सर्वांना आपलासा करणारा ‘चहा’

सर्वांना आपलासा करणारा ‘चहा’

  • गौरी भालचंद्र

पूर्वीचे लोक जसे गूळ व पाणी देत असत, तसे आता कोणी आपल्याकडे आले किंवा आपण कोणाकडे गेलो तर किती सहजच चहा दिला-घेतला जातो. काळानुसार सगळेच बदलले, त्याला चहा पण अपवाद नाही! अनेक बदल पचवून चहा आपली लोकप्रियता कायम राखूनच नव्हे तर नित्य वाढवत आहे.

पूर्वीचे लोक जसे गूळ व पाणी देत असत, तसे आता कोणी आपल्याकडे आले किंवा आपण कोणाकडे गेलो तर किती सहजच चहा दिला-घेतला जातो. काळानुसार सगळेच बदलले, त्याला चहा पण अपवाद नाही! अनेक बदल पचवून चहा आपली लोकप्रियता कायम राखूनच नव्हे तर नित्य वाढवत आहे. खरंतर चहासारखे खरे समाजाशी निगडित पेय दुसरे नाही.

ठराविक वेळी घराघरांतून कप-बश्यांचे येणारे आवाज… पाठोपाठ उकळत्या चहाचा सुवास… घरोघरी गॅस येण्याआधीच्या काळात या आवाजापूर्वी स्टोव्हच्या आवाजाने चहाची वेळ झाल्याचे कळायचे असे माझी आजी म्हणते नेहमी…
जरी चहाच्या वेळा ठराविक असल्या तरी घरी आलेल्याचे आदारातिथ्य म्हणून कमीतकमी चहा तरी द्यायलाच हवा अशी पद्धत असल्याने केव्हाही चहा केला जाई. एकत्र कुटुंबात घरात माणसे खूप असत. त्यांच्या वेगवेगळ्या वेळा. खूप येणं-जाणं, त्यामुळे काही घरी दिवसांतून अनेक वेळा चहा केला जायचा आणि काही घरांत तर कायम एकीकडे चहा उकळत असायचा.

चीनीमातीच्या कप-बश्या बहुतेक सगळ्यांकडे वापरल्या जातात. पाहुण्यासाठी वेगळ्या छान नक्षीदार कपबश्या असतात. त्यातही खास पाहुण्यांकरिता आणखी ठेवणीतल्या कपबश्या काढल्या जातात. पण काहीच मोजक्या लोकांकडे टी-पॉटमध्ये चहा घेतात. त्यांच्याकडे टी-सेट्स असतात. त्यात साखर, दूध सगळे वेगवेगळ्या भांड्यात ठेवायचे आणि नाजुकपणे कीटलीतून चहाचे लालसर पाणी कपात ओतायचे. त्यात थोडे दूध घालून साखर आपल्या इच्छेनुसार घालायची पद्धत आहे.

त्यानंतर आल्या टी बॅग्स! खास लोकांसाठी खास चहा डिपडिपच्या जाहिरातीमुळे आमच्यासारख्या लोकांपर्यंत पोहोचल्या.
पहिल्यापासूनच बशीत ओतून चहा पिणे गावरानपणा, अडाणीपणाचे लक्षण समजले जाते. तरीही बहुसंख्य लोक अगदी फुरफुर करत नाही तरी पण बशीनेच चहा पीत असतात. हळूहळू ते पण सुधारले जाऊन कपाने चहा पिऊ लागले आहेत.
मातीच्या छोट्या मटक्यात चहा विकला जातो. अजूनही काही ठिकाणी तो मिळतो. ते पण बर्‍याच घरी फॅशन म्हणून सुरू झाले.

कामगारांपासून मालकांपर्यंत… गरीब मध्यमवर्गीय व्यक्तीपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांना हवा असतो चहा… फरक इतकाच की मोठाल्या आलिशान हॉटेलात श्रीमंत वर्गासाठी नक्षीदार किटली नि कपातून येतो; कामगार मात्र टपरीवरचा चहा साध्या कपातूनही पितो. चहा सर्वांना आपलेसे करतो. सगळ्यांत मिसळून, त्यांच्यातलाच होऊन जातो.

चहात साधा चहा, कटिंग, फुल्ल, स्पेशल चहा, कोरा चहा, ग्रीन टी, लिंबू पिळलेला चहा, आल्याचा चहा, वेलदोडे घातलेला चहा, मसाला चहा… असे असंख्य प्रकार आहेत. प्रत्येकाची आवड वेगळी, निवड वेगळी. कोणाला गोड चहा आवडतो, कोणाला स्ट्रॉंग चहा आवडतो, कोणाला बिनादुधाचा चहा आवडतो. गरमागरम चहा पिणार आहेत, तसे कोल्ड-टीची आवड असणारेही आहेत. चहाबाजांच्या तर्‍हाही तेवढ्याच. अगदी अर्ध्या रात्री चहा पिणारेही आहेत.

आम्हां सर्वांच्या आयुष्यात इतके महत्त्वाचे स्थान चहाने पटकावले आहे की त्याच्याविना दिवसाची सुरुवात करण्याची कल्पनाही आम्ही करू शकत नाही. थकवा दूर करण्यासाठी, झोप उडावी म्हणून, खूप कामे आहेत म्हणून किंवा काहीच काम नाही म्हणून, खूप थंडी आहे, भरपूर पाऊस आहे… कोणतीही कारणं चहा पिण्यास चालते. मजा येते… एखाद्या धावपळीच्या वेळी किंवा बर्‍याच दगदगीनंतर एका निवांत क्षणी असा चहा मिळाला की ‘क्या बात हे!’ असे वाटते. गप्पांची मैफल जमावी… आणि त्यात वाफाळता चहा समोर… चवदार, तरतरी आणणारा चहा… किती छान!