सिक्किम : छोटा पण नेटका प्रदेश

सिक्किम : छोटा पण नेटका प्रदेश

– सौ. पौर्णिमा केरकर
(भाग-१)
प्रवासाची आवड एकदा मनाला लागली की रिकामा वेळ खायला उठतो. दिवाळीची, उन्हाळ्यातली लांबलचक सुट्टी मग वाया घालवावीशी वाटत नाही. अशी एखादी नवी जागा, माणसे, तिथली संस्कृती अनुभवायची, तेथील वैविध्य नजरेने टिपायचे, सौंदर्यांची अनुभूती घ्यायची आणि जगणं समृद्ध करीत जायचे ही सवयच आता मनाला लागलेली आहे.
मोठ्या सुट्टीचे वेध लागतात आणि मग डोळे आसुसतात प्रदेशाच्या सीमा ओलांडून सौैंदर्याचा शोध घेण्यासाठी! काळ, वेळ, वय, दुखणी, खुपणी, संघर्ष, समस्या यांचा पुरता विसर पडून स्वतःमधील चैतन्य शोधीत केलेला तो प्रवास चिरस्मरणीयच वाटतो. हा अनुभव वाढण्याचा, तसाच स्वतःमधील वेगळेपणा शोधण्याचा असतो. या प्रवासात कधी माणसातील माणुसकी जागविण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या पाऊलवाटांचा शोध घेतला, तर कधी एकांतात वावरणार्‍या सहजीवनातील सामंजस्यात भविष्यकाळाचे वास्तव आजच अधोरेखित करणार्‍या भावजीवनाचा शोध घेतला. सोलापूरमधील ‘वाळूंज’सारख्या अतिदुर्गम भागातील मोटे परिवाराची आतिथ्यशीलता मानवी संवेदनेतील हळवेपणा जतन करीत राहते. असेच कितीतरी क्षण आठवत राहतात. वर्तमानातील माणसांना जसे या भूमीने आपल्या उरीपोटी जतन केलेले आहे, तसेच प्राचीन कालखंडातील संचितांचे संवर्धन करण्याची जबाबदारीही सोपविलेली आहे. माणसे, ऐतिहासिक वास्तू, भौगोलिक परिसर, माणसातील देवत्व, निसर्गसौंदर्य या सार्‍यांचा शोध घेताना प्रवासाविषयीचे कुतूहल अधिकाधिक वाढत जाते.
मध्य प्रदेशात दिवाळीची सुट्टी घालविल्यानंतर वेध लागले मे महिन्याची सुट्टी पश्‍चिम बंगालमध्ये घालविण्याची. दार्जिलिंग, गंगटोक, कोलकाता ही ठिकाणे मनात पक्की झाली. ग्रीन रोझरी, दोनापावलच्या सहकार्याने या प्रवासाची संपूर्ण तयारी ‘हावडा एक्स्प्रेस’मधील आरक्षणाने दोन महिने अगोदरच करण्यात आली होती. त्यामुळे प्रवासाची चिंता वाटली नाही. वास्को ते कोलकाता हावडा स्टेशन हा प्रवास… ‘हावडा’ ब्रिटिश कालखंडातील एक महत्त्वपूर्ण आणि इतिहासाचे साक्षीदार असलेले एक मोठे रेल्वे स्टेशन. आणि ‘हावडा ब्रीज’ हे कोलकात्याला पोहोचताक्षणीच पाहता येणार म्हणून या प्रवासाचे वेगळे आकर्षण होते. रवींद्रनाथ टागोरांच्या या भूमीची नादमयता, सौंदर्याची नजाकत बघता येईल अशी खुणगाठ मनाशी बांधली. पण ते शक्य झाले नाही. पुढे दार्जिलिंग, गंगटोकचा प्रवास मोठा होता. चहाचे मळे नजरेसमोर येत होते. ‘कांचनजंगा’ व्हीव पाईंट, रुमाटेक सिक्किमचे ‘धर्म चक्र केंद्र’, ‘शांगू तलाव’, नथुला, दार्जिलिंगची ‘घुम मोनेस्ट्री’, चर्च, जपानीस पीस पगोडा, मीरीक तलाव आणखीही बरेच काही…
