ब्रेकिंग न्यूज़
सीबीएसई : बारावी अर्थशास्त्राची २५ एप्रिलला फेरपरीक्षा
New Delhi: Students of Class 10 and 12 raise slogans in protest against the CBSE paper leak, in New Delhi on Friday. PTI Photo (PTI3_30_2018_000017B)

सीबीएसई : बारावी अर्थशास्त्राची २५ एप्रिलला फेरपरीक्षा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ तथा सीबीएसईच्या दहावी व बारावीच्या अनुक्रमे गणित व अर्थशास्त्र विषयांच्या पेपरफुटीनंतर दोन दिवसांच्या निदर्शनानंतर काल अर्थशास्त्र विषयाची फेरपरीक्षा येत्या २५ एप्रिलला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र दहावीच्या गणित विषयाच्या पेपरफुटीप्रकरणी तपास सुरू असून त्या फेरपरीक्षेचा निर्णय १५ दिवसात घेण्यात येईल. ही फेर परीक्षा झाल्यास ती दिल्ली व हरयाणा या राज्यातच जुलै महिन्यात होणार आहे. याबाबतची माहिती काल केंद्रीय मानव संसाधन खात्याचे शालेय शिक्षण सचिव अनिल स्वरुप यांनी दिली. फेरपरीक्षा फक्त दिल्ली व हरयाणातच होणार आहेत.

या प्रकरणामुळे सीबीएसईच्या दहावी व बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांवरही मोठा ताण आला होता. आपला निषेध व्यक्त करण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी गुरुवारी तसेच काल शुक्रवारीही दिल्लीत जोरदार निदर्शने केली. काल कॉंग्रेसच्या एनएसयूआय या विद्यार्थी विभागानेही निदर्शने केली.

पेपरफुटी दिल्ली, हरयाणातच
अनिल स्वरूप यांनी याविषयी पत्रकारांना सांगितले की आतापर्यंतच्या तपासातून दहावीच्या गणित विषयाचा पेपर फुटण्याचा प्रकार दिल्ली व हरयाणा या राज्यातच घडला आहे. त्यामुळे या विषयाची फेरपरीक्षा झालीच तर ती या दोन राज्यांमध्येच घेतली जाईल व फेरपरीक्षा झाल्यास जुलैत होईल असे त्यांनी स्पष्ट केले.

विदेशातही फेरपरीक्षा नाही
पेपर फुटीचा प्रचार भारताबाहेरील सीबीएसईच्या संस्थां संदर्भात झालेला नाही. त्यामुळे विदेशातही फेरपरीक्षा होणार नाही. विदेशात सीबीएसई परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी प्रश्‍न पत्रिकाही वेगळ्या असतात अशी माहिती स्वरूप यांनी दिली. ‘देशभरातील दहावीच्या सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांना या पेपरफुटीचा फटका बसू देऊ नये असा आमचा कटाक्ष आहे’ असे ते म्हणाले. बारावीच्या परीक्षांचा संदर्भ, स्वरूप व परिक्षांचे परिणाम या सर्वांचा विचार करून आम्ही त्यांच्या फेर परीक्षेचा निर्णय घेतला आहे. खास करून बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील विविध परीक्षा द्याव्या लागणार असल्याने या विषयाच्या पेपरफुटीचे खोलवर चौकशी करण्यासाठी बराच कालावधी लागणार असल्याने लगेच निर्णय घ्यावा लागला. या सर्व प्रकरणातील दोषींना हुडकून कारवाई केली जाईल असे स्वरूप म्हणाले.सीबीएसईच्या अध्यक्षांना २८ मार्च रोजी पेपरफुटीबद्दलचा ईमेल पाठविण्यात आला होता हे खरे असले तरी तो त्यांनी सकाळी पाहिला आहे स्वरूप म्हणाले. पेपर छाननीसाठी पाठविण्यात आला. कारण इशारा मिळाला होता. मात्र परीक्षा तात्काळ थांबविणे शक्य झाले नाही असे ते म्हणाले.

हाच सर्वोत्तम पर्याय : स्वरूप
आता जो तोडगा काढला आहे तो अशा प्रकरणातील योग्य म्हणता येणार नाही. मात्र योग्य तोडगा काढणे अशक्य आहे. कारण तेवढा अवधी नाही. आम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शक्यतो सर्व प्रयत्न केले आहेत. सध्याच्या तपासातून मिळालेली माहिती त्रोटक व मर्यादित आहे आणि नेमकी काय चूक घडली याची निश्‍चिती अजून व्हायची अहे. त्यामुणे हा निर्णय हा सद्यस्थितीतील सर्वोत्तम पर्याय आहे असे स्वरूप म्हणाले.