‘सेल्फ लर्निंग’द्वारे शिक्षण व्यवस्थेचा सुवर्णमध्य : डॉ. माशेलकर

‘सेल्फ लर्निंग’द्वारे शिक्षण व्यवस्थेचा सुवर्णमध्य : डॉ. माशेलकर

जलद तंत्रज्ञान आणि सध्याच्या शिक्षण व्यवस्थेचा सुवर्णमध्य साधण्यासाठी स्वअभ्यास म्हणजेच सेल्ङ्ग लर्निंग गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.
व्हायब्रंट गोवा ङ्गाउंडेशनच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष असलेले शास्त्रज्ञ डॉ. माशेलकर व्हायब्रंट गोवा नॉलेज सिरीजच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. ही व्याख्यानमाला राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेत काल गुरुवारी सकाळी झाली. सदर व्याख्यानमाला गोव्यामध्ये १७ ते १९ ऑक्टोबरदरम्यान होणार्‍या व्हायब्रंट गोवा ग्लोबल एक्सपो परिषदेसाठी अग्रदूत म्हणून काम करणार आहे. माशेलकर यांनी घातांकिय तंत्रज्ञान आणि नोकर्‍यांचे भविष्य या विषयावर विस्तारित माहिती दिली.

इंटरनेट, बिग डेटा ऍनालिसिस ब्लॉकचेन, रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या विकसित होणार्‍या तंत्रज्ञानामुळे नोकर्‍यांचे कमी होणारे महत्त्व त्यांनी विस्तारितपणे मांडले. रोबोट्‌स आणि मेंदू यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आल्याने एक वेगळाच वाद निर्माण होत आहे. अशा परिस्थितीमध्ये माणूस काय करू शकतो? असा प्रश्‍न माशेलकर यांनी विचारला. ते म्हणाले, परिस्थिती इतकीही उदासीन नाही. तंत्रज्ञानाने नोकर्‍यांच्या वाढीसाठीही हातभार लावला आहे. तरुण कामगारांना कौशल्य, नाविन्यता प्रदान केली आहे. तंत्रज्ञानाच्या जलद वाढीपासून कुठल्याही औद्योगिक क्षेत्रातील व्यवसाय वाचलेला नाही. यामध्ये हेल्थकेअर, प्रसारमाध्यमे, इन्शुरन्स, ङ्गायनान्स, शिक्षण, मार्केटिंग, जाहिरातक्षेत्र आणि कायद्याशी निगडीत व्यवसायाचाही समावेश आहे.

माशेलकर यांनी सरकारला तंत्रज्ञानाचे स्वागत करण्याचा सल्ला दिला. देशाबाहेरील कंपन्यांना परवाना देण्यापूर्वी तंत्रज्ञानाची पूर्वस्थिती जाणून कामगारांच्या गटांना लहान आणि मध्यम पातळीवर प्रशिक्षण देऊन देशातील तरुणांना करिअर समुपदेशनही द्यायला हवे, असे सांगितले.

नाविन्यतेच्या गरजेवर भर देताना त्यांनी नाविन्यता पैशांमध्ये कशाप्रकारे प्रवर्तित केली जाऊ शकते याबद्दल माहिती दिली. याचेच उदाहरण देताना त्यांनी सांगितले, हर्षवर्धन झाला या भारतीय तरुणाने एक ड्रोन तयार केला आहे, ज्यामुळे जमिनीतील खाणी तपासता येतात. त्याच्या या कार्यामुळेच गुजरात सरकारने त्याला पाच करोड रुपयांचे उत्पादन अनुदान दिल्याचे त्यांनी सांगितले.

व्याख्यानानंतर झालेल्या परिसंवादात गोवा विद्यापीठाचे कुलगुरू वरूण साहनी भारतीय शिक्षण व्यवस्थेत असणार्‍या कमतरतेची माहिती दिली. एनआयओचे संचालक सुनील कुमार सिंग, व्हायब्रंट गोवा ङ्गाउंडेशनचे अध्यक्ष नितीन कुंकळकर, गोवा ङ्गाउंडेशनचे अध्यक्ष राजकुमार कामत, मुख्य प्रवक्ता जगत सिंग यांनीही मते व्यक्त केली.