साळगावकर, पालयेकर यांनी भाजप प्रवेशाची शक्यता फेटाळली

गोवा फॉरवर्डचे साळगावचे आमदार जयेश साळगावकर आणि शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याची जोरदार चर्चा काल सुरू होती. तथापि, गोवा फॉरवर्डच्या दोघाही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेशाची शक्यता फेटाळून लावली आहे.

भाजपकडून गोवा फॉरवर्डचे आमदार फुटणार असल्याची अफवा पसरविण्यात येत आहे, असा दावा दोघाही आमदारांनी केला आहे. आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा पसरविण्यात आली असून गोवा फॉरवर्डचा त्याग करण्याचा कोणताही विचार नाही, असे आमदार साळगावकर यांनी स्पष्ट केले.

राज्यातील कोरोना रुग्णांची वाढत्या संख्या आणि कोरोना रुग्णांच्या मृत्यूकडील नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी गोवा फॉरवर्डचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याची अफवा पसरविण्यात आली आहे, असा दावा आमदार पालयेकर यांनी केला.
भाजपचे सरकार कारभार हाताळण्यास अपयशी ठरल्याने लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी भाजपकडून आमदारांच्या पक्ष त्यागाबाबत अफवा पसरविण्यात येत आहे. असे आमदार पालयेकर यांनी म्हटले आहे.