ब्रेकिंग न्यूज़

सांतइनेज येथे पत्नीचा भोसकून खून करून पती फरार

तांबडीमाती – सांतइनेज, पणजी येथे राहत्या भाडोत्री खोलीत पतीने पत्नीचा सुर्‍याने भोसकून खून केल्याची घटना काल सकाळी उघडकीस आली आहे. विष्णू उमाशंकर वर्मा (३०) याने पत्नी रूखसार पठाण (२४) हिचा खून करून दहा महिन्यांच्या मुलाला घेऊन पलायन केले आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
या खुनाच्या घटनेची माहिती पोलिसांना सकाळी साडे दहाच्या सुमारास मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास कामाला सुरुवात केली. खुनासाठी वापरण्यात आलेल्या सुरा पोलिसांनी हस्तगत केला आहे.

मयत रूखसार हिच्या पोट, मानेवर चाकूने अनेक वार केल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी पंचनामा करून तिचा मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात शवचिकित्सेसाठी पाठविला आहे.

संशयित विष्णू याला सकाळी साडे आठच्या सुमारास लहान मूल आणि बॅग घेऊन घराबाहेर निघताना बघितल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली आहे. मागील दोन महिन्यांपासून सदर जोडपे भाड्याच्या खोलीत राहत होते. चार – पाच दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातून खोलीवर परतले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी तपासकामाला सुरुवात केली असून विष्णू याने पळून जाण्यासाठी वापरलेली दुचाकी पणजी येथील कदंब स्थानकाजवळ सापडली आहे. येथील पोलिसांनी संशयित विष्णू याची माहिती राज्यातील सर्व पोलीस स्थानके, रेल्वे स्टेशनांना कळविली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर अधिक तपास करीत आहेत.