मडगाव ते कोलकाता… कोलकात्याला रात्रीचा मुक्काम केला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी रात्रीच गंगटोक सिक्किमच्या राजधानीत जाण्यासाठी कोलकात्यातील सिलीगुडी रेल्वे स्थानकावरून प्रवासाला सुरुवात झाली. बारा तासांचा प्रवास. दुसर्‍या दिवशी साधारण सकाळी नऊच्या आसपास न्यू जलपायमुडी रेल्वे स्थानकावर उतरल्या-उतरल्या गंगटोकला जाण्यासाठी ‘टाटा सुमो’ तयारीतच होत्या. यापुढील संपूर्ण प्रवास हा घाटमाथ्याचा. खडकाळ, वळणावळणांचा. धुरळा उडवित जाणार्‍या कित्येक ट्रॅक्स, सुमो गाड्या पर्यटकांची ने-आण करताना दिसल्या. चालक एवढे निष्णात की अरुंद चढणीच्या रस्त्यातून गाडी अगदी लीलया चालविण्याचे कौशल्य हे या पहाडी इलाक्याचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. पर्यटनदृष्ट्या एखादा प्रदेश विकसित झाला की प्रवासाचे वेड असलेली माणसे मग झपाटल्यासारखी या सगळ्याचा शोध घेण्यासाठी आपला सारा गोतावळा मागे ठेवून दूर कोठल्या तरी प्रदेशात जातात. तिथला भूगोल, समाज, इतिहास, संस्कृतीपासून अचंबित होतात. आणि खूप सारे समाधानाचे क्षण वेचीतच घरी परततात. गंगटोकच्या प्रवासात हेच विचार मनात येत होते. समृद्धीला बर्फाळ डोंगर-टेकड्यांत व्यापलेला, खूप उंचीवर असलेला ‘शांगू तलाव’ पाहायचा होता. सिक्किमच्या इतर अनेक सौंदर्याकर्षणात हा तलाव म्हणजे एक वेगळे वैशिष्ट्य होते. पाऊस पडल्याने ठिकठिकाणी निसरड झालेली. न्यू जलपायमुडी स्टेशन सोडल्यावर रस्त्याने सायकलवरून प्रवास करणार्‍या कित्येक सर्वसामान्य स्त्रिया कामाधंद्याच्या निमित्ताने जाताना दिसल्या. स्वतः सायकल चालवून नेताना एखादीच्या सायकलवर शाळेत जाणारे मूल, तर काहींच्या ठिकाणी ब्रॅकेटला चारा बांधलेला. कोठे शेतीची अवजारे तर कोठे बाजार केलेल्या पिशव्या, खंद्याला पर्स लावून एखादी ऑफिसमध्ये जाणार्‍या महिलेची लगबग इतर असंख्य वेगवान गाड्यांत दिसली आणि एका वेगळ्या आत्मसन्मानाने मन भरून आले. महाराष्ट्राचे राज्यफूल ‘ताम्हण’चे सदाप्रसन्न फूल याच मार्गावर दिसले. त्यामुळे ओळखीची ती एक खुण गंगटोकपर्यंत सोबत राहिली.
