सासष्टीतील भाजप आमदाराला कोरोना

>> दोन पोलीस कर्मचारी बाधित

>> साखळीत मायक्रो कंटेनमेंट झोन

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेल्या कोरोनाची बाधा आता राज्यातील प्रतिष्ठित व्यक्तींपर्यंत पोहोचला आहे. काल सासष्टी तालुक्यातील एका भाजप आमदाराला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर आमदाराला मडगाव येथील कोविड इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

राज्यात नवीन ६४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह सध्याच्या रुग्णांची संख्या ७१६ झाली आहे. आंबावली, इंदिरानगर चिंबल, साखळी, साळ, पर्वरी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून सांगे आणि पिर्ण-म्हापसा येथे आयझोलेटेड कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या १३१५ वर पोहोचली आहे. तर मंगळवारी आणखी ७२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५९६ झाली आहे.

दोन पोलिसांना लागण
पणजी येथील पोलीस मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मुख्यालयातील काही पोलीस कर्मचार्‍यांना कोविड चाचणी करून होम क्वारंटाईऩ होण्याची सूचना करण्यात आली आहे. येथील अग्निशामक दलाने पोलीस मुख्यालय कार्यालयाची काल जंतुनाशक फवारणी करून साफसफाई केली.

सांगे, पिर्णमध्ये नवे
आयसोलेटेड रुग्ण
राज्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्याचे सत्र सुरूच आहे. सांगे आणि पिर्ण- म्हापसा येथे प्रत्येकी १ आयसोलेटेड कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.

इंदिरानगर चिंबलमध्ये नवीन ५ रुग्ण
इंदिरानगर चिंबलमध्ये नवीन ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. इंदिरानगरातील रुग्णांची संख्या आता १० झाली आहे. शिरेन चिंबल या भागात २७ रुग्ण आढळून आले आहेत.

आंबावलीमध्ये नवीन ७ रुग्ण
आंबावली येथे नवीन ७ रुग्ण आढळून आले असून या भागातील रुग्णांची संख्या २३ झाली आहे. कुडतरी भागात ३१ रुग्ण आढळले आहे. नावेली, लोटली, मडगाव येथेही रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्यखात्याने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीत मडगावात १७ रुग्ण आढळून आल्याची माहिती देण्यात आली होती. परंतु, मंगळवारी जारी केलेल्या पत्रकात मडगावात १२ रुग्ण आढळून आल्याचे म्हटले आहे.

पर्वरी, साळ येथे नवीन रुग्ण
पर्वरी येथे आणखी १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला असून पर्वरीतील रुग्णांची संख्या २ झाली आहे. साळ येथे आणखी १ रुग्ण आढळून आला असून रुग्णांची संख्या ४ झाली आहे. मांगूर हिल आणि मांगूर हिल लिंकबाबत देण्यात आलेली रुग्णांची माहितीमध्ये तफावत दिसून येत आहे. मांगूर हिलमध्ये सोमवारची आकडेवारी २६० रुग्ण अशी आहे. तर मंगळवारची आकडेवारी २१७ रुग्ण अशी आहे. मांगूर हिल लिंकबाबतची सोमवारची आकडेवारी २६० रुग्ण अशी आहे.

साखळीत ३ नवे रुग्ण
साखळीत काल मंगळवारी ३ नवे रुग्ण सापडले असून साखळीतील रुग्णसंख्या आता २९ झाल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. उत्तम देसाई यांनी दिली. काल देसाईनगर, सुंदरपेठ व रुद्रेश्वर कॉलनीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला. परराज्यातून आलेले ३ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. रुग्ण सापडलेल्या परिसरात कडक निर्बंध घालण्यात आले असून लोकांना गरज भासेल तसे सामान पुरवले जात असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रवीणजय पंडित यांनी दिली.

दरम्यान, साखळीत कोविड रुग्णसंख्या वाढत असल्याने मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विशेष आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी विविध सूचना दिल्या. तसेच साखळीतील जे भाग सील केले आहेत तेथे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.

साखळीत मायक्रो कंटेनमेंट झोन
साखळी येथील भंडारवाडा आणि देसाईनगरचा भाग मायक्रो कंटेनमेंट झोन करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. साखळी भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी केंद्रीय मंत्रालयाच्या नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.