सावरकरांचे वस्तुनिष्ठ मौलिक चरित्र

सावरकरांचे वस्तुनिष्ठ मौलिक चरित्र

एडिटर्स चॉइस
– परेश प्रभू

सावरकरांच्या माफीनाम्यांवरून नुकतेच एक वादळ निर्माण झाले. सावरकरांच्या या माफीनाम्यांमागील सत्य काय आहे? सावरकर हे काय रसायन होते? हे सगळे वस्तुनिष्ठपणे समजून घ्यायचे असेल तर डॉ. विक्रम संपत यांनी साकारलेले सावरकरांचे नवे विस्तृत चरित्र वाचायलाच हवे…

‘माफी मागायला माझे नाव राहुल सावरकर नाही’ असे कुजकट उद्गार राहुल गांधी यांनी अलीकडेच काढले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या माफीनाम्यांवरून त्यांच्या देशभक्तीवरच संशय घेणार्‍यांचा सावरकर द्वेष उफाळून आला. युवक कॉंग्रेसने सावरकरांची टवाळी करणारी पुस्तिकाही प्रसिद्ध केली. या पार्श्वभूमीवर सावरकरांच्या या माफीनाम्यांचा आणि तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास करताना इंग्रजीतले एक उत्तम सावरकर चरित्र हाती आले. सध्या ‘नॅशनल बेस्टसेलर’ ठरलेल्या या तब्बल ५७५ पानी चरित्राचे लेखक आहेत डॉ. विक्रम संपत आणि पेंग्वीन प्रकाशित या देखण्या पुस्तकाचे नाव आहे ‘सावरकर ः एकोज् फ्रॉम अ फॉरगॉटन पास्ट.’
१८८३ पासून १९२४ पर्यंतचा म्हणजेच सावरकरांच्या जन्मापासून त्यांच्या अंदमान आणि रत्नागिरीतील कारावासानंतर शेवटी येरवडा कारागृहातून झालेल्या सुटकेपर्यंतचा कालखंड डॉ. संपत यांनी यामध्ये जास्तीत जास्त वस्तुनिष्ठपणे आपल्या समोर उभा केला आहे. लेखक प्रस्तावनेत म्हणतो त्याप्रमाणे सावरकरांविषयीचे लेखन एक तर भक्तिभावाने केलेले दिसते नाही तर टोकाच्या द्वेषाने. त्यामुळे इतिहासातील पुराव्यांचा भक्कम आधार घेत वस्तुनिष्ठपणे सावरकरांच्या जीवन कर्तृत्वाकडे पाहण्याची गरज अधिकच अधोरेखित होते. डॉ. संपत यांनी फार चांगल्या प्रकारे ही वस्तुनिष्ठता सांभाळत हे शिवधनुष्य पेलले आहे.

काही वर्षांपूर्वी मणिशंकर अय्यरांनी अंदमानातील सावरकर स्मारकावरची पाटी उखडण्याचे आदेश दिले तेव्हा उठलेल्या वादानेच डॉ. संपत यांना हे चरित्र लिहिण्याची प्रेरणा दिली. सावरकर नावाच्या या माणसात असे काय आहे की ज्यामुळे १९६६ साली मृत्यू पावलेल्या या माणसाविषयी एवढे प्रेम आणि आस्था आजच्या काळातही समाजामध्ये दिसावे, या प्रश्नाने सावरकरांचे जीवन अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयत्न संपत यांनी केला. एकीकडे कडवे हिंदुत्व आणि दुसरीकडे हिंदू धर्मातील सनातनी वृत्तीला परखड विरोध, विज्ञाननिष्ठा, जातीनिर्मूलनाचा पुरस्कार किंवा गाय हा उपयुक्त पशू आहे यासारखे क्रांतिकारी विचार, असे मिश्रण असलेल्या सावरकरांच्या जीवनातील विस्मृतीत चाललेली पाने उलगडण्याचा प्रयत्न लेखकाने या पुस्तकातून केला आहे. त्यासाठी त्यांनी घेतलेल्या प्रचंड परिश्रमांचे प्रत्यंतर पुस्तकाच्या पानापानांतून येते.

