समुपदेशन गीतेतून – मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरू…

– प्रा. रमेश सप्रे

लो. टिळकांनी गीतेचा सखोल अभ्यास करून त्यांच्या दृष्टीनं ‘गीतारहस्य’ कोणतं हे एका अमर ग्रंथात सांगितलं. त्यांच्या मते ‘कर्मयोग’ हे गीतेचं रहस्य म्हणजे महत्त्वाचं सूत्र, सार किंवा संदेश आहे. महात्मा गांधीजींनी कर्मयोगाला अनासक्तीची जोड दिली. नाहीतर खूप कर्म, कार्य करणारा कर्मवीर हा कर्मयोगी ठरला असता. कर्मयोगाचं रहस्य कर्म करण्यात नसून आसक्तिविरहित, कामनारहित (अशा अनासक्त, निष्काम) वृत्तीत आहे. पुढे विनोबांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गीतेचं आणखी एक रहस्य सांगितलं. ‘समत्वं योग उच्यते|’ या गीतानुसार ‘साम्ययोग’ या तत्त्वावर गीतेनं अधिक भर दिला हे सांगणारी ‘गीता प्रवचने’ केली, अनेक पुस्तकं लिहिली.

कालानुरूप त्याकाळच्या देशातल्या, समाजातल्या परिस्थितीला अनुरूप असे गीतेचे अनेक अर्थ, स्पष्टीकरण करणारे ग्रंथही लिहिले गेले. गीतेच्या माध्यमातून खूप विचारमंथन होत आलंय. होत राहीलही. मुख्य म्हणजे हे सारं जीवनाच्या अंगानं घडतंय. हल्ली गीता हा संपूर्ण जीवनाला व्यापणारा, स्पर्श करणारा ग्रंथ आहे हा विचार येतोय. ‘समग्र जीवन योग’ (हॉलिस्टिक वे ऑफ लिव्हिंग) ही विचारधारा प्रभावी आहे. हिचं प्रमुख अंग आहे समुपदेशन, मार्गदर्शन. कुणासाठी? तर सर्व क्षेत्रातील, सर्व वयोगटांच्या, सगळीकडे विखुरलेल्या मानवासाठी, म्हणजेच मानवजातीसाठी!
मानवाच्या कातडीचा रंग, शरीराची ठेवण, व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्यं (पर्सनॅलिटी ट्रेट्‌स) वेगवेगळे असले; त्याची भाषा, सांस्कृतिक पार्श्‍वभूमी भिन्न असली तरी त्याचं भावजीवन हे बरचसं समान असतं. त्याच्या मनाची ठेवण, बुद्धीची विचार करण्याची पद्धत नि यातून निर्माण होणारी जीवनशैली सर्वसाधारणपणे सारखीच असते.
उष्ण विषुववृत्तीय प्रदेशातील (इक्वेटोरियल रिजन) आई आणि अति थंड उत्तर ध्रुवीय प्रदेशातील (आर्क्टिक रिजन) माता यांच्या त्वचेचा रंग अगदी उलटा असला तरी आतल्या रक्ताचे गट (ब्लड ग्रुप्स) सारखेच असतात अन् त्याच्याही आतली ममता, वत्सलता तर अगदी समानच असते. कुटुंबाबद्दलची शब्दापलीकडची ओढ (बांधिलकी), स्वतःला विसरून निरंतर कर्म करण्याची वृत्ती, इतर कुटुंबियांची सेवा, त्यांच्यासाठी त्याग म्हणजे घरातली स्त्री(माता-भगिनी-पत्नी इ.) ही प्रतिमा सर्वसाधारणपणे एकच असते. तसंच पुरुषांचं नि समाजातल्या इतर घटकांचंही वरवरचं रूप बदलतं पण आतलं स्वरूप एकच असतं. जीवनातील संधींचं नि समस्यांचंही; संबंधांचं नि संघर्षाचंही!
म्हणून गीतासंदेश सर्वकाळासाठी सर्व मानवतेला अत्यंत उपयुक्त आहे. गीता हा धर्म-ग्रंथ नाहीच अन् असलाच तर विश्‍वधर्म, मानवधर्म सांगणारा प्रभावी(केवळ पवित्र नव्हे) ग्रंथ आहे. यासाठी तटस्थपणे गीतेचा अभ्यास केला पाहिजे. गीता सांगते त्याप्रमाणे प्रत्यक्ष जीवनात प्रयत्न नि प्रयोग केले पाहिजेत. खरोखर गीता हे चैतन्यसंवर्धक, शक्तिदायी जीवनामृत आहे. (एलिक्झर फॉर लिव्हिंग… नेक्टर ऑफ लाइफ). असो.
