ब्रेकिंग न्यूज़

सांताक्रूझ, सांत आंद्रे पीडीएतून न वगळल्यास आंदोलन

>> सगळीच गावे वगळणे अशक्य ः सरदेसाई

सांतआंद्रे मतदारसंघाचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, सांताक्रुझ मतदारसंघाचे आमदार आंतोनियो उर्फ टोनी फर्नांडिस, माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली सांताक्रुझ व सांतआंद्रे मतदारसंघातील विविध पंचायतींचे सरपंच, पंच व ग्रामस्थांनी काल पर्वरी येथे मंत्रालयात जाऊन नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांची भेट घेतली व सांताक्रुझ आणि सांतआंद्रे मतदारसंघातील पंचायतींना पीडीएखाली आणणारी अधिसूचना त्वरीत मागे घेण्याची मागणी केली.

आम्हाला पीडीए नको असा नारा यावेळी या ग्रामस्थांनी दिला. तसेच मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. येत्या ६ एप्रिल रोजी सांताक्रुझ व सांतआंद्रे मतदारसंघातील सुमारे ५ हजार ग्रामस्थांचा मोर्चा पणजीतील आझाद मैदानावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी फ्रान्सिस सिल्वेरा यांनी सांगितले. यावेळी वरील ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर बोलताना नगर आणि नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई म्हणाले की, सांताक्रुझ व सांतआंद्रे या भागांचा विकास व्हावा यासाठीच हे भाग पीडीएखाली आणण्यात आलेले आहेत.

ग्रामस्थांनी जी मागणी केलेली आहे त्यावर येत्या १९ रोजी होणार्‍या नगर आणि नियोजन खात्याच्या मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्याचे आश्‍वासन सरदेसाई यांनी दिले. मात्र, सांतआंद्रे व सांताक्रुझमधील सगळीच गावे पीडीएतून काढून टाकण्याची मागणी मान्य करणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. विशेष करून कदंब पठार तर पीडीएतून काढून टाकणे ही मागणी मान्य करता येण्यासारखी नसल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. सांताक्रुझ व सांतआंद्रे या मतदारसंघातील लोकांना विकास हवा असल्याने लोकांनीच पीडीएची मागणी केली होती, असा दावा सरदेसाई यांनी यावेळी केला. मात्र, ग्रामस्थांनी तो दावा फेटाळताना लोकांनी तशी मागणी कधीच केली नव्हती, असे सांगितले.

फ्रान्सिस सिल्वेरांचा पीडीएचा राजीनामा
सांतआंद्रे मतदारसंघाचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी काल ग्रेटर पणजी पीडीएच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याचे पत्र काल त्यांनी विजय सरदेसाई यांना दिले. सांताक्रुझ मतदारसंघाचे आमदार आंतोनियो फर्नांडिस यांनी यापूर्वीच पीडीए सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे.

 

ग्रामस्थांचा विरोध असल्याने
पीडीए नको ः आमदार
आमच्या मतदारसंघातील ग्रामस्थांचा पीडीएला विरोध आहे. आणि म्हणूनच आम्हालाही पीडीए नको आहे, असे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा व आंतोनियो फर्नांडिस यांनी यावेळी सरदेसाई यांना सांगितले.

नगरनियोजन कायद्याखाली
विकासाची ग्रामस्थांची मागणी
सरकारला जर सांतआंद्रे व सांताक्रुझचा विकास साधायचा असेल तर हा विकास नगर आणि नियोजन कायद्याखाली होऊ द्या. पीडीएखाली आणून या मतदारसंघात कॉंक्रिटचे जंगल उभे करू नका, अशी जोरदार मागणी यावेळी ग्रामस्थांनी मंत्री सरदेसाई यांच्याकडे केली. तुम्हाला जर खरोखरच गोंय, गोंयकार आणि गोंयकारपण जपायचे असेल तर आमची मागणी मान्य करावीच लागेल, असेही यावेळी ग्रामस्थांनी सरदेसाई यांना सांगितले.

यावेळी आलेल्या ग्रामस्थांमध्ये रुडॉल्फ फर्नांडिस, मंडुर-आजोशीचे सरपंच अजित बकाल, कुडका-बांबोळीच्या सरपंच मारिया डिकुन्हा, सांताक्रुझचे सरपंच मारियानो आरावझो, गोवा वेल्हाचे सरपंच फ्रान्सिस डिसोझा, पंच सदस्य व सुमारे १०० ग्रामस्थांचा समावेश होता.