणामुळेही स्तदनावर सूज आल्यास किंवा ग्रंथी झाल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

स्तनाच्या कर्करोगाची प्रमुख लक्षणे ः
– स्तनाच्या ठिकाणी ताठरता किंवा गोळा येणे
– स्तनाच्या ठिकाणी सूज किंवा बारीक खळगा पडणे
– स्तनाच्या ठिकाणी न थांबणारी खाज
– स्तनाग्र किंवा त्याच्या बाजूच्या भागात पांढरेपणा किंवा तांबूसपणा
– स्तनाच्या आकारात लक्षणीय बदल
– स्तनाग्रातून स्राव वाहणे
– स्तनामध्ये वेदना होणे

स्तनाच्या कर्करोगाच्या निदानासाठी आवश्यक तपासण्या ः
१) मॅमोग्राफी – या तपासणीमध्ये क्ष-किरणांनी स्तनांची आतील रचना सुस्पष्ट करून दाखविण्याचे काम केले जाते. स्त्रियांनी चाळीशीनंतर वैद्यकीय सल्ल्याने ही तपासणी करून घेणे योग्य ठरते.
२) बायॉप्सी – यामध्ये गाठीचा एखादा छोटा भाग काढून घेऊन त्याचे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली परीक्षण केले जाते.
३) ट्यूमर मार्कर तपासणी – यामध्ये स्तनाच्या कर्करोगासाठी सीए-१२५ (कँसर अँटीजेन १२५) ही तपासणी केली जाते.
४) रक्तपरीक्षण – संपूर्ण ब्लड काऊंट तपासणे.

कोणत्या प्रकारच्या स्तनातील गाठींकडे दुर्लक्ष करू नये?…
– स्तनाच्या ठिकाणी काळसर, निळसर अशा लहान एक-दोन किंवा तीन वातज ग्रंथी निर्माण झाल्यास वातविद्रधीची चिकित्सा द्यावी. परंतु उपशय न मिळाल्यास मॅमोग्राफी, इत्यादी आधुनिक परीक्षणे करून घ्यावीत. कारण अशा प्रकारच्या बारीक ग्रंथींमध्ये वेदना अजिबात नसतात, परंतु या ग्रंथी कँसरच्या असू शकतात.
– काही वेळा स्तनांचे मृदुत्व जाऊन अत्यंत कठीण व आकाराने मोठी अशी ग्रंथी निर्माण होते. सुरुवातीला वेदना जाणवत नाही पण नंतर रुद्धगतित्व वाढल्याने या गाठी कर्करोगाच्या ठरतात.
– अतिशय मोठे, स्तनाच्या कडेच्या भागात झालेले, आकारमान जास्त असलेले, मांसधातूशी निगडित असलेले मांसाबुंद कर्करोगाचे असू शकतात.
– स्तनचुचुकाचा एखादा भाग आत्यंतिक लाल झाल्यास व त्याठिकाणी ग्रथिलत्व वाटल्यास ही अवस्था कर्करोगाची आहे हे लक्षात घ्यावे.
– रक्तस्राव करणारी स्तनोत्थ ग्रंथी म्हणजे रक्तार्बुद असे निदान केले तरी स्पर्श केल्यास आतील शिराजाल तडतडीत, वर्तुळाकृती असे पसरलेले लागल्यास ही अवस्था कँसरची समजणे.
– स्तनांवर त्या मानाने कमी कठीण असणारी, झपाट्याने वाढणारी परंतु स्पर्श केल्यास तंतुमय आहे असे जाणवल्यास ती कर्करोगाची गाठ आहे असे समजावे.
– चुचुकाच्या ठिकाणी कोथ निर्माण होतो व हळुहळू कृष्णमंडळावर पसरतो. ही अवस्थासुद्धा कर्करोगाची.
– फसवणूक करणारे, अतिशय हळू वाढणारे व आकाराने छोटे असणारे मांसार्बुद निर्माण होतात व नाडीव्रणाप्रमाणे चरत जात असल्यास कर्करोग आहे हे लक्षात घ्यावे.

