सिंधू, श्रीकांत, सायनावर भारताची मदार

>> जपान ओपन ‘सुपर ७५०’ बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

इंडोनेशिया ओपन ‘सुपर १०००’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवानंतर स्वतःला सावरत भारताची पी.व्ही. सिंधू आजपासून सुरू होणार्‍या जपान ओपन बीडब्ल्यूएफ ‘सुपर ७५०’ स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे.

७५०,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धेद्वारे ‘फुलराणी’ सायना नेहवाल आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये पुनरागमन करणार आहे. तंदुरुस्तीच्या कारणास्तव सायनाने इंडानेशिया ओपनमधून अंग काढून घेतले होते. जकार्तामधील स्पर्धेत जपानच्या अकाने यामागुचीकडून पराजित झाल्याने सिंधूला सात महिन्यांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवणे शक्य झाले नव्हते. चीनच्या हान युईच्या रुपात तिच्यासमोर तुलनेने कमी ताकदीचा प्रतिस्पर्धी जपान ओपनच्या सलामीच्या लढतीत तिच्यासमोर असेल. पहिल्या फेरीचा अडथळा पार केल्यास तिच्यासमोर स्कॉटलंडची कर्स्टी गिलमोर किंवा जपानची अया अहोरी असेल. स्पर्धेसाठी पाचवे मानांकन लाभलेली सिंधू उपांत्यपूर्व फेरीत यामागुचीसमोर उभी ठाकू शकते. असे झाल्यास इंडोनेशियातील पराभवाचा वचपा काढण्याची संधी सिंधूला असेल.

यंदाच्या मोसमात जेतेपद मिळविलेली एकमेव भारतीय असलेली सायना नेहवाल थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. जय-पराजयाच्या बाबतीत सायनाचा बुसाननविरुद्धचा रेकॉर्ड ३-१ असा आहे. पुरुष एकेरीत एचएस प्रणॉय व आठवा मानांकित किदांबी श्रीकांत पहिल्याच फेरीत एकमेकांशी भिडतील. या दोघांमध्ये आंतरराष्ट्रीय सर्किटवर पाच सामने झाले असून यापैकी चारमध्ये श्रीकांत वरचढ ठरला आहे. अन्य भारतीयांमध्ये स्वीस ओपनचा उपविजेता बी. साई प्रणिथ जपानच्या केंटा निशिमोटोशी पहिल्या फेरीत झुंजेल. खांद्याच्या दुखापतीमुळे इंडोनेशिया ओपनला मुकलेल्या समीर वर्मासमोर डेन्मार्कच्या अँडर्स आंतोनसेन याच्या रुपात तगडा प्रतिस्पर्धी असेल.

दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग रेड्डी यांचे आव्हान पहिल्याच फेरीत आटोपू शकते. त्यांच्यासमोर मार्कुस इलियस व ख्रिस लँग्रिज ही २०१६ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती जोडी असेल. पुरुष दुहेरीतील अन्य सामन्यात मनू अत्री व सुमीत रेड्डी मलेशियाच्या गोह झी फेई व नूर इझुद्दीन यांच्याशी दोन हात करतील. पहिल्या फेरीत अश्‍विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी यांचा कोरियाच्या किम सो योंग व कॉंग ही यॉंग या जोडीशी सामना होणार आहे. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा व सिक्की यांना अव्वल मानांकित झेंग सी वेई व हुआंग या क्विंओंग यांचा सामना करावा लागेल. चीनच्या या जोडीने इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावले होेते. मिश्र दुहेरीच्या अन्य एका लढतीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी व अश्‍विनी जर्मनीच्या मर्विन सेडल व लिंडा एफलर यांच्याशी सामना करतील.