सॅल्यूट… त्या असीम धैर्याला!

  • पौर्णिमा केरकर

‘ऑपरेशन विजय’ची असीम धैर्यगाथा ही तमाम भारतीय नागरिकांसाठी अभिमान- स्वाभिमानाची गोष्ट आहे. हा अभिमान कारगिलच्या भूमीत पाय ठेवताक्षणी शरीरातील नसनस रोमांचित करतो. तो अती थंड बर्फाळ प्रदेश पाहताना आमचे जवान या अशा कडाक्याच्या थंडीत कसे बरे लढले असावेत?

२०१८ सालचा मे महिना. लेह-लडाख ते श्रीनगर-द्रास-कारगिलमार्गे असा प्रवास करायचा होता. आजपर्यंत देशाच्या विविध राज्यांतील ग्रामीण भागांत प्रवास केलेला आहे. कधी संशोधनाच्या निमित्ताने, तर कधी पर्यटनाचा दृष्टिकोन ठेवून. असे असले तरी हा प्रवास वेगळा होता. इथे पर्यटन नव्हते की संशोधनही नव्हते. अर्थात अभ्यास, संशोधन, विचारमंथन आणि सतत नवं काहीतरी जाणून घेत स्वतःला उन्नत करायचे ही प्रक्रिया चालूच असते. परंतु हा प्रवास वेगळा होता, यासाठी की मला लेह-लडाख या प्रदेशाच्या शैक्षणिक क्षेत्रात ज्या माणसाने काम केले त्या सोनम वांगचुकविषयी उत्सुकता होती. गुलाबी, पिवळ्या, जांभळ्या, राखाडी, निळ्या इ. रंगरंगांच्या छटांनी विनटलेला हा प्रदेश. इतर राज्यांत डोळ्यांना सुखावणारा हिरवा रंग इथे दिसत नाही. थंड वाळवंट अशीच या प्रदेशाची ओळख! इथे फक्त दगड, माती, रेती, दर्‍या, डोंगर… सगळाच खडतर प्रवास. पण एवढा हा शुष्क प्रदेश असूनही सांस्कृतिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवशाली आहे. इथे हिरवा निसर्ग नसेल परंतु इथल्या लोकमानसाचे हृदय मात्र चिरतरुण, चैतन्यदायी आहे. संघर्ष हे त्यांच्या जगण्याचे दुसरे नाव.

पेंगॉंग तलावाचे आरसपानी सौंदर्य इथल्या व्यक्तिमनात प्रतिबिंबित झालेले अनुभवता येते. या सौंदर्याला आत्मसन्मान आणि सात्विकतेची किनार आहे. लेह-लडाखहून भारताचे नंदनवन असलेल्या श्रीनगरला भेट द्यायची होती. इथल्या रक्तरंजित इतिहास, वर्तमानाचा विचार करता असंख्य दृश्ये नजरेसमोर तरळत असतानाच द्रास-कारगिलचा तो परिसर, ती धैर्याची उंचच उंच गिरिशिखरे डोळ्यांत भरून घ्यायची होती. ‘ऑपरेशन विजय’च्या शिल्पकारांना सलाम करायचा होता. ज्या भूमीचे डोळ्यात प्राण आणून आमच्या विजयवीरांनी रक्षण केले, ज्या मातीत भारतमातेच्या वीर सुपुत्रांचे रक्त समर्पित झाले होते, त्या मातीला मस्तकी लावायचे होते. त्यांच्या त्यागासमोर मी किंचितही नाही, हे मलाही पक्के माहीत आहे. असे असतानाही तुमच्या-आमच्या सर्वांच्याच भविष्यासाठी ज्या कोवळ्या, तरुण जीवांनी स्वतःचा वर्तमान हसत हसत मातृभूमीला अर्पण केला, त्या असंख्य जवानांप्रतीची कृतज्ञता प्रत्यक्षात या भूमीत पाऊल ठेवून अभिव्यक्त करायची होती.

