ब्रेकिंग न्यूज़
सेंट रॉक्स यूथ क्लबला अजिंक्यपद

सेंट रॉक्स यूथ क्लबला अजिंक्यपद

यजमान सेंट रॉक्स यूथ क्लबने अंतिम सामन्यात डॉन बॉस्को ओरेटरी फातोर्डाचा ३-० असा एकतर्फी पराभव करीत ३०व्या सेंट रॉक्स चषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.

पहिल्या सत्रात १६व्या मिनिटाला यजमान सेंट रॉक्स यूथ क्लबने आपले खाते खोलले. १०व्या मिनिटाला गोल करण्याची सोपी संधी गमावलेल्या फ्लेसबन फेर्रावने वेंडेल कुयेल्होकडून मिळालेल्या अचूक क्रॉसवर १६व्या मिनिटाला प्रतिस्पर्धी डॉन बॉस्को ओरेटरीचा गोलरक्षक स्विझेल परेराला चकवित सेंट रॉकला आघाडीवर नेणारा हा गोल नोंदविला.

दुसर्‍या सत्रात ३६व्या मिनिटाला केविन आल्मेदाने पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतर करीत सेंट रॉकला २-० अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या अंतिम क्षणात म्युटन फर्नांडिसने यजमानांच्या ३-० अशा जेतेपदावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदविला.
बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शारदा मंदिर, मिरामारचे प्रशासक ऑस्कर गोन्साल्वीस यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या संघाला रु. ४०,००० व चषक तर उपजिवेत्यांना रु. ३०,००० व चषक प्रदान करण्यात आला.

वैयक्तिक बक्षिसे पुढील प्रमाणे ः उदयोन्मुख खेळाडू – म्युटन फर्नांडिस (सेंट रॉक्स यूथ क्लब), अंतिम सामन्यातील पहिला गोल – फ्लेसबन फेर्राव (सेंट रॉक्स यूथ क्लब), अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट गोलरक्षक – रॉलंड फर्नांडिस (सेंट रॉक्स यूथ क्लब), अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट बचावपटू – लेस्टर वाझ (सेंट रॉक्स यूथ क्लब), अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट मध्यपटू – जॉएल कुलासो (डॉन बॉस्को ओरेरटरी), अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट आघाडीपटू – फ्रांसिस आंद्रादे (डॉन बॉस्को ओरेटरी).