‘स्ट्राईक’ बदलण्यात विराट पारंगत

>> गौतम गंभीरने सांगितले कोहलीचे वेगळेपण

वेस्ट इंडीजचा गेल, सलामीवीर रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा ‘मि. ३६०’ एबी डीव्हिलियर्स यांच्यापेक्षा टीम इंडिया कर्णधार विराट कोहली सरस असल्याचे भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने काल मंगळवारी सांगितले. ‘स्ट्राईक रोटेट’ करण्यात विराटचा हात धरणारा दुसरा कोणी नाही. मर्यादित षटकांच्या लढतींत सातत्यपूर्ण कामगिरी करणे आणि सतत धावा करणे हाच निकष लावला तर त्यात विराट कोहलीच्या जवळपास जाणारा कोणी नाही, असे गंभीरने पुढे सांगितले.

भारताच्या २००७ सालच्या टी-ट्वेंटी विश्‍वचषक विजेत्या व २०११च्या विश्‍वविजेत्या संघाचा सदस्य असलेल्या गंभीरने विराटच्या फलंदाजीचे कौतुक केले आणि विराट या तिघांपेक्षा वेगळा कसा आहे ते सांगितले.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्मापेक्षा विराट कसा चांगला फलंदाज आहे हे गंभीरने स्टार स्पोर्टस् ‘क्रिकेट कनेक्टेड’ शोमध्ये सांगताना गंभीर म्हणाला की तुम्ही रोहितकडे पाहा, त्याच्याकडे विराटचा दर्जा नाही. तो विराटसारखा एकेरी धावा घेत स्ट्राईक बदलत नाही. रोहितकडे मोठे फटके आहेत पण हेच कारण आहे की कोहली रोहितपेक्षा सातत्यपूर्ण आहे. गेलमध्येही स्ट्राइक रोटेटसारखे काही नाही. तो केवळ मोठे फटके खेळण्यातच विश्‍वास ठेवतो. डीव्हिलियर्ससारखा चपळ खेळाडूदेखील फिरकी गोलंदाजांविरूद्ध सहजरित्या स्ट्राईक बदलू शकत नाही, विराट जे इतरांपेक्षा वेगळे करतो ते म्हणजे ‘स्ट्राईक रोटेशन’ यामुळेच त्याची सरासरी ५० च्या वर आहे. आयसीसी टी- ट्वेंटी आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट १० व्या स्थानावर आहे, तर पाकिस्तानचा बाबर आझम अव्वल क्रमांकावर आहे. बाबर आणि विराट हे दोघे क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये सरासरी ५० च्या वर असणारे फलंदाज आहेत.
गंभीर म्हणाला की निर्धाव चेंडूला लोक जास्त महत्त्व देत नाहीत, पण जर तुम्ही कमी निर्धाव चेंडू खेळत असाल तर तुम्ही दबाव कमी करू शकता. क्रिकेटमध्ये षटकार आणि चौकार मारणे ही सर्वात सोपी गोष्ट आहे. कारण आपण त्यासाठी खूप मोठी जोखीम पत्करत असतो. ते ठीक झाल्यास सर्वांनाच आवडते, परंतु जर ते चुकले तर आपल्याला माघारी परतावे लागते. क्रिकेटमध्ये असे बरेच कमी खेळाडू आहेत जे प्रत्येक चेंडूवर एक धाव घेऊ शकतात. विराट कोहली यात पारंगत आहे.

काही दिवसांपूर्वीच श्रीलंकेचा माजी यष्टिरक्षक फलंदाज कुमार संगकारा याने कोहलीची स्तुती केली होती. विराट कोहली व रोहित शर्मा या दोघांनी भारतीय क्रिकेटला नवी दिशा दिल्याचे त्याने म्हटले होते. त्यांनी राखलेल्या तंदुरुस्तीमुळेच क्रिकेटच्या टी-ट्वेंटी व वनडे या प्रकारात सातत्य दाखवणे त्यांना शक्य होत असल्याचे संगकारा म्हणाला होता.