स्टुअर्ट ब्रॉड तिसर्‍या स्थानी

>> आयसीसी कसोटी क्रमवारी जाहीर

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत तिसर्‍या स्थानी झेप घेतली आहे. त्याच्या खात्यात ८२३ गुण जमा आहेत. वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या शेवटच्या दोन कसोटींत तब्बल १६ बळी घेत त्याने सात स्थानांची सुधारणा केली आहे. साऊथहॅम्पटन येथे झालेल्या पहिल्या कसोटीत त्याला स्थान देण्यात आले नव्हते. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स ९०४ गुणांसह पहिल्या तर न्यूझीलंडचा नील वॅगनर ८४३ गुण घेत दुसर्‍या क्रमांकावर आहे.

तिसर्‍या कसोटीतील दुसर्‍या डावात घेतलेल्या पाच बळींच्या बळावर ख्रिस वोक्स याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम ६५४ गुण घेत विसाव्या स्थानी हक्क सांगितला आहे. गोलंदाजांमध्ये भारताच्या जसप्रीत बुमराह याची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डर हा गोलंदाजांमध्ये तिसर्‍या स्थानावरून पाचव्या स्थानी घसरला आहे.

इंग्लंडच्या कसोटी इतिहासातील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वांत वेगवान अर्धशतक झळकावलेल्या ब्रॉड याने फलंदाजीत सात स्थानांची उडी घेतली आहे. अष्टपैलूंमध्ये तो तीन क्रमांकांनी वर सरकला आहे. ताज्या क्रमवारीत तो ११व्या स्थानी (२०७ गुण) विराजमान आहे. इंग्लंडचा सलामीवीर रॉरी बर्न्स याने ५७ व ९० धावांवर आरुढ होत १३ स्थानांची झेप घेत १७वा क्रमांक प्राप्त केला आहे. ‘टॉप २०’ मध्ये स्थान मिळवण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. ओली पोप (४६वे स्थान, + २४) व जोस बटलर (४४वे स्थान, + ६) यांनी सकारात्मक दिशेने वाटचाल सुरूच ठेवली आहे.