सावरकरांच्या माफीनाम्यांसंदर्भात वेळोवेळी वाद निर्माण केला जातो, त्यावर या चरित्रात विस्ताराने प्रकाश पाडला गेला आहे. सावरकरांनी वेळोवेळी सादर केलेले अर्ज संपूर्णतः या पुस्तकाच्या परिशिष्टात दिले गेलेले आहेत. त्यातून त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारे वारंवार याचिका सादर करीत असताना काय चालले असावे, कोणत्या हेतूने त्यांनी या अर्जांचा सपाटा लावलेला असावा याचा अंदाज बांधता येतो. हे माफीनामे म्हणता येत नाहीत, कारण त्यामध्ये आपल्याकडून झालेल्या कृत्याबद्दल कुठेही माफी मागितली गेलेली नाही.

सावरकरांना १९११ साली पन्नास वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली गेली. तत्कालीन प्रथेनुसार कैदी म्हणून त्यांच्या गळ्यात सुटकेचे वर्ष लिहिलेला लोखंडी बिल्ला अडकवला गेला, ज्यावरचे वर्ष होते १९६०. सावरकरांना झालेल्या शिक्षेने कोणत्याही व्यक्तीचा थरकापच उडाला असता. ३० जून १९११ रोजी अंदमानच्या सेल्युलर जेलचे दार सावरकरांना आत गिळंकृत करण्यासाठी उघडले. आजही दुर्गम असलेले अंदमान बेट १९११ साली कसे असेल त्याची कल्पना आपण करू शकतो. तेव्हाचा सेल्युलर जेल सात शाखांत विस्तारलेला होता. आज त्याच्या केवळ दोन शाखा उरल्या आहेत आणि एकीचे रूपांतर इस्पितळात करण्यात आलेले आहे. या तुरुंगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला बराकी नाहीत, तर केवळ ‘सेल’ म्हणजे छोट्या कोठड्या आहेत. म्हणून तो ‘सेल्युलर जेल.’ १३‘६ बाय ७‘६ च्या या कोठड्यांपैकी तिसर्‍या मजल्यावरच्या कोठडीत कैदी क्र. ३२७७८ सावरकरांची रवानगी करण्यात आली, तीही अशा जागी की जिथून समोरच फाशीचे तख्त दिसावे. त्याआधी पहिले सहा महिने तर सावरकरांना एकांत कोठडीत ठेवले गेले होते जिथे प्रकाशालाही वाव नव्हता. सावरकरांना तुरुंगात सर्वांत खडतर कामे दिली गेली होती हे तर सर्वज्ञात आहेच. त्यांना तुरुंगाबाहेरही कधी काढले गेले नव्हते. अशा भयावह परिस्थितीत आणि प्रचंड छळणुकीत बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर नावाचा तेव्हा अवघ्या २८ वर्षांचा असलेला हा तरुण क्रांतिकारक तेथे बंदिवास भोगत होता. कोठडीत मलमूत्राचीही सोय नसायची. संध्याकाळी सहा वाजता बंद होणारी कोठडी दुसर्‍या दिवशी सहा वाजताच उघडायची. ‘माझी जन्मठेप’ मध्ये त्या सगळ्या भोगांविषयी सावरकरांनी लिहिलेच आहे. त्यामुळे त्या सर्व प्रसंगांविषयीची पुनरुक्ती मी येथे करू इच्छित नाही, परंतु सावरकरांच्या याचिकांसंबंधी डॉ. संपत यांनी विस्ताराने माहिती दिलेली आहे, ज्यांचा मागोवा येथे निश्‍चितच घ्यावासा वाटतो.

सावरकरांनी केलेल्या याचिका वेळोवेळी फेटाळल्या गेल्या, परंतु सातत्याने सावरकर आपल्या सुटकेची मागणी करीत राहिले. परंतु केवळ स्वतःपुरता त्यांचा हा आग्रह दिसत नाही. १९१७ साली मॉंटेग्यूंना केलेल्या याचिकेत सावरकर लिहितात, ‘‘मी स्वतःच्या सुटकेसाठी हे करतो आहे असे वाटत असेल तर माझे नाव वगळावे. इतरांना सोडावे, जेणेकरून मला स्वतःच्या सुटकेसारखेच समाधान मिळेल.’’ अर्थात, सावरकरांची सुटका झाली नाही. मात्र मॉंटेग्यू – चेम्सफोर्ड सुधारणा मात्र लागू झाल्या.

तुरुंगातील कष्टाच्या कामांनी सावरकरांचे वजन झपाट्याने खालावत चालले होते. प्रकृती खालावली होती. मध्यंतरी त्यांना इस्पितळातही राहावे लागले. बंधू बाबारावांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. जवळजवळ मृत्यूशय्येवर असल्याच्या भावनेने सावरकरांनी तेव्हा ‘मरणोन्मुख शय्येवर’ ही कविताही केली होती. कमालीच्या अशक्तपणामुळे त्यांच्या मनात आत्महत्येचे विचारही येत होते आणि तुरुंगातील एकूण परिस्थितीत तसे विचार येणे अगदी स्वाभाविक होते. अनेक भल्या भल्या कैद्यांचे मानसिक संतुलन तेथील परिस्थितीत ढासळत असे.