देशात काही मोजकीच राज्ये आहेत ज्यांनी स्वतःची शिस्तबद्धता, स्वच्छता आणि विश्‍वास अजूनपर्यंत टिकवून ठेवलेला आहे, त्यांत सिक्किम हे एक मानावे लागेल. हॉटेलपर्यंत नेऊन सोडण्यासाठी आलेल्या ड्रायव्हरने आम्ही गोव्याचे आहोत हे कळल्यावर मोठ्या अभिमानाने सांगितले की इथे तुमची एखादी वस्तू हरवली तर ती तुुम्हाला पोलिस स्टेशनमध्ये मिळेल. प्रामाणिकपणावरचा विश्‍वास येथील सर्वसामान्य माणूस व्यक्त करताना दिसत होता. पुढे त्याच्या या वक्तव्याची सकारात्मक प्रचिती आली. सिक्किमच्या आदरतिथ्याची आठवण कायम राहिली. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकरच उठलो. शांगू तलाव बघण्यासाठी आम्ही सारेच उत्सुक होतो. पावसामुळे शंका निर्माण झालेली- रस्ते निसरडे झालेत, गाड्या वरपर्यंत पोहोचणार की नाहीत? तलाव बघायला मिळणार की नाही? तरीसुद्धा एम. जी. रोडवरील मार्केटमध्ये फेरफटका मारला. नीटनेटक्या जागेत कोणतेही अतिक्रमण न करता बाजारातील शिस्तबद्धता नजरेत भरण्यासारखी होती. वाहनांना प्रवेश आतमध्ये निषिद्धच होता, त्यामुळे मुक्तपणे बाजारात हिंडणे झाले. पादचार्‍यांना रस्ता ओलांडण्यासाठी उड्डाणपूल. उन्हा-पावसापासून संरक्षणासाठी वर छत. प्लास्टिकचा व इतरही कचरा जागच्या जागी जमा केलेला. प्लास्टिकच्या वापरावर बंदी. दुकानात खरेदी केल्यावर कपड्याची नाहीतर पेपरबॅग ठरलेली. सर्वांसाठीच हा नियम! नियम तोडणार्‍याला शासन. लोकांनाही या सार्‍याची सवय झालेली, त्यामुळे त्यांनी स्वतःच स्वतःला वळण लावून घेतलेले. येथील राज्यकर्त्यांना लोकांची काळजी आहे हे सातत्याने जाणवत राहिले. अरुंद वळणावळणांचे रस्ते, वाहनांच्या लांबच लांब रांगा, पण वाहतुकीचा घोळ कोठेही नाही. क्वचितच एखाद्याच्या चुकीने रस्ता ब्लॉक झाला तर पोलिसांच्या तत्परतेमुळे परत सारे सुरळीत! गेली कित्येक वर्षे ‘चामलिंग’ या छोट्याशा राज्याचे मुख्यमंंत्री आहेत. एखाद्या मुख्यमंत्र्याकडे दूरदृष्टी असली, उद्दिष्ट्ये ठरवली व त्यादृष्टीने प्रामाणिकपणे जनतेच्या, राज्याच्या हितासाठी काम केले की तेथील सृजनत्व नजरेत भरते. इच्छाशक्तीच्या जोरावर एखादे छोटे राज्य कशी भरारी घेऊ शकते याचे उदाहरण म्हणजे सिक्किम!
गंगटोक ही सिक्किमची राजधानी. तेथील चीनच्या सरहद्दीपासून जवळच शांगू तलाव आहे. जवळ जवळ १४,००० फूट उंचीवर असलेले हे ठिकाण ‘नथुला’ भागात येते. नथुलापास या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे. टिबेटियनांचा हा येण्या-जाण्याचा मार्ग. बर्फाच्छादित प्रदेश, गोठवणारी थंडी. त्यातच पावसाचे आगमन झालेले. वातावरणात क्षणाक्षणाने बदल होत होता. कधी ऊन-सावली तर कधी पाऊस, गारठवून टाकणारी थंडी. ती कपड्यांची दक्षता घेऊनही तेवढीच बोचरी. समृद्धी, शुभदा व इतर सार्‍यांनी या भुरूभुरू पडणार्‍या बर्फाच्या पावसात खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. बर्फाळ डोंगरकपारीतील हा पाण्याने तुडुंब भरलेला तलाव हे येथील खास