स्तनाच्या कर्करोगाची चिकित्सा ः
कर्करोग निर्माण करणार्‍या दोषांचे बल व रुग्णाचे बल यानुसार कर्करोगाची चिकित्सा करावी. १) शोथन, २) शमन, ३) रसायन चिकित्सा.
– स्थानिक चिकित्सांमध्ये पिचू, स्नेहन, स्वेदन, धावन द्यावे.
– न्यग्रोधादि गण, एलादी गण, अनंतमूळ, मंजिष्ठा, शतावरी, त्रिफला, बला, गोक्षूर, पुनर्नवा, एरंडमूळ, सुंठ, बहावा आदि द्रव्यांचा प्रकृतीनुसार काढा द्यावा. या चिकित्सेने स्त्रोतोमार्ग मोकळा होऊन ग्रंथीचे विलयन होते. विलयन न झाल्यास ती ग्रंथी शस्त्रक्रियेने निर्हरण करावी.
– स्तनावर गाठ आल्यास त्याचा संबंध गर्भाशय, फलकोष, गर्भाशयातील अंतःस्त्वचा या सर्वांवर होत असल्याने सर्व जननेंद्रियांच्या ठिकाणी दुष्टी असते हे लक्षात घेऊन स्तनावरील प्रलेप, प्रदेह, परिसेचन, क्वाथ यांबरोबर योनिभागी चिकित्सा केल्यास रुग्णा पूर्ण बरी होते.
याठिकाणी चंद्रप्रभा वटी, कैशोर गुग्गुळ, व्योषादि गुग्गुळ, कांचनार व त्रिफळा गुग्गुळ, सूक्ष्म त्रिफळा, गंधक रसायन, ताप्यादि लोह, नवायस लोह, त्रिवंग भस्म, पुष्यानुग चूर्ण, अनंतमूळा मंजिष्ठा, गुळवेल, काडेचिराईत, चंदन, सुंठ, नागरमोथा या द्रव्यांचा प्रकृतीनुसार उपयोग केल्यास यश मिळते.

स्तनाचा कर्करोग ः प्रतिबंध
– स्तनाचा कर्करोग झाल्यावर शस्त्रक्रियेने स्तन निर्हरण करून किमोथेरपी घेतल्यावर रुग्णा बरी होते. असे असले तरी स्तन कँसरच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येचा विचार करून प्रतिबंधक उपायांचा अवलंब जरूर करावा…
– रजःप्रवृत्ती सुरू होण्यापूर्वी…
* बालिकांना पोषक पण स्थौल्य निर्माण न करणारा आहार द्यावा.
* योग्य व नियमित व्यायाम
* मनाचा क्षोभ होईल अशा घटना टाळणे.
– रजःप्रवृत्ती सुरू झाल्यावर…
* सुयोग्य आहाराचे पालन
* रजःप्रवृत्ती काळातील आयुर्वेदोक्त नियमांचे पालन
* रजःप्रवृत्ती नियमित येत नसल्यास औषधोपचार
* प्रतिवर्षी वसंत ऋतूत ‘वमन’ चिकित्सा.
– सगर्भावस्थेत….
* गर्भिणी परिचर्या पालन
* रसधातूची शुद्धी करणारा आहार-विहार
– सुतिकावस्थेत…
* सूतिका परिचर्या पालन
* स्तनपानाचे नियम पालन
* स्तन्यशोधक चिकित्सा
* उभय स्तनांनी स्तन्यपान
* १ वर्षापर्यंत स्तन्यपान
– रजोनिवृत्ती अवस्थेत…
* मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी उपक्रम
* बस्ती व वमन चिकित्सा
* आहार-लघु, दीपन करणारा – उदा. मुगाचे कढण, भाताची पेज
* विहार – योगासने, प्राणायाम व शवासन
सामान्यतः
* हार्मोनल औषधांचा वापर टाळावा.
* ऋतुनुसार शोधन चिकित्सा घ्यावी.
* मानसिक स्वास्थ्याचे रक्षण करावे.
………………………………………..