सेंट अँथनी कोलवाला स्ट्रायकर्स करंडक

सेंट अँथनी क्लब कोलवा यांनी सेंट अँथनी स्पोटर्‌‌स क्लब असोल्डाचा टायब्रेकरवर ३-१ असा पराभव करत ३४व्या स्ट्रायकर्स करंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यंग स्ट्रायकर्स बाणावलीने दांडो मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले होते. निर्धारित वेळेत असोल्डाचा संघ सामना सहज जिंकणे अपेक्षित होते. परंतु, गमावलेल्या संधींचा फटका त्यांना बसला. पेनल्टी शूटआऊटवर कोलवाने सरस खेळ दाखवत बाजी मारली. सामन्याच्या पहिल्या पंधरा मिनिटातच असोल्डाला आघाडीची संधी प्राप्त झाली होती. दुर्देवाने वितोरिनो फर्नांडिस याने लगावलेला फटता पोस्टला आदळून बाहेर गेला. संपूर्ण सामन्यात कोलवा संघाला असोल्डाच्या वेगासमोर टिकाव धरता आला नाही. परंतु, नशिबानेदेखील असोल्डाची साथ दिली नाही. सनी फर्नांडिस, इरफान याडवड यांचे प्रयत्नदेखील गोलपोस्टला लागून बाहेर गेल्याने असोल्डाच्या समर्थकांमध्ये निराशा पसरली. निर्धारित वेळेत गोलशून्य कोंडी फोडता न आल्याने टायब्रेकरचा अवलंब करावा लागला. टायब्रेकरवर कोलवाकडून मॅक्सन फर्नांडिस, बाला हिलारियो व कबीरखान यांनी तर असोल्डाकडून केवळ मायरन फर्नांडिसने गोल केला. क्रुझ गोम्स, सनी फर्नांडिस व ज्युलियो फर्नांडिस यांनी गोलबारवरून चेेंडू मारत सामना कोलवाला बहाल केला.

बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी दिएला फर्नांडिस, मिनिनो दी बांदर, अँथनी माम फर्नांडिस, झेवियर परेरा, अँथनी पांगो, जॉन डीसिल्वा, कॉस्मे ऑलिवेरा कुस्तोदियो फर्नांडिस, फ्रेंकी फर्नांडिस, आर्नाल्ड कॉस्ता, अँडी फेर्राव व कॉस्टान्टिनो क्रास्टो यांच्या उपस्थितीत बक्षिसांचे वितरण केले.

विजेत्या सेंट अँथनी कोलवाने ४० हजार रुपये व करंडकाची कमाई केली तर असोल्डाला ३० हजार रुपय व करंडकावर समाधान मानावे लागले. क्लबचे अध्यक्ष जाजू फर्नांडिस यांनी उपस्थितांचे स्वागत केले व त्यांनीच आभार मानले. अँथनी रॉड्रिगीस यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. बाणावलीतील फुटबॉल क्षेत्रासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल रोनी दिनिज यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

वैयक्तिक बक्षिसे ः स्पर्धेतील सर्वोत्तम बचावपटू ः युझाबियो फर्नांडिस (रोझमन क्रुझ नागवा), स्पर्धेतील सर्वोत्तम आघाडीपटू ः इरफान याडवड (सेंट अँथनी असोल्डा), स्पर्धेतील सर्वोत्तम गोलरक्षक ः जॉन्सन फर्नांडिस (असोल्डा), स्पर्धेतील सर्वोत्तम मध्यरक्षक ः नेल्सन गोम्स (सेंट अँथनी कोलवा), स्पर्धावीर ः फ्रान्सलान कुर्रेया (कोलवा), अंतिम सामन्यातील पहिला गोल ः मॅकसन फर्नांडिस (कोलवा), अंतिम सामन्यातील सर्वोत्तम बचावपटू ः डॅनिलसन फर्नांडिस (कोलवा), अंतिम सामन्यातील सर्वोत्तम मध्यरक्षक ः सुकूर फर्नांडिस (असोल्डा), अंतिम सामन्यातील सर्वोत्तम गोलरक्षक ः वालेरियन डिसा (कोलवा), अंतिम सामन्यातील सर्वोत्तम आघाडीपटू ः कॅरी वाझ (असोल्डा), बगलेतील सर्वोत्तम खेळाडू ः मायरन फर्नांडिस (असोल्डा), शिस्तबद्ध संघ ः कुडतरी जिमखाना, सामनावीर ः कबीर खान (कोलवा).