श्रीनगर ते लेह यांना जोडणारा १-डी हा राष्ट्रीय महामार्ग. कारगिलमधून पुढे श्रीनगरला जाताना याच मार्गाने प्रवास करावा लागतो. एरव्ही कारगिल काहीसे अलिप्त होते, परंतु या राष्ट्रीय महामार्गामुळे हा भाग उर्वरित देशांशी जोडला गेला. ‘ऑपरेशन विजय’ची असीम धैर्यगाथा ही तमाम भारतीय नागरिकांसाठी अभिमान, स्वाभिमानाची गोष्ट आहे. हा अभिमान कारगिलच्या भूमीत पाय ठेवताक्षणी शरीरातील नसनस रोमांचित करतो. तो अती थंड बर्फाळ प्रदेश पाहताना आमचे जवान या अशा कडाक्याच्या थंडीत कसे बरे लढले असावेत? ते कधी उठायचे? काय खायचे? त्यांना रात्रीची झोप तरी यायची का? झोपायला मिळाले तरी होते का? तो आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असेल का? त्याचं स्वतःचं मूल, त्याची बायको, त्याचा संसार असे काहीबाही त्याच्या मनात विचार येत असतील का? आम्ही आमच्या घरात परिवारासोबत सर्व सण-उत्सव साजरे करत आनंदाने व्यतीत करीत असताना हे जवान मात्र देशाच्या सीमेवर तैनात राहून आमचे रक्षण करतात. तेव्हा येतात का आमचे डोळे त्यांच्या आठवणीने भरून? राष्ट्रीय सण-उत्सव ही सुट्टी असते आपली मौजमजा करण्यासाठी, अन् त्या तिथे दूर पाकिस्तान आणि आता चीनबरोबर आपल्या जीवाची बाजी लावताना आमचे जाबाज जवान अतुलनीय धाडस दाखवितात. कसं जीवन जगत असतील ते? विचार तरी येतो का आपल्या मनात?
सतरा-अठरा हजार फूट उंचीवरील सरळसोट संपूर्णपणे बर्फाने आच्छादलेले डोंगरकडे… कधी दोर पकडून तर कधी निसरड्या बर्फावरून चालत जाताना पाठीवरून वाहून न्यावी लागणारी युद्धसामग्री आणि त्यातच शत्रूकडून अखंडितपणे चालूच असलेला गोळ्यांचा वर्षाव… काय असावे त्यांचे धाडस! पुस्तकातील युद्धस्य कथा रम्य वाचून जवान नाही कळणार, एकदा तरी अगदी कारगिल युद्धस्मारकाला भेट द्यायलाच हवी.

या डोंगरावर गुरे राखायला गेलेल्या धनगराकडून भारतीय सैन्याला पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे कळले. ते दिवस १९९९ च्या मे महिन्याचे होते. त्यानंतर सैन्याने परिसराची टेहळणी केली व पुढे प्रत्यक्षात युद्ध! हे युद्ध सलग साठ दिवस चालले. त्यात आपले शेकडो जवान हुतात्मा झाले. १४ जुलैला ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी झाला. मात्र पाकिस्तानी सैन्याने २६ जुलै या दिवशी आपला पराभव मान्य केला. हाच दिवस विजय दिवस! तमाम भारतीयांसाठी या दिवसाचे तेवढेच महत्त्व आहे. योगेंद्रसिंग यादव, कॅप्टन विक्रम बत्रा, संजयकुमार, कॅप्टन मनोजकुमार पांडे हे तर विजयाचे शिल्पकार!
त्यांनी गाजविलेले पराक्रम ऐकता, वाचताना मनावर शहारे उमटतात. ‘शत्रूला चारी मुंड्या चित करण्यापूर्वी जर मृत्यू माझ्याकडे आल्यास मीच अगोदर मृत्यूला ठार करेन’ असे बोलून ते स्वतःच्या अतुलनीय धाडसाने कृतीत आणणार्‍या मनोजकुमार पांडे यांचे वय त्यावेळी अवघे चौविस वर्षांचे होते. एवढे कोवळे वयोमान असलेल्या तरुणाकडे हे धाडस कोठून आले? मरण समोर असतानाही ‘सर, ये दिल मॉंगे मोअर’ असे म्हणणारे विक्रम बत्रा शत्रूसाठी ‘शेरशहा’ होते.
कारगिलच्या ज्या परिसरात हे युद्ध झाले तिथे आता ‘कारगिल स्मारक’ झाले आहे. पर्यटकांसाठी ही जागा आता खुली करण्यात आली आहे. युद्धात शहीद झालेल्या सर्व सैनिकांच्या, सेनाधिकार्‍यांच्या स्मरणशीला त्यांच्या नावासकट तिथे पाहायला मिळतात. अनेकजण भेटी देतात, फोटो काढतात, सेल्फी घेतात आणि घरी परततात. सैनिकांनी केलेल्या त्यागासाठी चुकचुकतात. मनातल्या मनात वाईट वाटून घेतात खरे, परंतु नागरिक म्हणून जी कर्तव्ये समाज-देशाप्रती पार पाडायची असतात ती मात्र सोयीस्कर विसरून जातात.

