साखळीत २ नवे रुग्ण

साखळीत गावठण येथे १ व हरवळे येथे १ असे दोन नवीन रुग्ण सापडल्याची माहिती साखळी आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. उत्तम देसाई यांनी दिली. साखळीतील रुग्णसंख्या ३१ वर पोचली असून डिचोली तालुक्याची संख्या ४० झाली आहे.

डिचोलीमध्ये २ तर सर्वणमध्ये १ रुग्ण
डिचोली बोर्डे येथे काल गुरुवारी एक पॉझिटिव्ह रुग्ण तर मावळींगे येथे एक चालक पॉझिटिव्ह सापडला. तसेच सर्वण येथील ज्या इसमाला लागण झाली त्याचा मुलगा पॉझिटिव्ह आला असून डिचोलीत रुग्ण संख्या पाच झाल्याची माहिती डिचोली आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. मेधा साळकर यांनी दिली. दरम्यान काल ५१ जणांची तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल आज शुक्रवारी येणार आहेत.

चौथ्या बळीवर मडगावात अंत्यसंस्कार
मडगाव (न. प्र.) राज्यातील कोरोनाचा चौथा बळी ठरलेल्या ताळगावातील व्यक्तीवर काल संध्याकाळी मठग्रामस्थ हिंदू सभेच्या पाजीफोंड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे पुत्र व कुटुंबीय उपस्थित होते. मंगळवारी रात्री पावणेबाराच्या दरम्यान सदर व्यक्तीचे वयाच्या ६४ व्या वर्षी मडगावच्या कोविड इस्पितळात निधन झाले होते. त्यांना गेल्या आठवड्यात कोविड इस्पितळात दाखल केले होते. आरोग्याधिकार्‍यांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यास प्रशासनाने परवानगी दिली.