स्कूलबस-रेल्वे अपघातात १८ ठार
रेल्वेची धडक बसल्यानंतर दुर्दैवी स्कूलबसचा असा चक्काचूर झाला.

स्कूलबस-रेल्वे अपघातात १८ ठार

तेलंगणमधील दुर्घटना : रेल्वे खात्यास दोष
तेलंगणमधील मेडक जिल्ह्यातील एका रेल्वे क्रॉसिंगवर एका स्कूल बसला रेल्वे धडकून झालेल्या भीषण अपघातात काल किमान १६ विद्यार्थ्यांसह १८ जण ठार झाले. तसेच १६ जण जखमी झाले. या अपघातात बस ड्रायव्हरही ठार झाला. ७ ते १४ वयोगटातील जखमी मुलांना इस्पितळात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दुर्घटनाग्रस्त स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन तूपरन येथील शाळेला निघाली होती. मानवविरहीत रेल्वे क्रॉसिंगच्या गेटला ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्या बसला त्याचवेळी जाणार्‍या नांदेड-सिर्कदराबाद ट्रेनची धडक बसली. बळींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, या भीषण अपघातास रेल्वे खाते जबाबदार असल्याचा आरोप तेलंगण सरकारने केला आहे. सदर ठिकाणी गेट उभारण्याची कित्येक वेळा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. तेलंगणाचे गृहमंत्री एन. एन. रेड्डी यांनी रेल्वे खात्याच्या संबंधित अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी केली आहे.

Leave a Reply