आपणही भगवंताच्या प्रेरणेनं गीतेतल्या समुपदेशनाचा विचार करत आहोत. भगवंतानं युद्धारंभी अर्जुनाचं बदललेलं रूप पाहिलं. ते लटपटणारे पाय, थरथरणारं शरीर, तो कोरड पडलेला कंठ, ती जळणारी त्वचा, ते गरगर फिरणारं मन एकूणच अर्जुनाला भोवळ आल्यासारखी होऊन ताठ, स्थिर उभं राहणंच अशक्य झालं. हे अर्जुनाचं रूप सर्वांनाच अपरिचित होतं. भगवंतालाही! पण भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाचे केवळ रथाचे सारथी नव्हते तर त्याच्या मनबुद्धीचेही सारथी होते. म्हणून तर त्यांना ‘पार्थसारथी’ असं म्हटलं जातं. रूप बदललं तरी विशेष नसतं, पण स्वरूप बदलणं म्हणजे ती व्यक्तीच बदलणं. अर्जुनाची भाषा, त्याचा भाव हेही बदललं. मुख्य म्हणजे त्यांची क्षात्रवृत्ती नि आपण अर्जुन नावाचे वीर क्षत्रिय आहोत- कधीही पराजय न स्विकारलेले ‘विजय’ आहोत ही आत्मस्मृतीही गेली. असा ग्लानिग्रस्त, स्मृतिभ्रष्ट अर्जुन त्याचं मूळ स्वरूपच बदलल्यामुळे धनुष्यबाण (जे त्याला प्राणाहून प्रिय होते. ज्याचा त्याला सार्थ अभिमान होता ते) फेकून (उत्सृज्य सशरं चापं) रथात डोक्याला हात लावून बसून राहिला. हताश, निराश, उदास सारं अवसान, शौर्य-धैर्य-वीर्य गळून गेलेला अर्जुन. या आतल्या, मूळच्या, खर्‍या अर्जुनाला मूळ रुपात आणणं, नेहमीच्या स्थितीत आणणं महत्त्वाचं होतं अन् कृष्णानं अचूकपणे हेच केलं- गीतेच्या माध्यमातून!
आपला अर्जुन जीवनात पदोपदी, अनेक प्रसंगात होतच असतो. आपल्या परिस्थितीची नीट जाणीव झाली.. असहाय स्थितीतून बाहेर पडण्याची प्रामाणिक धडपड आपण करू लागलो तर गीतेचं साह्य अतिशय परिणामकारक असल्याचं अनुभवाला येईल.
तू माझा अत्यंत प्रिय बंधू – मित्र – सखा – आप्त आहेस म्हणून हे अर्जुना मी सांगतो नीट ऐक. विचार करून पहा (पश्य) असं सांगत अनेक जीवनरहस्य अर्जुनाला सांगितलीयत. नवव्या अध्यायाचं नावच आहे ‘राजविद्या-राजगुह्य योग’.
या रहस्यातलं एक अगदी महत्त्वाचं रहस्य भगवान प्रकट करताहेत-
‘मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरू|
माम् एव एष्यसि युक्तैवम् आत्मानं मत्परायणः|
(९|३४)
अर्थ सरळ आहे- (हे अर्जुना) मन मला अर्पण कर (मन्मना भव); स्वतःला माझाच भाग (मद्भक्तो) मान; सदैव सर्वत्र माझीच सेवा, पूजा अर्चा कर; सतत सगळीकडे मलाच नमस्कार कर म्हणजे (मग तू) माझ्यातच येऊन राहशील – मलाच येऊन मिळशील. फक्त एक करायचं – स्वतःला कायम माझ्या सम्मुख, माझ्यासमोर (आत्मानं मत्परायणः) ठेवायचं ‘माझ्याशी एकरूप होऊन राहायचं’. सोप्या शब्दात – माझ्या स्मरणात राहायचं.
गीतेविषयी तीन गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत-
* गीता भगवंताची प्रत्यक्ष वाणी असल्यानं ‘मंत्ररूप’ आहे.
* व्यासांनी श्‍लोकात शब्दांकित केल्यामुळे ‘श्‍लोकरूप’ आहे.
* अतिशय कमी शब्दात (अल्पाक्षरी) खूप अर्थ सांगणारी असल्यामुळे ‘सूत्ररूप’ आहे.
हा शेवटचा विशेष म्हणजे गीतेची सूत्रमयता व्यक्त करणारे अनेक श्‍लोक आहेत. त्यापैकी हा एक. श्‍लोकार्धात (दोन ओळींच्या श्‍लोकाच्या एकाच ओळीत) ग्रंथाचं सार सांगण्याची किमया व्यासांनाच जमू शकते नि तीही संस्कृत भाषेत.
