सर्वांसाठी योगासने

सर्वांसाठी योगासने

– कांता जाधव भिंगारे, आयुर्वेद तज्ज्ञ
आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी योगशास्त्राचा उपयोग होतो हे आता जगमान्य आहे. खास करून आजच्या धावपळीच्या, दगदगीच्या युगात व जीवनात ती एक अत्यंत आवश्यक गोष्ट झालेली आहे.
खूप थकवा आल्यावर योग्य त्या आसन स्थितीत आपण काही काळ बसलो तर आपल्याला टवटवीतपणा तर येतोच शिवाय अगदी ‘आकाश कोसळलं’ तरीही माणूस आपल्या मनावर उत्तम ताबा ठेवू शकतो. पर्यायाने शारीरिक आरोग्यही अबाधित राहते. हजारो वर्षांपासून भारतात आत्मोन्नतीसाठी ‘योगशास्त्र’ अभ्यासिले जात आहे. योग या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे. ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, राजयोग, तंत्रयोग, अष्टांग योग आदी अनेक शाखांचा ‘योग’ या शब्दात अंतर्भाव होतो. या सर्व शाखा म्हणजे मूल्यत: एकमेकात मिसळलेले प्रवाहच आहेत. आज घडीला आपल्या भारत देशात तसेच विदेशात किंबहुना जगभर लोकप्रिय असलेले योगशास्त्र म्हणजे ‘अष्टांग योग’ वा हठयोग हे आहे.अष्टांग योगात मानसिक व शारीरिक स्वास्थ्याचे संवर्धन करण्यासाठी अभ्यासली जाणारी चार अंगे आहेत ती पुढीलप्रमाणे- १) यम, २) नियम, ३) आसन व ४) प्राणायाम यात ‘यम’ म्हणजे समाजात राहताना, वावरताना पाळावयाचे काही संकेत होय. नियम म्हणजे वैयक्तिक विकासासाठी पाळावयाची बंधने होय. यम आणि नियमांचे योग्य पालन केल्याने योगाभ्यासासाठी शारीरिक व मानसिक तयारी होत असते. ‘आसन’ म्हणजे शरीराची स्थिती होय. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असे बंध आणि मुद्रा यांचा देखील यात समावेश होतो.
‘आसनानि समस्तानि यावन्तो जीव जन्तव:|’ म्हणजे जितके जीवजंतू तितकी आसने!
‘प्राणायाम’ म्हणजे ‘श्‍वासप्रश्‍वास योग: अति विच्छेद:|’
म्हणजेच श्‍वास आणि प्रश्‍वास यांच्यामधील अंतर लांबविणे. प्राणायामाने शरीर शुद्धी व नाडीशुद्धीही होते व आसनांनी सिद्ध झालेले शरीर प्राणायामाने अधिक शुद्ध करता येते.
* शरीर व मन यांच्या स्वास्थ्यासाठी तसेच प्राणायामाच्या दृष्टीने आसनांचे विशेष महत्व आहे. श्री पतंजली ऋषींनी ‘पतंजली योगदर्शन’ या ग्रंथात आसनांसंबंधी काही महत्त्वाची सूत्रे दिली आहेत. त्यांपैकी पहिले सूत्र म्हणजे ‘स्थिरसुखमासनम्’ जे स्थिर व सुखदायी आहे तेच आसन. थोडक्यात आसनस्थ स्थितीपासून स्वत:ला मानसिक व शारीरिक सुखानुभव प्राप्त झाला पाहिजे.
* सुखानुभव प्राप्त होण्याकरिता पतंजली मुनींनी पुढील उपाय सुचविला, तो म्हणजे ‘प्रयत्न शैथिल्यानन्तस मापत्तिभ्याम’ अर्थात आसने करत असताना व आसनस्थ स्थितीत प्रयत्नांची शिथिलता करावी. त्याकरिता जाणीवपूर्वक प्रयत्न शक्यतो करू नयेत. ती सहजतेने करावीत जेणेकरून शरीर व मनाला क्लेश होणार नाही.
* त्यासाठी आपले मन अनंतावर स्थिर ठेवावे. दोन्ही भुवयांच्या मधल्या भागात (स्थपनी मर्मावर) लक्ष केंद्रित करावे. यामुळे मन लवकर एकाग्र होतो. अशा प्रकारे मनाचा अनंतात लय झाला की आपोआप शिथिलता, सहजता येते व त्यामुळे शारीरिक व मानसिक स्थैर्य निर्माण होते आणि या सार्‍यांचा परिणाम म्हणजेच ‘सुखानुभव’!
आसनांचे फायदे – योगासने ही वयाच्या ७ व्या वर्षापासून ते ७० वर्षांपर्यंत कुणीही करावीत.
* प्रत्येक मुला-मुलींसाठी प्रत्येक स्त्री-पुरुषांसाठी व प्रत्येक वृद्ध व्यक्तींसाठी योगासने ही आवश्यक व उपयुक्त ठरतात.
* योगासनांच्या नियमित सरावाने आपला मेरूदंड तसेच संपूर्ण शरीर लवचीक व ताकदवान-शक्तीवान बनते.
* आरोग्य सुधारते व शरीराच्या सर्व संस्था योग्य प्रकारे कार्यक्षम राहतात.
* विशेषत: खेळाडूंनी योगासने केल्यास त्यांना खेळताना शक्यतो दुखापत होत नाही असा अनुभव आहे व दुखापती झाल्याच तर त्या लवकर बर्‍या होतात.
