साजिरा, गोजिरा श्रावण आला

साजिरा, गोजिरा श्रावण आला

– विजय प्रभू पार्सेकर देसाई
श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे|
क्षणात येई शिरशिर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे|
असा हा श्रावण महिना नुकताच सुरू झाला आहे. श्रावण महिन्यात अनेक व्रते, सण असतात. त्यामुळे हा महिना महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक दिवस हा देव-देवतांच्या पूजे-अर्चेचा असल्यामुळे साहजिकच रविवार हा आदित्य (सूर्यदेवाच्या) पूजनाचा, सोमवार शंकराचा, मंगळवार हा एरवी गणपतीचा, मात्र श्रावण महिन्यात मंगळागौरी पूजनाचा. लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर स्त्रिया पाच वर्षे मंगळागौर पूजन करीत असत. अजूनही काही घराण्यांत ते केले जाते. बुधवार हा सातेरीचा. मात्र श्रावण महिन्यात बुधपुजन केले जाते. या दिवशी केस सोडल्यास नखशिखांत पांढरा रंगच वापरला जातो. अन्नसुद्धा पांढर्‍या धान्याचेच शिजवतात. गुरुवार हा बृहस्पती पूजनाचा. दत्तात्रेयाचा. दत्तात्रेयाचा जन्म गुरूवारी झाल्यामुळे हा दिवस श्रीपाद श्रीवल्लभांना अर्पण केलेला आहे. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा. शनिवार हा मारूतीला अपर्ण केलेला असल्यामुळे त्यादिवशी पिंपळ पूजन केले जाते. सर्वसाधारणपणे सोमवार आणि गुरूवार सोडल्यास इतर दिवस स्त्रियांसाठीच.
श्रावणी रविवारी रंगीत पाटावर सूर्याचे चित्र काढून देवघरात किवा जिथे वास्तुपुरुषाची जागा असेल तेथे त्या पाटावर एक न सोललेली सुपारी घेऊन महिला स्वतःच पूजा करीत असत. दुर्वा आणि इतर फुले आणि पत्री वाहत असत. प्रत्येक दिवसाचा नैवेद्य निरनिराळा असे. एक दिवस मुठी, म्हणजेच तांबड्या तांदळाच्या पिठाची, गुळ घालून मूठ तयार करून ती उकडायची. झाली मूठ किंवा मुठी.
दुसरा आयतार पातोळ्यांचा, तिसरा खिचडी, चौथा पुरण किंवा पुरणपोळी किंवा पुरणाचे उकडीचे मोदक आणि यंदाप्रमाणेच पाचवा आल्यास पायस. लहानपणी रविवार मजेत जात असे. संध्याकाळी उत्तरपूजा करून आयतार तुलसी वृंदावनात विसर्जन करण्याचे काम अस्मादिकांचे. त्याबद्दल एक संपूर्ण ‘पिपरी’ (काकडी) अस्मादिकांना मिळत असे.
सोमवारी कुलदेवता आई भगवतीची पालखी असे. पहिल्या पालखीचा मान अर्थातच पार्सेकर देसायांचा. साहजिकच रात्री नटून अस्मादिकांना पेट्रोमॅक्सच्या दिव्यासह देवळात नेले जाई. दुसरा सोमवार प्रभूंचा (बापशे परोब) तिसरा पडचार, चौथा नाईक देसाई. पाच आल्यास गावजोश्यांचा. मात्र हा पाचवा सोमवार लाड कुटुंबीय करीत. सकाळी भगवती, ब्रह्मा, विष्णू, महादेव आणि हरीहरेश्वरमध्ये देवकृत्य असे. मात्र त्याला घरातील जाणती व्यक्ती जात असे.
नागपंचमी हा तिसरा महत्त्वाचा दिवस. नाग शेतातील किडे- किटक खाऊन शेतीचे रक्षण करतो म्हणून नागपूजन केले जाते. या दिवशी मातीचा नाग पूजतात. काहीजण पाटावर नागाचे चित्र काढून त्याची पूजा करतात. नऊ नागांची नावे घेऊन फुले वाहतात. नंतर दूध आणि लाह्यांचा नैवेद्य अर्पण करतात.
