साळमधील उत्पादकांचे दूध स्वीकारण्याची सुमूलची तयारी

सुमुल दूध सोसायटी बुधवारपासून दूध उत्पादकांकडील दूध स्वीकारण्यास सुरुवात करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

सुमुल दूध सोसायटीने साळ, डिचोली भागातील शेतकर्‍यांचे दूध सोमवारी स्वीकारण्यास नकार दिल्याने संतप्त बनलेल्या शेतकर्‍यांनी गोवा विधानसभेवर मोर्चा आणून शेकडो लीटर दूध रस्त्यावर ओतून निषेध नोंदविला होता. सुमुलने दुधाच्या केलेल्या तपासणीमध्ये दुधात अँटीबायोटिक्स आढळून आल्याने दूध स्वीकारण्यास नकार दिला होता.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या प्रकाराची दखल घेऊन सुमुल दूध सोसायटीचे अधिकारी आणि पशुसंवर्धन खात्याचे अधिकारी यांची काल बैठक घेतली.
दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या कामात अडथळा निर्माण करू नका, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सुमुलच्या अधिकार्‍यांना केली.