सुरंगा लकमलचे पुनरागमन

>> श्रीलंकेचा झिंबाब्वे दौरा
कुशल परेराला विश्रांती

झिंबाब्वेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका संघात जलदगती गोलंदाज सुरंगा लकमल याचे पुनरागमन झाले आहे. हरारे येथे दोन्ही सामने होणार असून पहिला सामना १९ जानेवारीपासून तर दुसरा सामना २७ पासून खेळविला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने निलंबन उठवल्यानंतर प्रथमच एखादा संघ झिंबाब्वे दौर्‍यावर कसोटीसाठी जाणार आहे. डेंग्यूमुळे लकमल याला श्रीलंकेचा ऐतिहासिक पाकिस्तान दौरा मुकला होता. वनडे व टी-ट्वेंटीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी स्फोटक फलंदाज कुशल परेरा याला विश्रांती देण्याचा निर्णय मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी घेतला आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये झिंबाब्वेचा संघ बांगलादेश दौर्‍यावर कसोटींसाठी गेला होता. यानंतर मागील वर्षी जुलै महिन्यात त्यांच्या क्रिकेट मंडळावर आयसीसीने राजकीय हस्तक्षेपाचे कारण देत निलंबनाची कारवाई केली होती. परंतु, केवळ तीन महिन्यांतच हे निलंबन मागे देखील घेण्यात आले होते. यापूर्वी २००५ साली आयसीसीने झिंबाब्वेचा कसोटी दर्जा काढून घेतला होता. पण, वनडे व टी-ट्वेंटीमध्ये झिंबाब्वेेचे खेळणे सुरुच होेते. २०११ साली त्यांचे कसोटीमध्ये पुनरागमन झाले होते. कामगिरीचा विचार केल्यास क्रमवारीत त्यांचा संघ ११व्या स्थानी आहे. नवख्या आयर्लंडपेक्षा केवळ एका क्रमाने ते पुढे आहेत.
श्रीलंका कसोटी संघ ः दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), ओशादा फर्नाडो, कुशल मेंडीस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंदीमल, लाहिरु थिरिमाने, धनंजय डीसिल्वा, निरोशन डिकवेला, दिलरुवान परेरा, लसिथ एम्बुलदेनिया, लाहिरु कुमारा, विश्‍वा फर्नांडो, कासुन रजिता, लक्षन संदाकन व सुरंगा लकमल.