सौरभ वर्माचा मुख्य स्पर्धेत प्रवेश

भारताच्या सौरभ वर्मा याने पात्रता फेरीतील दोन्ही सामने जिंकून थायलंड ओपन बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर ‘सुपर ५००’ स्पर्धेच्या मुख्य फेरीत काल स्थान मिळविले. सौरभने आपल्या पहिल्या सामन्यात यजमान देशाच्या कांतावत लीलावेचाबुतर याचा ५३ मिनिटे चाललेल्या संघर्षपूर्ण लढतीत २१-१८, २१-१९ असा पाडाव केला. तर दुसर्‍या लढतीत चीनच्या झोव झे की याचा १ तास ३ मिनिटे चालेल्या सामन्यात ११-२१, २१-१४, २१-१८ असा पाडाव केला. पहिल्या फेरीत त्याचा सामना जपानच्या कांता त्सुनेयामा याच्याशी होणार आहे. अजय जयराम याला मात्र पात्रता फेरीचा अडथळा पार करता आला नाही. चीनच्या झोव झे की याने त्याला एकतर्फी लढतीत २१-१६, २१-१३ असे गारद केले. महिला एकेरीत साई उत्तेजिता राव चुक्का हिने कॅनडाच्या ब्रिटनी टॅम हिला १६-२१, २१-१४, २१-१९ असे हरवून चीनच्या चेन शियाव शिन हिच्याशी गाठ पक्की केली. मुख्य स्पर्धेच्या महिला दुहेरीत अश्‍विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी यांना पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. ली वेन मेई व झेंग यू या चीनी जोडीने एकतर्फी लढतीत भारतीय जोडीला २१-७, २१-१३ असा बाहेरचा रस्ता दाखविला. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांचा सामना भारताच्याच मनू अत्री व सुमीथ रेड्डी यांच्यात झाला. या लढतीत रंकीरेड्डी-शेट्टी जोडी २१-११, २४-२६, २१-११ अशी विजयी झाली. आज मिश्र दुहेरीत रंकीरेड्डी-पोनप्पा यांचा सामना पाचव्या मानांकित चान पेंग सून-गोह लियू यिंग यांच्याशी होणार आहे. याव्यतिरिक्त पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत, एचएस प्रणॉय, शुभंकर डे, पारुपल्ली कश्यप, सौरव वर्मा, साई प्रणिथ तर महिलांमध्ये सायना नेहवाल व चुक्का यांचे आज पहिल्या फेरीचे सामने होतील.