सुट्टीतला आनंद

– सौ. पौर्णिमा केरकर

रेतीत रुतलेले खुबे स्वतः पाण्यात बसून काढण्याचे ते असीम समाधान जसे मी अनुभवलेय, तसाच खुबे काढण्याच्या नादातील भरारक, जीवावर बेतलेला प्रसंगही तेवढाच स्मरणात राहिला. त्या प्रसंगाची प्रखरता आजही आठवली की अंगावर क्षणिक काटा उभा राहतो.

वाढणारे वय… बदलणारा काळ… वेगवान स्पर्धात्मक जीवनशैली… आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सगळ्याच सुखसोयी हात जोडून दिमतीला असतानाच्या या कालखंडातही मनात सतत एक अनाकलनीय अस्वस्थता का बरं भरून राहिलेली असते… मनाची ही उदासीनता, तगमग, निराशा, तळमळ काही म्हणजे काहीच सुचू देत नाही. ही उदासीन अस्वस्थता दाटून येते ती सभोवतालचे दुटप्पी जग पाहून की हातातील कोवळा काळ निसटून जातोय म्हणून…? कळतच नाही काही… म्हणून बालपणात रमावंसं वाटतं. जीवनात असं स्वतःला कधी आपण गंभीरपणाने स्वीकारत जगत असतो का… आपण सगळेच थोडेसे घाबरट, भावूक, हळवे, कमकुवत… अपूर्णच असतो. ही अपूर्णत्वाची जाणीवच आपल्याला पूर्णत्वाचा ध्यास देणारी ठरावी. त्यासाठी अधिक स्वच्छ, पारदर्शी नजरेने भूतकाळाकडे पाहून, वर्तमानाला जुळवून घेत आठवणींशी समरस व्हावे म्हणजे मग उदासीन मनाला थोडातरी दिलासा मिळतो.
आजकाल विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात बालपण गुदमरत असताना मातीशी असलेला बालमनाचा संबंधच दुरावत चाललाय. आमची एक अशी पिढी की जिने भरभरून अनुभवलेय… मुक्त, निर्व्याज, निरागस बालपण… जिथे मनमुक्त धावण्याच्या वेगाला मर्यादा नव्हती, आभाळाला कवेत घेण्याची जबरदस्त इच्छाशक्ती… मातीत माखून घेऊन सृजनात्वाला केलेला सलाम… तळी, नदी, डोबातील मनमुराद आंघोळ, खळाळत्या ओहोळातील पाण्याच्या सोबतीने केलेला खट्याळपणा आणि त्याही सोबतीने नदीतील ‘खुबे’ काढण्याच्या संस्मरणीय आठवणी… यानी टवटवीत झालेल्या बालपणाच्या आधारानेच आताचा प्रगल्भपणाकडे चाललेला प्रवास सुसह्य होत आहे असेच राहून राहून मनात येते.
दिवाळीची सुट्टी कधी पडते आणि मळ्यात भटकण्यासाठी कधी एकदा मिळणार याची आतुरतेने आम्ही सारी मुले वाट पाहात असू. मी, लता, संजू, बाय, मधुबाला, हेमलता अशा खूपजणी असायच्या. त्यांच्यातही वयोमानाप्रमाणे गट तयार व्हायचे. माझ्या सोबतीला खूपवेळा लताच असायची. घरासमोर पसरलेला विस्तीर्ण शेतमळा वायंगणी शेती कापून झाल्यावर मोकळाच असायचा. त्याच्यातील ओल हळूहळू आत मुरायची. कापलेल्या भाताची टणक मुळे आणि हळूहळू भेगाळत जाणारी जमीन याची एक नक्षीच संपूर्ण मळ्यात तयार व्हायची. याच दरम्यान या जागेत ‘पुड्डे’ नावाचा कंदमुळाचा एक गोल आकाराचा, दुधाळ चवीचा प्रकार सापडायचा. या पुड्‌ड्यांचा शोध कोणी कसा लावला असावा हे एक न सुटणारे कोडेच होते. परंतु तिन्हीसांजेला हातात ‘कुदळ’ आणि ‘डिफळा’ घेऊन आम्हा मुलांची पलटण पुड्डे खाण्यासाठी म्हणून माळ्यात पोचायची. माती खणून मातीच्या मोठ्या डिफळ्यांच्या आत हे छोटे-छोटे गोलाकार असलेले पुड्डे व्यवस्थित काढून, त्याला लागलेली माती अंगावरील कपड्यानाच पुसल्यासारखी करून, अर्धवट स्वच्छ केलेले ते पुड्डे मातीच्या खरखरीतपणाबरोबरच खाणे व्हायचे. त्यांची पिठूळ, दुधाळ गोड चव आजही त्या आठवणींसकट जिभेवर रेंगाळत आहे.
