सल्ले ऐकावे जनाचे …

  • सरिता नाईक
    (फातोर्डा-मडगाव)

एकाच गोष्टीसाठी दहा जण दहा प्रकारचे सल्ले देतात आणि गोंधळून जायला होतं. काही सल्ले तर एकमेकांच्या अगदी विरुद्ध असतात. एक डॉक्टर म्हणतात, जेवताना पाणी पिऊ नये तर दुसरे डॉ. म्हणतात जेवताना मध्ये मध्ये घोट घोट पाणी प्यायला हवं!!

दुसर्‍यांना सल्ले देणे ही सर्वांत सोपी गोष्ट आहे. जो तो दुसर्‍यांना सल्ले देत असतो. बचतीविषयक सल्ले, शिक्षण विषयक सल्ले, करिअर विषयी सल्ले, आरोग्यविषयक सल्ले, योग-प्राणायामाविषयी सल्ले, इतकंच काय जीवनाशी संबंधित प्रत्येक बाबींविषयी सल्ले.
विमलाबाईंचं वाढत्या वयात वजनही वाढत चाललं होतं. म्हणून वजन कमी करण्याचा उपाय विचारण्यासाठी त्या डॉक्टरांकडे गेल्या. डॉ.नी घाम गळेपर्यंत भरपूर चालण्याचा सल्ला दिला. त्यांच्या शेजार-पाजारच्या काही बायका रोज संध्याकाळी चालायला जायच्या. त्यांच्याबरोबर ह्या पण निघाल्या. बाकीच्या बायका होत्या चाळीस-पन्नासच्या आणि विमलाबाई होत्या सत्तरी ओलांडलेल्या. वयातला फरक लक्षात न घेता त्यांच्या वेगाने विमलाबाईपण भराभर भराभर चालू लागल्या. परिणामी दुसर्‍या दिवशी चालणं तर सोडाच; त्यांना उभं पण राहता येईना, इतके त्यांचे पाय सुजले आणि दुखू लागले.
‘भरपूर पाणी प्या’ हा कुणाचातरी सल्ला ऐकून श्यामल ताईंनी सकाळपासून रात्रीपर्यंत भरपूर पाणी प्यायचा सपाटा लावला. रात्री मध्ये जाग आली तरी पाणी पीत. यामुळे झालं काय तर पाणी आवश्यकतेपेक्षा जास्त झाल्यामुळे त्यांना रात्रीही वारंवार लघुशंकेसाठी उठावं लागू लागलं. काही दिवसांनी शरीरावर सूज येऊ लागली. मग डॉ.कडे गेल्या, डॉ.नी त्यांना पाणी कमी पिण्याचा सल्ला दिला.
बाबूरावांनी गोविंदरावांना कुठल्यातरी फायनान्स कंपनीमध्ये बचत (सेव्हिंग) करण्याचा सल्ला दिला. कारण ती कंपनी भरपूर व्याज देत होती. एक-दोन वर्षातच त्या कंपनीने आपला गाशा गुंडाळला आणि गोविंदरावांचे बरेच पैसे बुडाले.
सध्या व्हॉट्‌सऍपवरून तर सल्ल्यांचा पाऊस पडतोय. कोणी म्हणतंय अमुक व्याधीसाठी अमुक अमुक उपाय करा. गुडघे दुखतात? अमुक अमुक व्यायाम करा. मुलगा दहावी पास झाला?… त्याला अमुक शाखेमध्ये घाला किंवा अमुक कॉलेजमध्ये घाला. मुलांना अमुक अमुक ट्यूशनक्लासेसमध्येच घाला. खात्रीने चांगल्या मार्कांनी पास होतील.
जे आंधळेपणाने हे सल्ले मानतात त्यांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. सल्ले देणार्‍याचं काहीच जात नाही. ते सल्ले देतात आणि विसरूनही जातात. झालेल्या नुकसानीचे भागीदार ते होत नाहीत.
व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. एखादं औषध एका व्यक्तीला मानवलं तरी तीच व्याधी असलेल्या दुसर्‍या व्यक्तीला मानवेलच असं नाही. म्हणून कोणीही सल्ला दिला तर आपण त्यावर आधी विचार केला पाहिजे. हा सल्ला आपल्या कितपत पचनी पडेल हे पाहिले पाहिजे.

