सुरक्षा गरजेची

बेंगलुरूतील उच्चभ्रूंच्या शाळेमध्ये सहा वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्कार झाला होता अशा निष्कर्षाप्रत तेथील पोलीस आले आहेत. गेले अनेक दिवस गाजणार्‍या या प्रकरणाला मिळालेले हे नवे वळण आहे. पोलिसांनी या प्रकरणात महंमद मुस्तफा या स्केटिंग इन्स्ट्रक्टरला अटक केली होती. पण प्रत्यक्षात लालगिरी इंद्रगिरी आणि वासीम पाशा या दोघा जिम इन्स्ट्रक्टरांचा या गुन्ह्यात हात असल्याचे नवे पुरावे पोलिसांना मिळाले आणि त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे आधी अटक झालेला महंमद मुस्तफा हा निर्दोष होता का आणि जनतेच्या आणि प्रसारमाध्यमांच्या दबावाखातर त्याला गजाआड केले गेले होते का असा प्रश्न साहजिक उपस्थित होतो. मुस्तफा याची पार्श्वभूमीही संशयास्पद आहे आणि एका शाळेतून गैरवर्तनाबद्दल त्याला काढून टाकण्यात आले होते. त्याच्या मोबाईलवर आणि लॅपटॉपवर अश्लील क्लीप आढळून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे सारे पाहिले तर बेंगलुरूच्या त्या शाळेच्या हायफाय देखाव्यामागचा काळाकुट्ट अंधार अस्वस्थ केल्याखेरीज राहात नाही. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये काय घडू शकते त्याची ही विदारक कहाणी सुन्न करणारी आहे. ज्या सहा वर्षीय बालिकेवर हे अत्याचार झाले तिच्यावर कोणता मानसिक आघात झालेला असेल याची कल्पना आपण करू शकतो. आपल्यावर कोणी अत्याचार केले, त्याची ओळख पटवण्यासही ही मुलगी तयार नव्हती, एवढा मोठा मानसिक धक्का तिला बसलेला आहे. तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवली त्यातही काही तपशिलाचा फरक राहून गेला आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपी जरी पकडले गेले असले, तरी त्यांना त्यांच्या अमानुष कृत्याची सजा मिळण्याएवढे सबळ पुरावे गोळा करणे हे पोलिसांसाठी अत्यंत आव्हानात्मक असेल. ज्या दिवशी सदर घटना घडल्याचे तक्रारीत नमूद केलेले होते, त्या दिवशी तो प्रकार घडला नव्हता, तर त्याच्या आधी दुसर्‍या कुठल्या तरी दिवशी घडला होता. ज्या खोलीत तिच्यावर अत्याचार झाले, तेथे सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. इतर मुले बाहेर गेल्यावर तिला थांबायला सांगण्यात आले आणि तिच्यावर अत्याचार झाले असे आतापर्यंतच्या तपासात आढळून आले आहे. ज्या विश्वासाने पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवतात, त्या विश्वासालाच समूळ तडा पाडणारे हे प्रकरण आहे आणि त्यामुळे देशभरातील पालकांच्या मनामध्ये एकूण शैक्षणिक व्यवस्थेविषयीच अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोव्यात गतवर्षी वास्कोच्या शाळेत मुलीवर स्वच्छतालयात लैंगिक अत्याचार झाले, तो आरोपी अजूनही मोकाट आहे. त्याचा थांगपत्ता लागू शकत नाही, त्याला त्या शाळेची बेफिकिरी सर्वाधिक कारणीभूत आहे. बेंगलुरूच्या प्रकरणातही हीच बेफिकिरी दिसून आली आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर गुन्हेगाराला गजाआड करण्याऐवजी आपल्या शाळेचे नाव बदनाम होऊ नये यासाठी या प्रकरणावर पडदा पाडण्याचाच आटापिटा शाळेच्या व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक केला. सारे सकृतदर्शनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, ही बाब अतिशय गंभीर आहे. बेंगलुरूमध्ये जागृत पालकांनी सातत्याने निदर्शने करीत आवाज उठवला, माध्यमांनी हे प्रकरण लावून धरले म्हणून निदान पोलीस तपासाला चालना मिळाली, अन्यथा हे प्रकरण कधीच फाईलबंद झाले असते. अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शाळांच्या व्यवस्थापनांनी आपली जबाबदारी आधी ओळखली पाहिजे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपली नव्हे म्हणून हात झटकता येणार नाहीत. पालकांनी आपल्या मुलांना शाळेत सोडले की पुन्हा ती शाळेबाहेर जाईपर्यंत तरी त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी शाळांच्या व्यवस्थापनांवर असायला हवी. सीसीटीव्ही कॅमेरे लावा ही साधी सूचनाही अनेक शाळांनी आर्थिक कारणे दाखवून अद्याप अंमलात आणलेली नाही. ही बेफिकिरी निष्पाप मुलांना संकटात लोटू शकते. अनेक शाळांमध्ये पुरेसे सुरक्षा रक्षकही नेमले गेलेले नाहीत. एकीकडे दहशतवादाचे संकट देशावर घोंगावते आहेच. शाळांतील मुलांना ओलीस धरण्याचे प्रकार विदेशांत घडले आहेत. त्यामुळे शाळांमधील सुरक्षा या विषयाकडे प्रत्येक राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष पुरविणे आवश्यक आहे. एखादी दुर्दैवी घटना ही ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ करायला पुरेशी ठरली पाहिजे.

Leave a Reply