गोड्या आणि खार्‍या पाण्याचे मीलन या सार्‍या शेतआवारात असल्याने जमीन कसदार, सुपीक बनलेली होती. त्यामुळे सरत्या नोव्हेंबरापासून विविध गावठी भाज्या, मिरची लागवडीसाठीचे ‘पोरसू’ तयार करण्याच्या कामाला जोर चढायचा. मळ्यात दिवसभर कष्टकरी जीवन वावरायचे. त्यामुळे तिथे सतत एक गजबज असायची. मळा बोलायचा आम्ही मुलांशी, लळा लावायचा. त्यामुळे त्याचा कायमस्वरूपी जिव्हाळा वाटत राहिला. याच मळ्यात वायंगणी शेतीची तयारी करताना आईबरोबर बारीक सुंगटे धरायला जाणे व्हायचे. खूप मजा यायची. एखादा मोठा पातळ कपडा घेऊन, कधी ओच्यात तर कधी दोन्ही हाताच्या पंज्यात अलगद असे हे मासे पकडले जायचे. आईकडे हे कौशल्य होते. त्यामुळे तिला असे खूप मासे मिळायचे. तिने केलेल्या ताज्या सुंगटाची कढी, तिचा दरवळ तर अवर्णनीय असाच होता.
अथांग अरबी सागराची पार्श्‍वभूमी आणि तेरेखोल नदी यांच्या मीलनाने माझ्या गावाचा परिसर सुजलाम् सुफलाम् केलेला होता. खारफुटीचे वैभव हे एक वेगळे आकर्षण माझ्या बालमनाला होते. कांदळाच्या माळा गुंथून त्यांची वेणी केसात घालणे हा तर नित्यक्रमच असे. त्याचबरोबरीने ‘खुबे’ काढण्यासाठी जाण्याचा एक खास सोहळा असायचा. सुट्टीचे दिवस, कसलेच जादा वर्ग नाहीत की ट्यूशन… त्यामुळे मनसोक्त हुंदडणे म्हणजेच बालपण होते. बारावी असो की दहावी- अभ्यासाचे दडपण असे नव्हतेच. म्हणूनच नदीत डुंबून खुबे काढून ते घरी घेऊन येणे ही अनुभवाची शिदोरी अनुभवण्यासाठी माझेच बालपण साक्षीदार ठरले याचा आजही अभिमान वाटतो. लोक समूहाने, उत्साहाने एकत्रित यायचे. बांध घालायचे, पाणी अडवायचे, विविध माशांची पैदासी व्हायची. इथे येऊन मासे काढायची मुभा सर्वांनाच होती. दिवसभरासाठीच्या गरजेपुरते मासे मिळायचे आणि तृप्त व्हायचे. जास्तीचे मिळाले तर मग नातेवाईकांना, शेजार्‍यापाजार्‍यांना दिले जायचे हे औदार्य होते. अशा या मनोवृत्तीमुळे माशांच्या पैदाशीत वर्षानुवर्षे भर पडायची. त्यात कसलेली प्रदूषण नव्हते. गरजेपुरतेच वापरायचे, तेही निसर्गाशी सलगी करूनच, हा जणू अलिखित नियमच असल्याने त्याचे उल्लंघन करण्याचे धाडस सहजासहजी कोणी करण्यास धजावत नसत. नदीतील ‘खुबे’ काढण्याच्या बाबतीतही असेच नियम लागू असायचे.