* खेळाडूंची शारीरिक क्षमता, मानसिक ताकद आणि एकाग्रता वाढते.
* योगासनांचा कौशल्ये वाढविण्यासाठी देखील चांगला उपयोग होतो.
* प्रत्येकालाच जरी मैदानावर खेळायचे नसले तरी प्रत्येक व्यक्तीला वाढत्या वयाबरोबरच काही समस्या व त्रासांना सामोरे जावे लागते. चाळिशीनंतर हाडे ठिसूळ होतात, हाडांची झीज होते, व्यायाम कमी होतो, ताण वाढतात, शारीरिक दगदग वाढते त्यामानाने शरीराची लवचिकता कमी होते. मनोकायिक बदल होतात (हार्मोनल चेंजेस) त्याची दृश्य लक्षणे म्हणजे चिडचिड वाटते, थकवा लवकर जाणवतो, रोगप्रतिकार शक्ती कमी होते. अशावेळी तर योगासनांची गरज प्रकर्षाने जाणवते.
* नियमित योगाभ्यासाने वरील सर्व तक्रारींवर बर्‍याच अंशी मात करता येते. म्हणूनच मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी योगाभ्यासाला पर्याय नाही.
* योगशास्त्रानुसार आसनांमुळे शरीरामध्ये असलेल्या निरनिराळ्या विरोधी तत्त्वांमध्ये एक प्रकारचे समत्व निर्माण होते.
* ‘आसनेन रजो हन्ति’ अर्थात आसनांमुळे रजोगुण नाहीसा होतो, लोभ, मोह, मत्सर या दुर्गुणांचा नाश होतो. आळस नाहीसा होतो. तसेच स्थैर्य, आरोग्य व सौंदर्यप्राप्ती होते.
* आसने ही कुणीही करावीत ‘युवावृध्दोति वृध्दो वा व्याधीतो, दुर्बलोपि वा’ म्हणजेच युवक, वृद्ध, अतिवृध्द तसेच रोगी वा अशक्त यांपैकी कोणीही ही आसने करावीत त्यांना याचा फायदाच होईल.
* स्त्री-पुरुष, विभिन्न जाती, धर्म, देश, प्रांत, संस्कृती, शिक्षण, व्यवसाय या सर्व गोष्टी योगाभ्यासाच्या आड येत नाहीत. त्यामुळेच म्हटले आहे की ‘सर्वांसाठी योग’!
* नियमित योगासने केल्याने आत्मबळ वाढते, स्फूर्ती येते. तसेच एक प्रकारे मानसिक, शारीरिक स्थैर्य व आरोग्य प्राप्तीची जाणीव होऊ लागते.
आसने करण्याची वेळ – पहाटेचा ‘ब्रह्म मुहूर्त’ म्हणजे सकाळी ४ ते ५ च्या दरम्यानची वेळ ही उत्तम समजली जाते. कारण या वेळेत निसर्गात वातावरण शुद्ध आणि शान्त असतं. पशुपक्ष्यांचे नैसर्गिक आवाज वगळता मानवनिर्मित आवाज बंद असतात. अशावेळी मन एकाग्र करण्यास कष्ट पडत नाहीत. तसेच त्यावेळी पोट शौचादि विधी उकरल्याने रिकामे व हलके झालेले असते त्यामुळे आसने चांगली व सहज होतात.
* सकाळी योगासने करण्यास वेळ मिळत नसेल तर सायंकाळी रिकाम्या पोटी योगाभ्यास करावा. या दोन्ही वेळा शक्य नसल्यास अभ्यासकाने रिकाम्या वा हलक्या पोटी कोणत्याही वेळी योगाभ्यास करण्यास हरकत नाही.
आसने करण्याची जागा कशी असावी? – एखादी शान्त वा निवान्त जागा योगाभ्यासाकरिता उत्तम असते. शक्यतो अशी जागा हवेशीर, कीटक विरहित व स्वच्छ असावी. आसने करताना त्या जागी जर धूप, अगरबत्ती इत्यादी लावल्यास मन अधिक प्रसन्न होते.
* बसण्यासाठी एखादी चटई, चादर वा पातळ गादी अंथरल्यास फरशीचा थंडावा लागणार नाही.
आसनांकरिता कपडे कसे असावेत? – शक्यतो कमीत कमी कपडे घालून योगाभ्यास करावा. कपडे हे सैलसर व हलके असावेत तसेच ते सुती असल्यास घाम आपोआप शोषला जाईल. मात्र थंडीच्या दिवसात थंडीपासून बचाव होईल व आसनेही करण्यास सुलभ पडेल असे कपडे घालावेत.

आसनांसाठी बैठक कशी असावी? – बैठक किंवा ज्यावर आपण बसणार आहोत ती चटई फार टणक वा फार मऊ नसावी. वर सांगितल्याप्रमाणे एखादी सतरंजी वा रजई पांघरून त्यावर पंचा वा तत्सम साधा स्वच्छ कपडा अंथरावा म्हणजे आपली बैठक योग्य होईल.

आसनांची पूर्व तयारी – आसने करण्यापूर्वी शरीर शुद्धी होणे लाभदायक ठरते. प्रथम मलमूत्रादिंचा त्याग करावा. त्यानंतर शक्यतो पूर्ण स्नान करावे.
* योगाभ्यास करण्यापूर्वी मनाची व शरीराची प्रथम पूर्व तयारी करणेही आवश्यक ठरते. अर्थात मन शान्त व शरीर स्थिर करावे.
* योगाभ्यासापूर्वी स्नान, शरीरताण (स्ट्रेचींग), जलद चालणे (वॉकिंग) वा इतर कोणत्याही सौम्य हालचाली केल्यास आसनांकरिता शरीर तयार होते. (क्रमश:)