सुवर्ण महोत्सवी इफ्फी थाटात साजरा करणार : जावडेकर

सुवर्ण महोत्सवी इफ्फी थाटात साजरा करणार : जावडेकर

>> गोवा हेच इफ्फीचे कायम स्थळाबाबत दिली ग्वाही; सात शहरांमध्ये रोड शोचे आयोजन करणार

इफ्फी महोत्सवाला यंदा ५० वर्षे पूर्ण होत असल्याने यंदाचा इफ्फी थाटामाटात साजरा करण्याचा निर्णय केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पणजीत काल झालेल्या इफ्फीच्या सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर पणजीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच सुकाणू समितीचे सदस्य ए. के. बीर, मधुर भंडारकर, शाजी करुण, राहूल रवैल, रवी कोठारा व मंजू बोरा यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

यंदाच्या इफ्फी हा सुवर्ण महोत्सवी इफ्फी असल्याने ह्या महोत्सवाच्या आयोजनात कसलीही कसर राहू द्यायची नाही, असा निर्णय आम्ही घेतला आहे, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर यंदा ऑस्कर पुरस्कार समितीचे चेअरमन जॉन बेली यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यंदा रशिया महोत्सवाचा भागीदार देश
यंदाच्या इफ्फीचा रशिया हा भागीदार देश (सहकारी राष्ट्र) असेल, अशी माहितीही जावडेकर यांनी यावेळी दिली.
यंदाच्या इफ्फीची चांगली प्रसिध्दी व्हावी यासाठी यावेळी देशातील सात शहरांत इफ्फीसाठीच्या ‘रोड शो’चे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही जावडेकर यांनी दिली. हैदराबाद, बेंगलोर, मुंबई, चेन्नई, त्रिवेंद्रम यासह एकूण सात शहरांत या ‘रोड शो’चे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

गांधी प्रदर्शन
महात्मा गांधी यांचा जन्म झाला त्याला यंदा १५० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त यंदा गांधीजींच्या कार्याची माहिती देणारे एक प्रदर्शन इफ्फीत भरवण्यात येणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.
त्याशिवाय चित्रपट निर्मितीसाठीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणारे एक प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
यंदाच्या इफ्फीसाठी भारतीय फिल्म इन्स्टिट्युट तसेच सत्यजीत रे फिल्म इन्स्टिट्युटच्या विदयार्थ्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहितीही जावडेकर यानी दिली.

वाढीव सिनेमागृहे
इफ्फीला सिने रसिकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन यंदा इफ्फीसाठी वाढीव सिनेमागृहांची सोय करण्याचा विचार असून त्यासाठी काही खासगी चित्रपटगृहांच्या मालकांशी बोलणी करण्यात येणार असल्याची माहितीही जावडेकर यांनी दिली.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इफ्फीचे यशस्वीपणे आयोजन करण्यासाठी सर्व ती मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे, असेही जावडेकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी जावडेकर यांच्याहस्ते यावर्षीच्या इफ्फीसाठीच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.

दरम्यान मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच समितीच्या अन्य सदस्यांनी नंतर इफ्फीचा उद्घाटन व समारोप सोहळा जेथे होत असतो ते डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम, कला अकादमी व आफनॉक्स ह्या इफ्फी स्थळांची पाहणी केली.
यावेळी इफ्फी सगळ्यांच्या स्मरणात राहील, अशा प्रकारे तिचे आयोजन केले जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी काल सांगितले.

इफ्फीसाठीच्या साधन सुविधात आवश्यक ती वाढ व सुधारणा करण्यात येणार असल्याचे त्यानी यावेळी स्पष्ट केले. पणजीबरोबरच अन्य काही शहरातही इफ्फीनिमित्त चित्रपट दाखवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
गोवा हेच इफ्फीचे कायम स्थळ
गोवा हेच यापुढेही इफ्फीसाठीचे कायम स्थळ राहणार असल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले. इफ्फीच्या आयोजनात कोणतीही कसर बाकी राहू नये, यासाठी इफ्फीसाठीच्या साधनसुविधात आवश्यक ती वाढ करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.