साळ गावातील ५० घरांना पुराचा तडाखा

साळ गावातील ५० घरांना पुराचा तडाखा

>> अजूनही पुराचा वेढा कायम

>> मुख्यमंत्री, सभापतींकडून पाहणी

>> अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

  • ३० वर्षांनंतर साळ गावात पूर
  • लोक अजूनही भीतीच्या छायेत
  • सरकारकडून पुरग्रस्तांना मदत
  • तिळारीचे पाणी सोडल्याने पूर
  • देरोडे, सत्तरीत युवक बुडाला
  • राज्यात अनेक ठिकाणी पूर
  • सरकार केंद्राकडे मदत मागणार

गेल्या चार दिवसांपासून कोसळणारा मुसळधार पाऊस आणि तिळारी धरणातील पाण्याचा विसर्ग यामुळे साळ गावात बुधवारी रात्री आलेला पूर कायम आहे. सुमारे ५० घरांमध्ये पाणी घुसले असून या घरांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पूरग्रस्तांना काल सकाळी सरकारतर्फे अन्नाची पाकिटे वितरित करण्यात आली. ३० वर्षांनंतर साळ गावात पुराने हाहाकार माजविल्याने लोक भीतीच्या छायेखाली आहेत. दरम्यान, काल सकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर यांनी साळ गावात धाव घेऊन पूरस्थितीची पाहणी करून आढावा घेतला.

बुधवारी रात्री उशिरा साळ गावात पुराचे पाणी आल्याने लोकांची झोप उडाली. गावातील सुमारे ५० च्या आसपास घरांमध्ये पाणी घुसले. येथील मंदिरातही पाणी गेले. यावेळी स्थानिक नागरिकांनी एकोप्याचे प्रतीक दाखवताना सरकारी यंत्रणेच्या मदतीने अनेक लोकांना सुखरूपपणे पाण्यातून बाहेर काढले व सुरक्षित जागी नेले.
अनेक बोटी व इतर माध्यमातून लोकांना हलवण्यात आले. बुधवारी रात्री दहापासून काल सकाळपर्यंत लोकांनी जागे राहून पुरात अडकलेल्यांची सुटका केली. या मदतकार्यावेळी या भागाचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांनी लोकांबरोबर राहून मार्गदर्शन केले.
सभापती मदतीला धावले
साळ गावाला पुराचा वेढा पडल्याची माहिती मिळताच सभापती राजेश पाटणेकर व मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या मदतीने लोकांना सुरक्षित स्थळी हलविले. पूरग्रस्तांना काल सकाळी अन्नाची पाकिटे वितरित करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल साळ गावातील पुराची पाहणी केली. सरकारतर्फे सर्व ती मदत पुरवण्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी लोकांना दिले. सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी असून सर्व प्रकारची मदत दिली जात आहे. कुणीही अङ्गवा पसरवू नये व कुणीही घाबरून जाऊ नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

देरोडे, सत्तरीत पुराचा बळी

नगरगाव पंचायत क्षेत्रातील देरोडे, सत्तरी येथे नानोडा नदीला आलेल्या पुरामुळे देरोडे येथील आपल्या घरी जात असताना सुभाष कृष्णा चोर्लेकर (वय २५) याचा बुडून मृत्यू झाला. तो आणि त्याचा मित्र बुधवारी रात्री उशिरा घरी परतत होते. त्या गावात जाताना एक लहान पूल लागतो. त्या पुलावरून पुराचे पाणी जात होते. असे असताना त्या दोघांनी पाण्यात मोटरसायकल घातली. मात्र, पाण्याचा प्रभाव मोठा असल्याने मोटारसायकलसह सुभाष वाहून गेला. त्याच्या मित्राने मात्र विरुद्ध दिशेला उडी घेत आपले प्राण वाचविले.