चार महत्त्वाचे मार्ग किंवा योग गीतेत सांगितले आहेत. एका ओळीत या चारी मार्गांचा केवळ उल्लेखच नव्हे तर मार्गावर चालण्यासाठी, भगवंताशी योग साधण्यासाठी प्रभावी उपायही सुचवलाय. हे खरं समुपदेशन-
* मन्मना भव ः मन माझ्या एकरूप कर. हा समाधी किंवा ध्यानयोगाचा उपाय.
* मद्भक्तो (भव) ः माझाच भाग किंवा अंश बन. हा ज्ञानयोग – परमात्म्याशी एकात्मता साधणारा.
* मद्याजी ः सतत माझी पूजा कर. स्वकर्म कुसुमांची पूजा, सेवा हीच पूजा. हा कर्मयोग.
* मां नमस्कुरू ः कणाकणात, अणुअणूत माझं दर्शन घेऊन मला सदासर्वदा नमस्कार कर.
या एका अर्थानं सूचना किंवा आज्ञा वाटल्या तरी लगेचच भगवंतानं एक आश्‍वासनही दिलंय. ‘असं केलं तर निरंतर माझ्यातच राहशील. मलाच येऊन मिळशील. माझ्याशी एकरूप झाल्यावर भय, चिंता, दुःख यांच्या पलिकडे असलेली अमृत अवस्था प्राप्त झालीच म्हणून समज (अमृतमश्‍नुते). – जीवनाच्या अंगानं यावर सहचिंतन करुया…
१. ‘आत्मानं मत्परायणः’ – हे फार महत्त्वाचं सांगणं आहे. आपण कीर्तनकार बुवांच्या नावापूर्वी ह.भ.प. लिहितो. रामदासांच्या पंथाचे कीर्तनकार स.भ.प. म्हणवून घेणं पसंत करतात. चांगलं आहे. यात महत्त्व हरी किंवा समर्थांना नसून परायण होण्याला आहे. त्याहून महत्त्वाचं आहे ते ‘भक्तीला किंवा भक्तीनं परायण होणं. (‘हरिभक्त परायण) आहे हे लक्षात ठेवायला हवं. गीतेत तर हाच आग्रह आहे. ‘पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति|’ असं सांगताना भगवंताचा भर ‘यो (यः) म्हणजे जो भक्त किंवा ‘मे’ म्हणजे मला – भगवंताला यावर नसून ‘भक्त्या प्रयच्छति’ या शब्दांवर अधिक आहे. म्हणजे ‘भक्तीनं अर्पण करणं’ हे कोण अर्पण करतो नि कुणाला अर्पण करतो यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे.
‘परायण होणं’ – म्हणजे काय हे स्पष्ट करण्यासाठी दोन-तीन उदाहरणं देता येतील.
* पूर्वीच्या काळी शिडाची जहाजं असायची. ज्याला यंत्र नसायचं. माणसालाच स्वतः वल्हवत आपली नाव न्यावी लागत असे. वल्ही मारण्याचं काम सुरू असतानाच (म्हणजे प्रपंच करत असताना) शिडांची दिशा बदलण्याचं महत्त्वाचं कामही करावं लागे. शिडं वार्‍याच्या दिशेला सम्मुख (फेस टु फेस) झाली की वार्‍यामुळे जहाज सहजपणे समुद्राच्या पृष्ठभागावरून चालत राही. कोलंबस अशाच शिडाच्या जहाजातून विश्‍वसफरीला, नवे देश-प्रदेश शोधायला निघाला होता. रामकृष्ण परमहंस म्हणत ‘गुरूकृपेचा वारा अखंड वाहतोय. तुम्ही फक्त (उपासना करून) आपली शिडं वार्‍याच्या दिशेनं करा (म्हणजे ‘परायण’ बना) ती गुरुकृपा म्हणजे सद्गुरुच तुम्हाला किनार्‍यावर घेऊन जाईल.
* दुसरं उदाहरण आहे सूर्यफुलाचं – सूर्योदयाचे वेळी पूर्वेकडे तोंड असलेली सूर्यफुलं त्यांच्या स्वतःच्याही नकळत दिवसभर सूर्याकडे तोंड ठेवून सायंकाळी पश्चिमाभिमुख झालेली असतात. हे परायण असणं आहे. सदैव सूर्याकडं म्हणजे भगवंताकडं तोंड!