माझ्या मुलीकडे शाहीन नावाची एक बाई कामाला येते. बोलता बोलता ऍल्युमिनियमच्या भांड्यांचा विषय आला. मुलगी तिला ऍल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक करणं चांगलं नसतं हे पटवून सांगण्याचा प्रयत्न करत होती. तर ती म्हणाली, ‘‘काय सांगता तुम्ही दिदी? आम्ही तर ऍल्युमिनियमशिवाय दुसरी भांडी वापरतच नाही. माझे वडील आता नव्वद वर्षांचे आहेत आणि आई ऐंशीची. अजून धडधाकट आहेत.’’ आता बोला, यापुढं आम्ही काय बोलणार?
लताने मैत्रीणीच्या सांगण्यावरून आपल्या मुलीला दहावीत असताना एका प्रसिद्ध ट्यूशन क्लासमध्ये दाखल केले. चांगले लाखभर रुपये खर्च केले. पण तिथलं अध्यापन इतकं वरच्या पातळीवरचं होतं; बिचारीच्या डोक्यावरून गेलं. लाखो रूपये पाण्यात!
योग आणि प्राणायाम करण्याचा सल्ला तर हल्ली खूपच प्रमाणात मिळतो. चांगली गोष्ट आहे. पण हे जर योग्य प्रकारे, शास्त्रोक्त पद्धतीने केले गेले नाहीत तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो हे लक्षात घेतले जात नाही. काही प्रकारच्या व्याधी असलेल्यांनी यातले काही प्रकार टाळायचे असतात; इकडे लक्ष न देता सर्रास योग, प्राणायाम, व्यायाम केला जातो. याचा फायदा न होता उलट तोटाच होऊ शकतो.

त्यात परत अमुक व्यायाम इतका वेळ केला पाहिजे; अमुक प्राणायाम इतकी इतकी मिनिटं झाला पाहिजे, जप इतका वेळ करावा, ध्यानासाठी इतका वेळ दिला पाहिजे, कुणी म्हणतं हे स्तोत्र म्हणणं चांगलं असतं, कुणी म्हणतं अमुक स्तोत्राची इतकी पारायणं करा- या सगळ्या वेळाची बेरीज केली तर सगळा दिवस यातच संपून जाईल. मग आम्ही पामरांनी आमच्या उपजिविकेचं कार्य केव्हा बरं करायचं?
टी.व्ही.वरील जाहिरातीतील सल्ले तर कहर करतात. कुणी म्हणतं मुलांना बोर्नव्हिटा द्या, हॉर्लीक्स द्या, पिडियाशुअर द्या. हे वापरल्याने उंची वाढते, स्मरणशक्ती वाढते, मुलं हुशार होतात आणि आमच्या आधुनिक आया सारासार विचार न करता एकामागून एक टॉनिकचा मारा करतात. सगळं आयतं मिळतं. घरात विशेष काही बनवण्याची कटकट नाही. आता मुलंच ती. त्यांना नेहमी एकच चव आवडत नाही. मग उरलेलं सगळं केराच्या टोपलीत. मधल्यामध्ये जाहिरातवाल्यांचं आणि व्यापार्‍यांचं चांगलंच फावतं.
एकाच गोष्टीसाठी दहाजण दहा प्रकारचे सल्ले देतात आणि गोंधळून जायला होतं. काही सल्ले तर एकमेकांच्या अगदी विरुद्ध असतात. एक डॉक्टर म्हणतात, जेवताना पाणी पिऊ नये. त्यामुळे अन्नपचन करणारा जठराग्नी मंदावतो आणि पचनक्रिया बिघडते. तर दुसरे डॉ. म्हणतात जेवताना मध्ये मध्ये घोट घोट भर पाणी प्यायला हवं. जसं तांदळामध्ये पाणी घातल्याशिवाय फक्त अग्नीमुळे भात तयार होत नाही तसंच अन्नाबरोबर पाणी पिल्याशिवाय अन्नपचन नीट होत नाही. आता तुम्हीच सांगा कुणाचा सल्ला मानावा? कुणाचं ऐकावं?
तर मंडळी, ऐकावं सगळ्यांचंच. पण त्यावर विचार करून, तारतम्य बाळगून त्यापैकी आपल्याला काय उपयुक्त असेल ते पाहूनच सल्ला अमलात आणावा.
सरतेशेवटी सर्वांना एक सल्ला द्यावासा वाटतो की कुणी विचारल्याशिवाय सल्ला द्यायला जाऊ नये.