सावरकर उच्चशिक्षित होते. बॅरिस्टर होते. त्यामुळे आपल्या व सहकारी कैद्यांवरील अन्यायाविरुद्ध त्यांचे मन पेटून उठत होते. नानापरीने ते ब्रिटीश साम्राज्याच्या अधिकार्‍यांना राजबंदी या नात्याने आपल्या न्याय्य हक्कांची जाणीव या याचिकांतून करून देताना दिसतात. ज्या सवलती सर्वांत कुख्यात कैद्यांना मिळतात त्याही राजबंदी या नात्याने आपल्याला मिळत नाहीत याविषयीची तक्रार या याचिकांमधून दिसून येते. आपल्याला पन्नास वर्षांची सजा झालेली आहे. ज्या सवलती त्यांना मिळतात त्याही तुम्ही मला देणार नसाल तर हा काळ मी घालवू कसा? हा सवाल सावरकरांनी एका याचिकेत केला आहे. आपल्याला भारतातील तुुरुंगात पाठवले जावे असेही ते सुचवतात. मूलभूत मानवाधिकाराची आठवणही एका याचिकेत त्यांनी करून दिली आहे.
इतर कैद्यांच्या मानाने सावरकरांवर खरोखरच अन्याय होत होता. धोकादायक मानून त्यांच्याबाबतीत तुरुंग प्रशासन अधिक दक्ष असे. इतर कैद्यांना मिळणार्‍या सवलती त्यांना मिळत नव्हत्या. बाकीच्यांना पाच वर्षांनी त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची संधी दिली गेली, परंतु सावरकरांना अंदमानला येऊन आठ वर्षे झाली तरीही तो लाभ दिला गेला नव्हता. अखेरीस आठ वर्षांनंतर ती ह्रद्य भेट झाली. यमुनाबाई आणि बंधू नारायण, पत्नी शांता अशी कुटुंबीय मंडळी कलकत्त्याहून बोटीने अंदमानला भेटीसाठी आली.

पंचम जॉर्जच्या शाही फर्मानानंतर १९१९ साली बारीन घोष, त्रैलोक्य चक्रवर्ती, हेमचंद्र दास, सचिंद्रनाथ सान्याल आदी जवळजवळ तीस राजकीय कैद्यांची सुटका झाली. ही सुटका करीत असताना यापुढे राजकीय चळवळीत भाग घेणार नाही अशी हमी देणे ही प्रमुख अट होती. त्यामुळे या क्रांतिकारकांमध्ये ही अट स्वीकारावी की नाही याबाबत अनिश्‍चितता होती. मात्र सावरकरांनी त्यांना त्यावर सह्या करायला लावल्या, त्यामागे त्यांनी आधी या काळकोठडीतून सुटका करून घेणेच हितकर ठरेल हा शहाणपणाचा विचार होता. आधी सुटका करून घ्या असेच सावरकरांचे त्यांना सांगणे होते.
यावेळी सावरकर बंधूंना सोडले गेले नाही. २० मार्च १९२० रोजी सावरकरांनी केलेल्या याचिकेमध्ये या घटनेचा उल्लेख करून स्वतःला व आपल्या बंधूंनाही राजकीय कैदी या नात्याने जो न्याय इतर राजकैद्यांना लावला गेला तो लावायला हवा होता याचे स्मरण सरकारला करून दिले. तत्पूर्वी १९१४, १९१८ साली केलेल्या याचिकांतून सावरकरांनी वायव्य सरहद्दीकडून होऊ शकणार्‍या आक्रमणांच्या विरोधात युद्धात सहभाग घेण्याची तयारीही दर्शविली होती. संवैधानिकरित्या वागेन, इंग्रज सरकारशी निष्ठा राखीन वगैरे वाक्ये या याचिकांतून जरूर आहेत, परंतु त्याबाबत शब्दच्छल करण्याऐवजी त्यामागील धोरणीपणा आणि उद्देश लक्षात घेणे अधिक आवश्यक ठरते.