‘मळा’ हे माझ्यासाठी जसे विश्रांतीचे स्थळ होते तसेच या मळ्यातूनच बावाखानवाड्यावरून जाणारी वाट आम्हाला खुबे काढण्यासाठी न्यायची. भरती-ओहोटीची शहानिशा करूनच मोठ्यांच्या बरोबरीने आम्ही मुलेही पिशव्या, टोपल्या घेऊन मार्ग धरायचो. ओहोटी असली की कधी गुडघाभर तर कधी कमरेपर्यंत चढणारे पाणी असायचे. कधीकधी तर अगदीच पावलापुरते पाणी. त्यामुळे पाण्यात बसून दोन्ही हाताने चाचपीत खुबे काढणे व्हायचे. खुब्यांचे भरपूर पीक यायचे. काहीशा खोल पाण्यात व्यावसायिक होडी घेऊन खुबे काढायचे, तर घरात नेण्यासाठी, नातेवाईकांना देण्यासाठी टोपलीत भरून खुबे नेले जायचे. रेतीत रुतलेले खुबे स्वतः पाण्यात बसून काढण्याचे ते असीम समाधान जसे मी अनुभवलेय, तसाच खुबे काढण्याच्या नादातील भरारक, जीवावर बेतलेला प्रसंगही तेवढाच स्मरणात राहिला. त्या प्रसंगाची प्रखरता आजही आठवली की अंगावर क्षणिक काटा उभा राहतो.
खरं तर मज्जा करण्यासाठी, सुट्टीतील धम्माल म्हणूनच आई नको नको म्हणत असताना दरदिवशी मी, संजू, नवसो नाना, बाबलो, बाबल्याची आई, तुळशीदास यांच्या सोबतीने जायचेच. त्या दिवशी ठरवलेच होते, मोठ्ठी टोपली घेईन आणि सगळ्यांपेक्षा जास्त खुबे काढीन! नदीला सुकती होती. पुढे जाईपर्यंत चिखल-वाळूमिश्रित दलदल तुडवूनच जावे लागायचे. योगायोगाने खुबे खूपच मिळाले. आनंद द्विगुणीत झाला. एव्हाना सुकती वाढत गेली. आणखीन खुबे काढण्याचा मोह आवरेना. टोपली भरून गेली. मनातल्या मनातच स्वप्ने रंगवली. यातील मांसल भाग काढायचा- सुकवायचा, पावसासाठी उपयोगी पडेल. थोड्यांचे थबथबीत आई करणार. थोडे वाटून टाकायचे. या आनंदाच्या भरात टोपली दोघातिघानी मिळून माझ्या डोक्यावर उचलली. एका क्षणी तो भार मी सहज स्वीकारला. त्यात उत्साह होता, स्वप्न होते. परंतु दुसर्‍याच क्षणी वास्तव समोर उभे ठाकले. मी एक पाऊल पुढे टाकले व दुसरे पाऊल उचलण्याची तयारी केली मात्र, पाऊल उचलता उचलेना… मी अधिकाधिक डोक्यावरच्या भाराने त्या दलदलीत रूतत गेले. सगळंच ब्रह्मांड आठवलं. माझ्या बरोबरची मंडळी पुढे भरभर चालत होती. भरतीची वेळ होत आली. काळोख दाटून देत होता. मला काहीच सुचत नव्हते. मी अस्फूट किंकाळी मारली. नवसो नानाच्या लगेच लक्षात आले. त्याने मागचा पुढचा विचार न करता आपली खुब्यांची पिशवी बाजूला ठेवली. धावत येऊन माझ्या डोक्यावरील खुब्यांनी भरलेली टोपली त्याने पूर्ण ओतून टाकली. आधार देत मला दलदलीतून बाहेर काढले. खूप खूप रडले. चिखलात रुतले म्हणून नाही तर खुबे ओतले म्हणून! मी रडत असताना बाकीच्यांनी मात्र मनसोक्त हसून घेतले. एक धडा आयुष्यभरासाठी शिकले- निसर्ग देतो म्हणून ओरबाडायचे नसते… तिथेही संयम हवा!