द्रास शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर टायगर हिलच्या दिशेने तोलोलिंग टेकडीच्या पायथ्याशी श्रीनगर ते लेह या महामार्गाच्या शेजारीच या स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. लढाईच्या दिवसांत सोडाच, पण सैनिकांचे रोजचे जीवनच किती खडतर आहे याची प्रचिती या जागांना भेटी दिल्यावर कळून चुकते. पालक सांगतात म्हणून मुलगा सैन्यात भरती होणार नाही. तिथे त्याची आंतरऊर्मी महत्त्वाची. त्याला आतून वाटतं म्हणूनच तो हे व्रत स्वीकारतो. जाणूनबुजून त्याने मृत्यूशी गाठ बांधून घेतलेली असते. वादळ-वारा-डोंगर-टेकड्यांशी सख्य जुळविलेले असते. मातृभूमीला मुलं बहाल करणार्‍या पालकांची हृदये विशाल असायला हवीत. ‘आम्ही सीमेवर नाही, आम्ही सैनिकही नाही आहोत. असतो तर दिले असते देशासाठी प्राण’ असे म्हणून जबाबदारी टाळता येत नाही. ती टाळता कामा नये. आम्ही प्रत्यक्ष सैनिक नसलो तरी या देशाचे नागरिक तर आहोत, म्हणजे एका अर्थाने सैनिकच! ते तिथे सीमेवर सतर्क राहून आमचे रक्षण करतात तर मग आपली जबाबदारी आहे समाज आदर्श करण्याची. देशाला नुकसान होईल असे आपण काही करता कामा नये. सैनिक गरीबच राहातो, तो पैसा करत नाही. आपण संपत्ती गोळा करताना देशविघातक कामे करतो. बाकी काही नाही तरी आपण चांगले सुहृदयी नागरिक तर होऊ शकतो! ज्या देशासाठी असंख्य तरुण आपले यौवन कुर्बान करतात त्या देशावर आपण मनःपूर्वक प्रेम तर करू शकतो! समाजातील जबाबदार घटक, पालक वगैरेंनीही मुलांमध्ये या बीजांचे रोपण करून त्यांची मशागत करता येते. ‘तुला लष्कराच्या भाकर्‍या भाजायच्या आहेत का?’ अशी खोचकता बाजूला सारून आपण मजबूत तटबंदीत सुरक्षित आहोत. त्यावर आपले जवान रात्रंदिवस पहारा करतात. या खर्‍याखुर्‍या महानायकांना आठवूया. त्यांची स्मारके पाहून नुसतीच हळहळ व्यक्त न करता त्यांचे शब्द अंतःकरणात कोरून ठेवूया-
माघारी जेव्हा तुम्ही परताल तेव्हा ओळख द्या आमची त्यांना आणि सांगा, तुमच्या ‘उद्या’साठी आम्ही आमचा ‘आज’ दिला!