स्कार्लेट खूनप्रकरणी आरोपी सॅमसनला १० वर्षे तुरुंगवास

स्कार्लेट खूनप्रकरणी आरोपी सॅमसनला १० वर्षे तुरुंगवास

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ब्रिटिश अल्पवयीन मुलगी स्कार्लेट किलिंग खून आणि बलात्कार प्रकरणी आरोपी सॅमसन डिसोझा याला १० वर्षे सक्तमजुरी आणि २.६० लाखांच्या दंडाची शिक्षा जाहीर केली.

या प्रकरणी न्यायालयाने सॅमसन डिसोझा याला १७ जुलैला दोषी ठरविले होते. या प्रकरणातील दुसरा संशयित प्लासिडो कार्व्हालो याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या सॅमसन डिसोझा याला शिक्षा ठोठावण्यापूर्वी न्यायालयात युक्तिवाद झाला. सीबीआयच्या वकिलांनी या प्रकरणी आरोपी सॅमसन याला जास्तीत जास्त शिक्षा ठोठावण्याची मागणी केली. न्यायालयाने सॅमसन याला सदोष मनुष्यवध, पुरावे नष्ट करणे, विनयभंग करणे, अमली पदार्थ देणे, बालशोषण आदी कलमांखाली दोषी ठरविले होते.

स्कार्लेट हिला अमलीपदार्थ दिल्याप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी, शोषण केल्याप्रकरणी ५ वर्षे सक्तमजुरी, मारहाण प्रकरणी ५ वर्षे सक्तमजुरी, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी २ वर्षे सक्तमजुरी, बाल कायद्याअर्ंतगत ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सर्व शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत. दंडाच्या रक्कमेचा भरणा न केल्यास आणखी ३ वर्षे सक्तमजुरी करावी लागणार आहे.
सॅमसन याने शरण येण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला होता. परंतु, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. पोलिसांनी सॅमसन याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.

हणजुण समुद्र किनार्‍यावर १८ ङ्गेब्रुवारी २००८ रोजी स्कार्लेट किलींगचा मृतदेह अर्धनग्न स्थितीत आढळला होता. स्कार्लेटच्या आईने या प्रकरणी हत्येचा आरोप केला होता. त्यामुळे स्कार्लेटच्या मृतदेहाचे दुसर्‍यांदा शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी जास्त अमली पदार्थ सेवनाने मृत्यू झाल्याचे निदान करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करून सॅमसन डिसोझा आणि फ्लासिडो कार्व्हालो याला अटक केली होती. पणजी बाल न्यायालयाने सप्टेंबर २०१६ मध्ये दोघा आरोपींना पुराव्यांअभावी निर्दोष घोषित केले होते. त्यानंतर सीबीआयने बाल न्यायालयाच्या निवाड्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते.