सर्व आमदारांनी कोविड निधीला महिन्याचे वेतन द्यावे ः सुदिन

गोव्यातील चाळीसही आमदारांनी तसेच सर्व सरकारी अधिकार्‍यांनी आपले एका महिन्याचे वेतन (सर्व भत्त्यांसह) पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कोव्हिड-१९ मदत निधीसाठी द्यावे, अशी मागणी काल मगो नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली.

त्यापैकी ५० टक्के वेतन हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कोव्हिड-१० मदत निधीसाठी तर उर्वरीत ५० टक्के हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कोव्हिड निधीसाठी द्यावे, असे ढवळीकर यांनी म्हटले आहे.

कोव्हिडसारख्या संकटाच्या काळात रुग्णांची सेवा करणार्‍या सर्व सरकारी इस्पितळातील कर्मचार्‍यांचा सरकारने पूर्ण विमा उतरवावा. त्या कर्मचार्‍यांचा २५ लाख रुपयेपर्यंतचा विमा उतरवावा. इस्पितळ कर्मचार्‍यांबरोबरच पोलिस कर्मचार्‍यांचाही विमा उतरवावा, असे ढवळीकर यानी म्हटले आहे. आपला जीव धोक्यात घालून हे लोक या आपत्तीच्या काळात सेवा बजावत असून त्यांच्या कुटुंबीयांचा विचार करून सरकारने त्यांचा विमा उतरविण्याची गरज असल्याचे ढवळीकर यानी म्हटले आहे.