ब्रेकिंग न्यूज़

सीएफजी ग्रुपची मुंबई सिटी एफसीत भागीदारी

>> स्पेनचा स्टार डेव्हिड विला आयएसएलमध्ये खेळणार ?

सिटी फुटबॉल ग्रुप (सीएफजी) या प्रीमियर लीग विजेत्या मँचेस्टर सिटी क्लबच्या मालक समुहाने इंडियन सुपर लीगमधील फ्रेंचायझी असलेल्या मुंबई सिटी एफसी संघात मोठी गुंतवणूक करून फ्रेंचायझीतील बहुतांश भागीदारी व नियंत्रण मिळविण्याची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आणली आहे. फ्रेंचायझीचे जवळपास २५० कोटी रुपये बाजारमूल्य असून बिमल पारेख व रणबीर कपूर यांच्या संयुक्त मालकीची ही फ्रेंचायझी आहे. फ्रेंचायझीचे मुख्य अधिकारी म्हणून इंद्रनील दास जबाबदारी सांभाळत आहेत.

२०१४ साली आयएसएलची सुरुवात झाली त्याच वर्षी पारेख व कपूर यांनी आंतरराष्ट्रीय भागीदाराच्या सहभागाबद्दल उत्सुकता दाखवली होती. सीएफजी समुहाने या वर्षाच्या सुरुवातीला आपला विस्तार जगातील वेगाने वाढत असलेल्या भारतीय फुटबॉल क्षेत्रात करण्याच्या दृष्टीने मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली होती. सीएफजीने मुंबई सिटी एफसी विकत घेतल्यास भारतीय फुटबॉल क्षेत्राचे पूर्ण रुप बदलणार आहे. काही महिन्यांपूर्वीच सीएफजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फेर्रान सोरियानो यांनी भारतातील क्लब विकत घेण्याचे संकेत दिले होते. फेब्रुवारी महिन्यात सीएफजीने चीनमधील ‘सियाचुआन जियुनूयू एफसी’ विकत घेऊन आशिया खंडातील विस्ताराला सुरुवात केली होती. सीएफजीशी संबंधित गिरोना एफसी व मेलबर्न सिटी एफसी यांनी २०१८ साली कोची येथे झालेल्या आयएसएल स्पर्धापूर्व सामन्यांत सहभाग नोंदविला होता. यात केरला ब्लास्टर्सचादेखील समावेश होता. मुंबईससिटी एफसीकडे मोर्चा वळविण्यापूर्वी सीएफजीने जमशेदपूर एफसी क्लबशी चर्चा केली होती. परंतु, स्पेनमधील दिग्गज क्लब ऍटलेटिको माद्रिदने तांत्रिक व इतर बाबींसाठी क्लबसोबत करार केल्याने सीएफजीने पुढे पाऊल टाकले नाही. सीएफजी समुहाकडे मँचेस्टर सिटीव्यतिरिक्त न्यूयॉर्क सिटी एफसी (अमेरिका), गिरोना एफसी (स्पेन), मेलबर्न सिटी एफसी (ऑस्ट्रेलिया), योकोहामा एफ मरिनोस (जपान) व ऍटलेटिको टॉर्क (उरुग्वे) हे संघ आहेत.

सीएफजी समुहाने आगामी आयएसएल मोसमासाठी स्पेनचा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू व विश्‍वविजेत्या संघातील खेळाडू डेव्हिड विला याला मार्की खेळाडू म्हणून उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. युरोपियन फुटबॉलमध्ये विला याने स्पॅनिश दिग्गज वालेंसिया, ऍटलेटिको व बार्सिलोना यांचे प्रतिनिधित्व केले आहे. देशाकडून त्याने ९८ सामने खेळताना ५९ गोल केले आहे. विला सध्या जपानचा क्लब विसेल कोबे याच्याकडून खेळत आहे. सीएफजी समुहाचा क्लब न्यूयॉर्क सिटी एफसीकडून विला यापूर्वी खेळला आहे.