आकर्षण. ठिकठिकाणी दरडी कोसळलेल्या. शरीर गोठवणारी थंडी. आपल्याच वेगात खळाळणारी तिष्टा नदी. तिचाच फाटा पुढे ‘रे’ नदीच्या रूपाने ‘पीस पगोडा’ला जाताना वाटेत भेटला. चीन, टिबेटियन बुद्धीस्टांचा प्रभाव येथे जागोजागी दिसत होता. बुद्धमंदिर, जापनीज पगोडाने जपानी संस्कृतीची आठवण करून दिली. नथुलाला पोहोचताक्षणी अरे आम्ही चीन देशाच्या सरहद्दीपर्यंत आलो आहोत याची जाणीव झाली. घराचा उंबरठा ओलांडून प्रदेशांच्या सीमांचा शोध घेत कधी आपण दुसरा देश टप्प्यात घेतो लक्षातच येत नाही. परका देश, परकी माणसं कशी असतात याची उत्सुकता मनाला नेहमीच असते. अशा प्रवासात ही उत्सुकता अधिकच तीव्र होते, आणि मग माणसे इथून-तिथून सारखीच हे जाणवत राहते. भारत-चीन सीमारेषेवर असलेला हा तलाव दोन्ही देशांचे निसर्गवैभव मिरवताना दिसतो. ‘रुमाटेक मोनेस्ट्री’, ‘शांती व्हीव पॉईंट’, टिबेटोलीनी रोप-वेचा आनंद लुटताना निसर्ग एकाच टप्प्यात आला. सिक्किमची विधानसभा हे वेगळेपण होतेच!
वळणावळणांच्या डोंगरवाटा… चढणीच्या अरुंद रस्त्यावरून विविध ठिकाणे पाहायला जाताना येथील समृद्ध शेती-संस्कृतीचे दर्शन झाले. पायर्‍यापायर्‍यांनी करण्यात येणारी शेती- ‘स्टेप फार्मिंग.’ बुद्धिस्ट लोक आपली एखादी व्यक्ती मृत झाली तर तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी पांढर्‍या रंगाचे लांबलचक एकशे आठ ध्वज रांगेत लावतात. रस्त्यात ठिकठिकाणी एका रांगेत लावलेले हे ध्वज दिसले. त्याशिवाय अशाच प्रकारचे पण लाल, पिवळे, हिरवे व निळ्या रंगाचे ध्वज शुभकार्याची सुरुवात करण्यापूर्वी लावण्याची परंपराही दिसली. भुटिया (ड्रेगॉन नृत्य) नेपाली, लेपच्यासारखी नृत्ये, मोमोजसारखा खाद्यपदार्थ, सर्व तर्‍हेचे सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा असणारा हा उत्साही प्रदेश आहे. हिमालयासारखी बर्फाच्छादित पर्वतशिखरे इथे नाहीत. एकेकाळी संपूर्ण प्रदेशात मोठमोठे देवदार वृक्ष असावेत अशा खुणा येथे आहेत. परंतु हिमालयाची उत्तुंगता, भव्यता, स्फटिकता आणि तेवढीच प्रसन्नता याची उणीव भासते. जगण्यासाठी खूप सारे कष्ट करावे लागतात, तरीसुद्धा सारे मनासारखे होईलच असे नाही. रोजगाराच्या विविध संधी असल्या तरी संघर्ष हा करावाच लागतो. इथले खडतर जीवन बघून मनाला क्लेश होतो. तरीसुद्धा या लोकांची जगण्याला सामोरे जाण्याची जिद्द बघितली की त्यांना सलाम करावासा वाटतो. कित्येक किलोमीटर अंतर पायी चालत जाणारे विद्यार्थी येथे बघता आले. पण त्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळेच टवटवी होती. चालण्याने तंदुरुस्त झालेले पीळदार शरीर. येथील काटकता, चिवटपणा पुढे दार्जिलिंगपर्यंत सोबत होती. गोरखालॅण्डमध्ये पुढे प्रवेश करायचा होता. नेपाळच्या सीमेवर उभे राहायचे होते. नेपाळात पशुपती मार्केटमधील एखादी तरी वस्तू आठवणीसाठी घ्यायची होती. त्यासाठी या प्रदेशाच्या आठवणी हृदयात साठवूनच आम्ही दार्जिलिंग प्रवासासाठी सिद्ध झालो.

Leave a Reply