ब्रेकिंग न्यूज़

‘सूर जहॉं’ – संगीताची आगळी पर्वणी

  • नितिन कोरगावकर

गोवा शासनाच्या संस्कृती संचालनालयाने कला अकादमी गोवा व बांगला नाटक डॉट कॉम यांच्या सहयोगाने अकादमीच्या मा. दिनानाथ कला मंदिरात आयोजित केलेल्या सूर-जहॉं विश्‍वशांती संगीत महोत्सवात पहिल्या दिवशी फिलंड येथील चार महिला कलाकारांनी सादर केलेला तुलेतार व हंगेरीच्या कलाकारांच्या मुझसिकास कार्यक्रमाने रंग भरला.

तुलेर फिनीश पुराणातून आले आहे. हा गानवृंद फिलंडच्या चार महिलांनी २०१२ मध्ये सुरू केला व त्या रचना स्वतः संगीतबद्ध करून गातात. त्यात आवाज स्वरलगावांचे वैविध्य आहे. अमेरिकन हिप-होपपासून दक्षिण आशिया लोकसंगीतापर्यंतचा आविष्कार त्यांच्या सादरीकरणात आहे. वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज त्यांनी तोंडाने काढून सादर केलेल्या रचनेला तर रसिकांची उत्स्फूर्त दाद लाभली.

मुझसिकास हे लोकसंगीत गेली चार दशके सादर होत आहे. त्यात संगीताचे आगळेपण होते. यात विश्‍वसंगीत, क्लेझमेर, जॅझ आदींचा संगम होता. पारंपरिक हंगेरीयन लोकसंगीताबरोबरच बारटोक, कोडाली, कुरटॅग आदी शास्त्रीय रचनांचा मेळ त्यांनी साधला होता. मुझसिकासला प्रतिष्ठेचा वोमेक्स पुरस्कार लाभला आहे. त्यात हंगा काक्सो यांनी गायन केले तर इस्तवान यांनी नृत्य केले. स्लोविन्स्का पोलंड येथील या कार्यक्रमात जोअन्ना स्लोविन्स्का यांनी गायन आणि व्हायोलीन वादनाच्या कौशल्याने रसिकांना अक्षरशः डोलविले. जासेक हलास यांनी ऍकार्डियन व काही वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांची साथ करत रंग भरला. त्यांच्या पत्नी आलिक्जा खोरो मानन्सका हलास यांनी ड्रम व गार्डोनची साथ दिली. जोअन्ना यांनी रसिकांना आपल्या गायन-वादनात ताल धरायला लावून तसेच ओई दन्ना दन्ना दाना दन्नादा… हे गीत गायला लावून त्यांनाही आनंद दिला. अमिताव भट्टाचार्य यांनी सूत्रसंचालन केले.
दुसर्‍या दिवशी झालेल्या बंगाल-गोवा कार्यक्रमात देबालिना भौमिक यांनी आपल्या गानविष्काराने बहार आणली. गिरीश ख्यापा (गायन व दो तारा वादन), मोहन ताती (बासरी), एलविस लोबो (गिटार), कार्लोस गोन्साल्विस (डारबुका, काहोन) खोकन दास (ढोल), तीर्थ भट्टाचार्य (पारंपरिक वाद्य) यांनी रंगतदार साथ दिली. बाऊल संगीताचा त्यात आविष्कार होता.

चिरो दिन कंचा बशे खंचा थकबे ना… या रचनेद्वारे देबोलिना यांनी एकोपा आणि शांतीचा संदेश दिला. आम्ही सर्व एक ना एक दिवस स्वर्गवासी होणारच आहोत. आनंदी रहा, एकत्र रहा असा या गीताचा अर्थ होता. आगे की शुंदोर दिन काताईताय… ही आर्त रचना रसिकांना मनाला थेट भिडली. आपण सर्व एक आहोत… असा गीताचा मथितार्थ होता. सेनेगल येथील चेईखलो या कार्यक्रमाने दुसर्‍या दिवशीच्या कार्यक्रमांचा समारोप झाला.
तिसर्‍या दिवशी इटली व दिल्लीच्या कलाकारांच्या कार्यक्रमाने समारोप झाला.