संवैधानिकरीत्या वर्तणूक करण्यास व अहिंसात्मक सुधारणांना सहकार्य करण्यास सावरकरांनी या याचिकांतून तयारी दर्शवलेली दिसते, परंतु ह्या सगळ्यामागे तुरुंगात सडत पडण्यापेक्षा सुटका झाल्यास आपल्याकडून काही देशसेवा होऊ शकेल हाच विचार असावा असे दिसते. सुटकेनंतर लिहिलेल्या ‘माझी जन्मठेप’ मध्ये कुठेही वरील प्रकारच्या मवाळ विचारांचा लवलेश दिसत नाही याचा अर्थ सुटका व्हावी यासाठी सावरकरांनी केलेला तो धोरणी बचाव असू शकतो असे डॉ. संपत म्हणतात. ‘त्यांची खरी राजकीय मते काय हे कळणे दुरापास्त आहे’असा उल्लेख त्यांच्या वर्तणुकीसंदर्भातील तुरुंगातील कागदपत्रांत तेव्हा आढळतो.
जागतिक परिस्थितीचे भान सावरकरांना होते. जागतिक परिस्थिती पाहता ठिकठिकाणच्या तुरुंगांतून राजकीय कैद्यांची सुटका होत असल्याकडेही ते या याचिकांतून लक्ष वेधताना दिसतात.

१९२० सालापर्यंत सावरकरांना अंदमानच्या तुरुंगात येऊन दहा वर्षे होत आली होती. प्रकृतीही तोळामासा उरली होती. परंतु तरीही मुंबई सरकारला त्यांची धास्ती होती म्हणूनच त्यांच्या सुटकेला वारंवार मुंबई सरकार विरोध करीत आले होेते. जानेवारी १९२० मध्ये त्यांच्या नारायण या बंधूने थेट महात्मा गांधींशीच सावरकरांच्या सुटकेच्या मागणीसाठी पत्रव्यवहार केला. गांधीजींनी त्यांना पाठवलेल्या उत्तरात स्वतःची असमर्थता दर्शवली, तरी पुढे २६ मे १९२० च्या ‘यंग इंडिया’ मध्ये लिहिलेल्या लेखामध्ये मात्र सावरकरांच्या सुटकेची जोरदार वकिली केलेली दिसते याकडेही डॉ. संपत यांनी लक्ष वेधले आहे. नोव्हेंबर १९२० मध्ये बंधू नारायणराव सावरकरांना दुसर्‍यांदा अंदमानला जाऊन भेटले तेव्हा सावरकरांची प्रकृती एवढी क्षीण झाली होती की त्यांना ओळखताही आले नाही. आता आपण जास्त काळ जगणार नाही असेही हताश उद्गार सावरकरांनी बंधूंकडे काढले होते.

१९२१ साली अखेरीस मुंबई सरकारने सावरकरांना अंदमानातून सुटका करून आपल्या इलाख्यातील तुरुंगात ठेवायची परवानगी दिली. सावरकरांची अंदमानातून सुटका होणार हे कळले तेव्हा सहकारी कैद्यांनी त्यांच्यासाठी पै पै गोळा करून मिठाई, फुले, फळे आणून आनंदोत्सव साजरा केला. कुशाबा या महाराष्ट्रीय कैद्याने तर हारही घातला. सावरकरांविषयी सहकार्‍यांमध्ये किती प्रेम तेव्हाही होते हे आपल्याला या घटनेतून कळते.

१९२३ साली रत्नागिरीतील स्थानबद्धतेतून त्यांना येरवड्याच्या कारागृहात पाठवण्यात आले. तेथील वास्तव्यात ते सहकारी कैद्यांना मदनलाल धिंग्रांसारख्या क्रांतिकारकांच्या गाथा सांगत असत हेही उल्लेखनीय आहे. सावरकरांच्या विपुल वाङ्‌मयाने तर क्रांतिकारकांना सतत प्रेरणा दिली. लेखक डॉ. संपत लिहितात, ‘कवीचे संवेदनशील ह्रदय आणि क्रांतिकारकाचा मेंदू या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीमध्ये असणे विरळाच.’
सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत. त्या सर्वांचा साकल्याने विचार केला तरच विनायक दामोदर सावरकर हे व्यक्तिमत्त्व आपल्यापुढे सर्वार्थाने उलगडू शकते. त्यासाठी डॉ. संपत यांचे हे चरित्र हा एक मौलिक दस्तऐवज आहे यात शंका नाही. सावरकरांचे उदात्तीकरण आणि अवहेलना या दोन्हींच्या मध्ये कुठे तरी सत्य दडलेले आहे आणि त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण केला आहे असे लेखक म्हणतो आणि हे चरित्र निश्‍चितच त्याची प्रचीती देते.