ब्रेकिंग न्यूज़

सर्वपक्षीय आणि सर्वस्तरीय जनतेमध्ये उत्सुकता आणि उत्साह

गोव्याचे मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षणमंत्री श्री. मनोहर पर्रीकर अमेरिकेतील अद्ययावत उपचारांनंतर आज रात्री उशिरा आपल्या प्रिय गोव्यात परतणार आहेत. त्यांच्या पुनरागमनाबाबत गोव्यात सर्वस्तरीय व सर्वपक्षीय जनतेमध्ये विलक्षण उत्सुकता व उत्साह असून सर्वत्र हाच चर्चेचा विषय बनला आहे. गोव्यात आज रात्री उशिरा परतल्यानंतर लागलीच उद्या शुक्रवार दि. १५ जून रोजी ते आपल्या मंत्रिमंडळ सदस्यांना भेटणार असून त्यांच्यासमवेत तातडीने बैठक घेणार आहेत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्ती सूत्रांनी दिली. मंत्री व आमदारांनी त्यामुळे राज्याबाहेर जाऊ नये अशा सूचना मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आल्या आहेत.
पर्रीकर हे जर १४ रोजी रात्री गोव्यात दाखल झाले तर १५ रोजी सकाळी ते मंत्रीमंडळ बैठक घेतील. मात्र, जर ते १५ रोजी सकाळी गोव्यात पोचले तर १५ रोजी संध्याकाळी मंत्रीमंडळ बैठक घेतील.
मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे पोर्तुगालला असल्याने ते मंत्रीमंडळ बैठकीला हजर राहू शकणार नाहीत. ते या महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला गोव्यात पोचतील.
वीजमंत्री पांडुरंग मडकईकर हे गंभीर आजारी असून त्यांच्यावर मुंबईतील कोकिळाबेन इस्पितळात उपचार चालू आहेत. त्यामुळे तेही मंत्रिमंडळ बैठकीला हजर नसतील.
मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा हे मंत्रीमंडळ बैठकीची तयारी करीत असल्याचे सूत्रानी सांगितले.
श्री. पर्रीकर यांचे अमेरिकेहून मुंबईमार्गे गोव्यात आज रात्री दाबोळी विमानतळावर आगमन होणार आहे. त्यांचे विमान रात्री उशिरा पोहोचेल असा अंदाज असला, तरी थोडे आधी ते पोहोचू शकतील का याची चाचपणी अधिकारी करीत होते. पर्रीकर हे देशाचे माजी संरक्षणमंत्री असले तरी विशेष विमानाची सुविधा न घेता ते नागरी विमानसेवेतूनच गोव्यात परतत आहेत.
गेल्या चौदा फेब्रुवारीला अस्वस्थ वाटू लागल्याने श्री. पर्रीकर गोमेकॉत दाखल झाले होते. त्यानंतर पुढील वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना मुंबईत लीलावती इस्पितळात दाखल करण्यात आले होते. आजारपणातच गोव्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनास उपस्थित राहून त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला होता. त्यानंतर पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुन्हा गोमेकॉत दाखल करावे लागले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा मुंबईत उपचारार्थ हलवण्यात आले व तेथूनच प्रगत उपचारांसाठी अमेरिकेत पाठवण्यात आले होते. आपल्या अनुपस्थितीत राज्याचे प्रशासन हाताळण्यासाठी त्यांनी त्रिसदस्यीय मंत्रिमंडळ समितीची नेमणूक केली होती. अमेरिकेत उपचार घेत असतानाही त्यांनी ईमेल व टेलिकॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्याच्या प्रशासनावर नजर ठेवली होती. आता ते उपचारांनंतर गोव्यात परत येत असल्याने गोमंतकीयांमध्ये चैतन्य पसरले आहे.
– १४ फेब्रुवारीला अन्नातून विषबाधा झाल्याने गोमेकॉत तपासणी.
– १५ फेब्रुवारीला वैद्यकीय तपासणीसाठी वांद्रे – मुंबईच्या लीलावती इस्पितळात     दाखल.
– २२ फेब्रुवारीला अचानक गोव्यात दाखल होऊन अर्थसंकल्प सादर
– २३ फेब्रुवारीपासून घरातून सरकारी कामकाजाला सुरूवात
– २५ फेब्रुवारीला कमी रक्तदाबामुळे पुन्हा गोमेकॉमध्ये दाखल
– १ मार्च रोजी गोमेकॉमधून डिस्चार्ज
– २ मार्च पासून घरातून सरकारी कामाला पुन्हा सुरूवात
– ५ मार्चला आपल्या अनुपस्थित सरकारी कामकाज हाताळण्यासाठी तीन   मंत्र्याची मंत्रिमंडळ सल्लागार समितीची स्थापना करून मुंबईला रवाना, आणि तेथून उपचारार्थ अमेरिकेला रवाना.