* तिसरं उदाहरण आजच्या जीवनातलं आहे. दूरदर्शनच्या पडद्यावर चित्र न दिसता नुसतेच मुंग्यांसारखे असंख्य ठिपके दिसू लागले की पहिलं काम म्हणजे आपली अँटीना किंवा डिशची दिशा बदलणं. पूर्णपणे प्रक्षेपणाच्या दिशेनं (ट्रान्स्मिशन) त्या बशीचं (डिशचं) तोंड झाल्याशिवाय स्वच्छसुंदर चित्र दिसणार नाही. हेच परायण होणं आहे.
सदैव भगवंताला परायण होऊन राहणं अजिबात अवघड नाही कारण सर्व वस्तू-व्यक्तीतच काय तर सजीव-निर्जीव वस्तूंच्या कणाकणातही जो वासुदेव वसून राहिलाय त्याची कायम जिवंत जाणीव ठेवणं व त्यानुसार वागणं एवढंच करायचंय. हे कसं जमवायचं त्यासाठी पुढचे चार मार्ग.
२. मन्मना भव – गोपींसारखं, मीरेसारखं मन-चित्त भगवंताला अर्पण करणं. भगवंतमय बनून राहणं. रासक्रिडेच्या प्रसंगी गोपीनुसते हावभाव (अभिनय) करतच कृष्णासारखं बनल्या नाहीत तर साक्षात् कृष्णच झाल्या, एक कृष्णासारखी मुद्रा घेऊन उभी राहून हाताची बासरी वाजवूं लागली; दुसरी डाव्या हाताची करंगळी वर करून गोवर्धन गिरीधारी कृष्णाच्या पावित्र्यात (पोजमध्ये) उभी राहिली. एक गायी वासरं राखण्याची कृती करू लागली तर एखादी गोपी कालियाच्या माथ्यावर नाचणार्‍या कृष्णासारखं मुक्तनृत्य करू लागली. त्यांनी आपलं मन-बुद्धी-चित्त कृष्णाला पूर्णपणे अर्पण केलं होतं.
३. मद्भक्तो – भगवंत सूर्य तर मी एक किरण; भगवंताच्या सिंधूचा मी एक बिंदू; भगवंताच्या अनंततेचा मी एक क्षण नि अमरतेचा मी एक श्‍वास या विचारानं सतत स्वतःला भगवंताचा भाग (भगवद्भक्त) मानणं व त्यानुसार व्यवहार करणं म्हणजे परायण बनणं.
४. मद्याजी – जे जे काही करीन ती परमेश्‍वराचीच पूजा समजून मन भगवंताला जोडून ठेवणं हेही परायण होणंच आहे. गोराकुंभाराचं मडकी बनवणं; कबिराचं वस्त्र विणणं; सेना न्हाव्याचं हजामत करणं; जनाबाईचं दळण कांडण करणं; शेण्या(गोवर्‍या) थापणं; सावत्याचं मळा शिंपणं किंवा चोख्याचं मेलेली जणावरं ओढत नेऊन गावाबाहेर पुरणं ही सारी ‘यत् यत् करोमि तत् तत् अखिलं शंभो तवाराधनम्‌|’ अशी भगवत्परायण झालेल्या मनाजीवनाची उदाहरणं.
५. मां नमस्कुरू – सगळीकडे मीच भरलेला आहे असं समजून-उमजून सतत सर्वत्र नमस्कार करत राहणं हे भगवंताला परायण होणंच आहे. प्रल्हादाचा भाव असा ज्वलंत नि जिवंत होता. सर्वत्र परमेश्‍वर आहे या निष्ठेनं त्यानं वडलांना ‘तुझा नारायण आहे कुठे?’ या प्रश्‍नाला उत्तर दिलं होतं – ‘नाही कुठं?’ – प्रल्हादासाठी सारे अणू-रेणू-कीटाणू-जीवाणू-विषाणू (व्हायरस) नि स्थाणू(खांब किंवा जड, निर्जीव पदार्थ) हे विष्णुच होते. हे भगवंताला परायण असल्याचं अप्रतिम उदाहरण आहे.
एकूण काय – आपले ग्यानबा-तुकाराम म्हणतातच की ‘‘जे जे भेटे भूत| ते मानिजे भगवंत| हा भक्तियोग निश्चित| जाण माझा॥
किंवा ‘‘असोनि संसारी | जिव्हे वेगु करी| .. हरि मुखें म्हणा| हरि मुखें म्हणा॥ … हे नुसतं पाठ करायचं किंवा म्हणायचं नाही तर तसं वागायचं. जगायचं. हो ना?
……………………………………………………

 

 

Leave a Reply