ब्रेकिंग न्यूज़

सुर्लचा आदर्श

आपल्या गावामध्ये दारूचा भस्मासुर नको या निर्धाराने उभ्या ठाकलेल्या सुर्ल – सत्तरीच्या ग्रामस्थांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. सुर्ल हा गोवा – कर्नाटक सीमेवरचा सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरचा छोटासा पण अतिशय सुंदर गाव. कर्नाटक सीमेवर वसल्याने आणि कर्नाटकाच्या तुलनेत गोव्यात दारू स्वस्त असल्याने गोव्याला पर्यटनासाठी येणारे आणि गोव्याहून कर्नाटकात परतणारे दारूबाज सुर्लमध्ये मदिराप्राशनासाठी, मद्य खरेदीसाठी हमखास थांबतात. शिवाय पावसाळ्यात येथील चोर्ला घाटातील नयनरम्य धबधबे म्हणजे तर मद्यपींसाठी पर्वणीच. त्यामुळे दर पावसाळ्यात मद्यपींची सुर्ल – चोर्लाच्या दिशेने रीघ लागते. त्यातूनच अबकारी खात्याच्या वरदहस्ताने या गावामध्ये मद्यालये आणि मद्यविक्रीची दुकाने फोफावली. पस्तीस घरांच्या वाड्यावर अकरा मद्यालये एवढा हा अनाचार माजला आहे. स्थानिक ग्रामस्थांना, विशेषतः महिलांना हिंडणे फिरणे कठीण व्हावे अशा तर्‍हेचा पावसाळ्यात चोर्ला घाटातील धबधब्यांची मजा लुटायला येणार्‍या मद्यपींचा हैदोस सुर्लच्या परिसरात चालतो. या भागातील ग्रामीण महिलांना हिंडणे फिरणे कठीण बनते. बेधुंद पर्यटकांनी दारू पिऊन दंगामस्ती करण्याचे प्रकार दरवर्षी या भागात घडत असतात. छोटे मोठे अपघातही नित्याचे झाले आहेत. आजवर प्रत्येक वर्षी त्याच्या बातम्या होत आल्या, परंतु परिस्थिती जैेसे थेच राहिली. आता सुर्ल गावच स्वतःहून या अनिष्ट गोष्टींविरुद्ध निर्धाराने उभा ठाकला आहे आणि म्हणूनच ही सर्व ग्रामस्थ मंडळी निश्‍चितपणे अभिनंदनास पात्र आहेत. मद्यपींची दंगामस्ती आणि हुल्लडबाजी रोखण्यात पोलीस यंत्रणा असमर्थ ठरत आली आहे. त्यामुळे स्वतः उभे राहिल्याशिवाय या प्रकारांना आळा बसणार नाही या निर्धाराने सुर्लची गावकरी मंडळी – मुले – महिला दारूबंदीच्या निर्धाराने एकत्र आल्या, त्यांनी गावात बैठक घेतली आणि गावामध्ये नुकतीच सह्यांची मोहीम राबवण्यात आली. तिथल्या चाळीस विद्यार्थ्यांनी सरकारला देण्यासाठी एक निवेदनही तयार केले आहे. महिला देखील या लढ्यात पुढे सरसावल्या आहेत. सर्वांनी मिळून आपला गाव दारूबंदीयुक्त गाव घोषित केला आहे आणि आपल्या लोकप्रतिनिधींना सहकार्याचे साकडे हे लोक घालणार आहेत. खरोखर अवघ्या गोव्याने आदर्श घ्यावा अशी ही घटना आहे. वास्तविक सुर्ल हा गोव्याच्या सीमेवरचा छोटासा, आजवर उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित राहिलेला गाव. जनगणनेच्या सरकारी आकडेवारीनुसार या गावामध्ये अत्यल्प साक्षरता आहे. पुरुष साक्षरतेचे प्रमाण आहे पंधरा टक्के आणि महिला साक्षरतेचे प्रमाण आहे चोवीस टक्के. परंतु हे झाले सरकारी आकडे. या मंडळींनी हा जो निर्धार केला आहे तो पाहिला तर या मंडळींपैकी अनेकजण भले सरकारच्या नजरेतून साक्षर नसले, तरी सुशिक्षितांना लाजवेल असे काम त्यांनी करून दाखविले आहे असेच म्हणायला हवे. गोवा मुक्तीनंतर दुर्दैवाने वेळोवेळी येथील सरकारांची प्राधान्ये चुकत गेली. पर्यटनाच्या आशेने मद्याचा महापूर रस्तोरस्ती वाहवला गेला. गावात मंदिरे नसतील तेवढी मद्यालये आली. बेवड्यांच्या फौजा गावोगावी तयार झाल्या. अनेक राजकारण्यांनी कार्यकर्त्यांना दारू पाजली की ते वाट्टेल ते करायला तयार होतात हे जाणले आणि तरुणाईच्या या मद्यासक्तीचा फायदा उठवीत निवडणुकाही जिंकल्या. गोव्याच्या गावोगावी असलेली मद्यालये हीच गोव्याची हळूहळू ओळख बनत गेली. रस्तोरस्ती ती फैलावत गेली. गोव्यात यायचे म्हणजे दारू पिण्यासाठीच यायचे असा समज झालेली टोळकी अजूनही तिन्ही त्रिकाळ गोव्याकडे धाव घेत असतात. बेफाट दारू पितात. समुद्रात बुडूनही मरतात. हे लोण केवळ पर्यटकांपुरते उरले नाही. स्थानिकांमध्येही अर्थातच व्यसनाधीनता फैलावली, कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त झाली, कित्येक संसारांची वाताहत झाली. प. पू. ब्रह्मानंद स्वामींंनी व्यसनमुक्तीचा विडा उचलला आणि तळागाळात मोठे काम केले, अल्कोहॉलिक ऍनोनिमससारखी संस्थाही गोव्यात गेली कित्येक वर्षे कार्यरत आहे. परंतु तरीही मद्याचा महापूर ओसरताना दिसत नाही. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यांच्या कडेची मद्यालये व मद्यविक्रीची दुकाने हटविण्याचा आदेश दिला, तेव्हा राज्यातील लिकर लॉबी त्याविरुद्ध उभी ठाकली आणि सरकारच्या मदतीने रस्त्यांचा महामार्गाचा दर्जाच जिल्हा रस्त्यांत बदलून त्यांनी रातोरात अभय मिळवले. हे अशा प्रकारचे सगळे साटेलोटे समोर दिसत असूनही सुर्लची जनता समाजाला अनिष्ट आणि गावाच्या हिताला बाधक अशा या भस्मासुराविरुद्ध एकजुटीने उभी ठाकते ही घटना गोव्याच्या सामाजिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना आहे. डॉक्टरांच्या मते गोव्यात महिलांमधील व्यसनाधीनतेचे प्रमाणही गेल्या दशकात पूर्वीपेक्षा दुप्पट झाले आहे आणि मुलांमध्ये दारू पिण्याचे सरासरी वयही वीसवरून बारापर्यंत खाली आले आहे. ही आकडेवारी जर खरी असेल तर नक्कीच चिंताजनक आहे. सुर्लने दारूबंदीच्या दिशेने खंबीर पाऊल उचलले आहे. केवळ महसुलासाठी अनिष्ट गोष्टींचा पुरस्कार करणार्‍यांना सुर्लच्या ग्रामस्थांनी लगावलेली ही सणसणीत चपराक आहे!