ब्रेकिंग न्यूज़

सागरी हल्ल्याचा धोका

जैश ए महंमदने आपल्या काही दहशतवाद्यांना पाण्याखाली प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली असून भारतीय नौदल अशा प्रकारच्या कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यास समर्थ आहे असे प्रतिपादन नौदलप्रमुख ऍडमिरल करमवीर सिंग यांनी नुकतेच एका व्याख्यान प्रसंगी केले. श्री. सिंग यांच्या व्याख्यानातील वरील उल्लेखातून भारतापुढे असलेल्या एका नव्या धोक्याचे जणू सूतोवाच झालेले आहे. २००८ साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील सर्व दहशतवादी सागरी मार्गानेच आलेले होते. गुजरातजवळ येऊन त्यांनी तेथील एक मच्छीमारी ट्रॉलर पळवला होता आणि थेट मुंबईच्या किनार्‍यावर उतरून भीषण दहशतवादी हल्ला चढवला होता. ऍडमिरल सिंग यांनी त्यांना गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेली जी माहिती उघड केली आहे, ती पाहता अशाच प्रकारच्या एखाद्या हल्ल्याच्या प्रयत्नात जैश ए महंमद असल्याचे दिसून येेते. मुंबईवरील हल्ला लष्कर ए तोयबाने चढवला होता. यावेळी जैश ए महंमदचे नाव आलेले आहे. काश्मीरमधील दहशतवादाचा निःपात करण्याचा विडा मोदी सरकारने उचलल्यापासून दिवसागणिक तेथे दहशतवाद्यांना कंठस्नान घातले गेले. जैश ए महंमदचा काश्मीरमधील वरचष्मा केव्हाच संपुष्टात आलेला आहे. त्यातच काश्मीरचे ३७० कलमाखालील विशेषाधिकार हटवण्यात आल्याने जैशच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे. त्यामुळे न भूतो अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला चढवण्याची मनोरथे ती दहशतवादी संघटना रचते आहे. विशेष म्हणजे यावेळी पाकिस्तान सरकार उघडउघड ज्या प्रकारे काश्मिरींसाठी आपण कोणत्याही थराला जाऊ अशा धमक्या देत आहे, ते पाहता जैश सारख्या भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी पाकिस्तान राहील यामध्ये तीळमात्रही शंका नाही. खरे तर दहशतवादी शक्तींवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर प्रचंड आंतरराष्ट्रीय दबाव आहे. काळ्या यादीत पडण्याच्या दिशेने पाकिस्तानची वाटचाल सुरू आहे. परंतु तरीही भारतविरोधाची खुमखुमी त्यांना स्वस्थ बसू देईल असे वाटत नाही. आयएसआयच्या माध्यमातून आजवर जे काही चालत आले, तेच पुढे सुरू राहील यात काही शंकाच नाही. त्यामुळे भारताला अधिकाधिक दक्षता येणार्‍या काळात बाळगावी लागणार आहे. भारताला तिन्ही बाजूंनी सागराने वेढलेले आहे. त्यामुळे भारताची ही विस्तीर्ण किनारपट्टी एका अर्थी खुली सीमाच असल्याने या सागरी हल्ल्याच्या धोक्याचे गांभीर्य लक्षात येते. खरे तर किनारी सुरक्षेकडे आजवरच्या सरकारांनी जेवढ्या गांभीर्याने लक्ष पुरवायला हवे होते, तेवढे ते पुरवले गेलेच नाही. मुंबई हल्ल्यानंतर मागील यूपीए सरकारच्या काळामध्ये किनारी सुरक्षेसंदर्भात मोठमोठ्या घोषणा झाल्या होत्या, परंतु प्रत्यक्षात मात्र फारच कमी गोष्टी आल्या. त्यामुळे भारताची ही खुली सीमा राखणे हे खरोखरच आजही आव्हानात्मक आहे. दहशतवादी हल्ले कधी कुठे होतील हे कधीच सांगता येत नसते. हल्ल्याच्या पद्धतीत आणि स्वरूपात नेहमीच नावीन्य राखण्याचा दहशतवादी शक्तींचा आटापिटा असतो. त्यामुळे दरवेळी नवनवीन क्लृप्त्या त्यासाठी आखल्या जातात. संभाव्य हल्ला तर कुठेही होऊ शकतो. पर्यटनस्थळांना लक्ष्य केले जाऊ शकते, समुद्रकिनारी वसलेल्या आपल्या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला चढवला जाऊ शकतो, समुद्रकिनारी वसलेली मुंबईसारखी महानगरे लक्ष्य केली जाऊ शकतात. इतकेच कशाला, सागरामध्ये असलेल्या आपल्या नौदलाच्या पाणबुड्या, युद्धनौका यांच्यावरही हल्ले चढवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदैव दक्षता आणि जागरूकता याला पर्यायच नाही. अलीकडेच सहा दहशतवादी तामीळनाडूत शिरल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्या सहाही जणांच्या मुसक्या सुदैवाने वेळीच आवळल्या गेल्या, परंतु अशाच प्रकारे आणखी कोणी भारतीय हद्दीत शिरकाव करण्यात यश मिळवलेले नाही ना याची खात्री देता येत नाही. आपल्या सागरी सीमांचे संरक्षण नौदल करीत असते. त्याच्या जोडीला तटरक्षक दल आणि सागरी पोलीसही असतात, परंतु मुख्यत्वे नौदलाची ही जबाबदारी ठरते. त्यामुळेच नौदलाला या संभाव्य धोक्याबाबत गुप्तचर यंत्रणांनी अवगत केलेले आहे. व्याख्यानामध्ये नौदलप्रमुखांकडून त्याचा ओझरता उल्लेख केला जाण्यामागे दहशतवाद्यांचे हे मनसुबे आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि आम्ही सज्ज आहोत हा इशारा संबंधित दहशतवादी शक्तींना पोहोचवण्याचा आणि त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा उद्देश असावा. आजवर पाकिस्तान सरकार दहशतवादी शक्तींना आमचाही विरोध आहे आणि आम्ही त्यांच्यावर कारवाई करीत आहोत असा आव आणायचे. मात्र, काश्मीरचे विशेषाधिकार हटवल्यानंतरची त्यांची भाषा पाहिली, अण्वस्त्र हल्ल्याचे आणि कोणत्याही थराला जाण्याचे दिले जाणारे इशारे पाहिले, तर पाकिस्तान सपशेल उघडा पडला आहे. आज जगातील कोणताही देश उघडपणे त्याच्या पाठीशी उभा राहिलेला दिसत नाही. भारताने जागतिक पातळीवर पाकिस्तानची कोंडी केलेली आहे. अशा वेळी जैश सारख्या संयुक्त राष्ट्राने बंदी घातलेल्या संघटनेची पाठराखण जर पाकिस्तान करणार असेल तर तो अधिक गोत्यात येईल हे निःशंक समजावे!