सर्व शेतकर्‍यांना पेन्शन

>> पहिल्याच बैठकीत निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दुसर्‍या पर्वाची धडाक्यात सुरुवात केली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत सर्व शेतकर्‍यांना दरवर्षी ६ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय शेतकर्‍यांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’ योजनेच्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला. या योजनेचा देशातील १४.५ कोटी शेतकर्‍यांना थेट लाभ मिळणार आहे.

शहिदांच्या मुलांना स्कॉलरशीप
शहिदांच्या मुलांच्या स्कॉलरशीपमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही मोदी मंत्रिमंडळाने घेतला आहे. दहशतवादी आणि माओवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांची स्कॉलरशीप दरमहा २ हजार रुपयांवरून २५०० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असून मुलींची स्कॉलरशीप २२५० रुपयांवरून ३ हजार रुपये करण्यात आली आहे. नव्या सरकारचा पहिला निर्णय देशाचे संरक्षण करणार्‍यांसाठी समर्पित करतो, असे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.