नऊ नागः अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया. आपणाला दिसतो तो ‘पांढरा’. त्यालाच आपण नाग मानतो आणि पूजेत देखील आपण अनंतादि नागभ्यो नमः असे म्हणतो, कारण इतर नावे आपणाला माहीत नसतात. पूजा समाप्तीचा मंत्रपट आपणाला माहीत नसतो. तो आहेः श्रावणे शुक्लपंचम्या, यकृतं नागपूजनम | तेत तृप्यन्तु नागा भवन्तु सुखदा सदा ॥
तद्नंतर येते नारळी पौर्णिमा. गोव्यात ‘सुताची पुनव’. याला श्रावणी असे पण एक नाव आहे. वर्षभर यज्ञोपवित धारण न करणार्‍याला हा दिवस महत्त्वाचा असतो. हा दिवस बहुधा श्रावण नक्षत्रावर येत असल्यामुळे श्रावणी म्हणत असावेत. एरवी यज्ञोपवित बदलणे आवश्यक आहे. त्यामुळे आपले अंतःकरण शुद्ध होते. या दिवशी खवळलेला दर्या शांत होऊन सागरावरील व्यवहार सुरळीत व्हावेत म्हणून सागरपूजन करून त्याला कल्पवृक्षाचे फळ म्हणजेच नारळ अर्पण करतात.
पूर्वी गोव्यात नारळी पौर्णिमेदिवशी सागर पूजन करून मच्छिमारीचा व्यवसाय सुरू केला जात असे. आता सरकार ठरवेल त्या दिवशी मच्छिमारी सुरू होते. यंदा नागपंचमीला नारळी पौर्णिमा ही रक्षाबंधन दिवस किंवा ‘राखी पौर्णिमा’ म्हणून सुद्धा ओळखली जाते. वैदिक काळापासून रक्षाबंधन या संस्काराची प्रथा सुरू आहे.
असे आपल्या ग्रंथात म्हटले आहे की याच दिवशी इंद्रपत्नीने त्याच्या मनगटावर दोरा बांधला. त्या दोर्‍याच्या सामर्थ्यानेच इंद्राने वृत्र नामक दैत्यावर सहज विजय मिळविला. दोरा (राखी) बांधण्याची प्रथा तेव्हा सुरू झाली असावी. इतिहासातही आपल्या पतीचे आक्रमक राजांपासून रक्षण व्हावे म्हणून अनेक राजस्त्रियांनी आक्रमकांना राखी बांधून बंधुत्वाचे नाते जोडले.
रक्षाबंधन हे त्यामुळे बहीण-भावाचे नाते दृढ करणारे साधन. बहीण भावाला – फक्त रक्ताचाच नव्हे, बंधू म्हणून आपले रक्षण करील अशी खात्री असलेल्या व्यक्तीला राखी बांधून स्वतःची जबाबदारी भावावर ठेवते. स्त्रीचे रक्षण करणे हे प्रत्येक पुरुषाचे आद्य कर्तव्यच. पाश्‍चात्य देशात त्याला स्त्रीदाक्षिण्य म्हणतात.
– यत्र नार्यस्तु पुज्यनो, रमन्ते तत्र देवताः मात्र आज दुर्दैवाने हे सुभाषित विसरले गेले आहे. स्त्रीकडे एक भोगवस्तू म्हणूनच पाहिले जाते. त्यामुळे राखी पौर्णिमा हा एक उपचार बनलेला आहे. असे असले तरी आजही भगिनी भावाला -येन बद्धो बलिराजा, दानवेंद्रो महाबल| तेन त्वां प्रति बध्नामि, रक्षे भाचल, माचल| शी विनंती करीत असते. समाजातील सर्व स्त्रिया आपल्या भगिनी आहेत असे ज्यादिवशी पुरुषांना वाटेल तो दिवस खराच राखी पौर्णिमेचा असेल. प्रार्थना करूया असा दिवस येवो.
श्रावण वद्य अष्टमी हा श्रीकृष्णाचा वाढदिवस, त्यावर तर स्वतंत्र लेखच लिहावा लागेल.
श्रावण महिन्यात वद्य अमावस्या ही पिठोरी अमावस्या. पुत्रवती स्त्रिया हे व्रत पूर्वी करीत असत. याच दिवशी पोळापण साजरा केला जातो. श्रावण महिना हे सण उत्सव घेऊन आला आहे. त्याचे स्वागत करूया!

Leave a Reply