सिग्नल्सला नमवित धेंपो पुन्हा अव्वल स्थानी

बीवन डिमेलोने सामन्याच्या अंतिम क्षणात नोंदविलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर धेंपो स्पोर्ट्‌स क्लबने कोअर ऑफ सिग्नल्सचा १-० असा पराभव करीत गोवा फुटबॉल संघटना आयोजित गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेच्या गुणतक्त्यात पुन्हा अव्वल स्थान मिळविले आहे.

नावेली येथील ३एटीआर सिग्नल्स मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत राहिले होते. सिग्नल्सला सामन्याच्या प्रारंभीच ३र्‍या मिनिटाला आपले खाते खोलण्याची संधी मिळाली होती. परंतु त्यांच्या लायरेल्लाकपम नोलकुल सिंगचा फटका थोडक्यात गोलपोस्टच्या बाहेर गेला. २९व्या मिनिटाला धेंपोचा अनुभवी स्ट्रायकर ज्योकिम अब्रांचिसला गोल करण्याची संधी चालून आली होती. परंतु त्याने ती गमावली.

दुसर्‍या सत्रात ६०व्या मिनिटाला सिग्नल्सचा बदली खेळाडू हुईड्रोम सुरजित सिंगने सोपी संधी गमावली. दरम्यान, धेंपोचा बचावपटू मॅथ्यू गोन्साल्वीसला दुसरे यलो कार्ड मिळाल्याने मैदान सोडावे लागल्याने उर्वरित सामन्यात त्यांना १० खेळाडूंनिशी खेळावे लागले. अखेर राखीव स्ट्रायकर बीवन डिमेलोने इंज्युरी वेळेत ९०+५व्या मिनिटाला धेंपोला पूर्ण गुण मिळवून देणारा महत्त्वपूर्ण गोल नोंदविला.

विजयामुळे धेंपोचे ११ सामन्यांतून २३ गुण झाले असून ते गुणतक्त्यात पुन्हा अव्वल स्थानी पोहोचले आहेत. तर सिग्नल ७ गुणांसह तळाला आहे.
आज या स्पर्धेत एफसी गोवा विकास संघ आणि चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्‌स क्लब यांच्यात सायं. ३.४५ वा. धुळेर स्टेडियमवर लढत होणार आहे.