साबांखात कंत्राटी कर्मचारी नियुक्तीवर बंदी घालणार

सार्वजनिक बांधकाम खात्यात कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी नियुक्तीवर बंदी घातली जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत आमदार सुभाष शिरोडकर यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना काल दिली.
सार्वजनिक बांधकाम खात्यात कंत्राटी पद्धतीवर घेण्यात येणार्‍या कर्मचार्‍यांना वेळेवर पगार मिळत नाही. कंत्राटदाराच्या मार्ङ्गत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना विविध कारणांमुळे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ पगार मिळत नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचार्‍यांना पीडब्लूडी कर्मचारी सोसायटीमध्ये सामावून घेतले जाणार आहे, असे सावंत यांनी सांगितले.

पीडब्लूडी सोसायटीत गेली कित्येक वर्षे कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना बांधकाम खात्यात नियमित कर्मचारी भरतीच्या वेळी संधी दिली जात नाही. त्यामुळे हजारो कर्मचारी सेवेत समावून घेण्यापासून वंचित राहिलेले आहेत. बांधकाम खात्यातील नोकर भरतीच्या वेळी जुन्या कर्मचार्‍यांना संधी न दिल्याप्रकरणी योग्य चौकशी केली जाणार आहे, असे सावंत यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम खात्यात एकूण ७४४३ कर्मचारी आहेत. त्यातील नियमित कर्मचार्‍याची संख्या ४४८५ एवढी आहे. बांधकाम खात्यात ११८५ कंत्राटी कर्मचार्‍यांचा समावेश आहे. पीडब्लूडी सोसायटीमध्ये १७७३ कर्मचारी कार्यरत आहेत. तर, तात्पुरता दर्जा देण्यात आलेल्या कामगारांची संख्या १२६५ एवढी आहे, अशी माहिती बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी दिली.