सरकार स्थापनेसाठी शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ

>> भाजपचा सरकार स्थापनेस विलंब ः राऊत

राज्यसभा खासदार तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी काल भाजप महाराष्ट्रात सरकार स्थापनेस वेळकाढूपणा करीत असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यास पोषक स्थिती निर्माण करीत असल्याचा आरोप केला. तसेच भाजपने आपण सरकार स्थापन करू शकत नाही, असे जाहीर करावे आणि त्यानंतर शिवसेना पुढील पावले उचलेल असे वक्तव्यही राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले. सरकार स्थापन करण्यासाठी लागणारे संख्याबळ आपल्या बाजूने असल्याचा दावाही त्यांनी केला.
मुख्यमंत्रीपद समसमान काळासाठी असावे याचा पुनरूच्चार करतानाच राज्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचाच असेल असेही राऊत यांनी यावेळी सुनावले. दरम्यान शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचे आमदार फुटरणार नाहीत असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनेच्या आमदारांना मुंबईतील हॉटेल्समध्ये मुक्कामास ठेवले आहे. या गोष्टीला राऊत यांनी विशेष महत्व दिले नाही. यावर भाष्य करताना ते म्हणाले की, सर्वच आमदारांची मुंबईत घरे नाहीत. त्यामुळे सर्व आमदार एका छताखाली असावे असा पक्षाने निर्णय घेतला याकडे राऊत यांनी लक्ष वेधले.

काल शिवसेनेच्या आमदारांबरोबर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक घेतल्यानंतर त्या सर्वांना बांद्रातील रंगशारदा हॉटेलमध्ये हलविण्यात आले. राजकीय अनिश्‍चिततेचे वातावरण असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही कृती करण्यात आल्याची चर्चा आहे.
दरम्यान भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिकासारखेच असल्याचे म्हटल्याबद्दल संजय राऊत यांनी मुनगंटीवार यांच्यावर टीका केली. जर कोणी स्वतःला शिवसैनिक समजत असेल तर त्याने शिवसैनिकासारखे वागावे. शिवसैनिकासाठी दिलेला शब्द महत्वाचा असतो.

भाजपने सरकार स्थापनेचा दावा का केला नाही?
भाजपचे नेते काल राज्यपालांना भेटले. मात्र त्यांनी सरकार स्थापनेचा दावा त्यांनी का केला नाही? ते रिकाम्या हाताने का परतले? त्यांना राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी स्थिती निर्माण करायची आहे. भाजपकडे संख्याबळ नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले. भाजपने आपल्याजवळ १४५ आमदार असल्याचे दाखवावे व सरकार स्थापन करावे, असे ते म्हणाले.