समुपदेशन गीतेतून : … तत् कुरूष्व मदर्पणम्

– प्रा. रमेश सप्रे

आपलं जीवन बनतं आपण करतो त्या सार्‍या क्रिया आणि उपयोगात आणतो त्या सर्व वस्तू किंवा व्यक्तींनी! सार्‍या क्रियातली अगदी मुळातली (मूलभूत) क्रिया म्हणजे श्‍वसन – श्‍वासोच्छ्‌वास करणं. अन् सार्‍या वस्तूंतली अगदी आपली सहज मिळालेली वस्तू म्हणजे आपला देह. सारी इंद्रियं नि त्यांची कार्यं. हे सारं भगवंताला अर्पण करणं हे जीवनातील आनंदाचं रहस्य आहे. हीच जीवनमुक्तीसाठी आवश्यक अशी विद्या आहे. कला आहे. ही एक प्रकारची आध्यात्मिक-सामाजिक जीवनशैली आहे.

भगवंताला हे सारं अर्पण करायचं म्हणजे नक्की काय करायचं? हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. यासाठी भगवंत म्हणजे काय?- ईश्‍वर म्हणजे कोण?- यावर विचार करणं आवश्यक आहे. मी माझ्यासाठी जे जे करतो त्यात स्वार्थ व अहंकार गुंतलेला असतो. याउलट मी एखादी चांगली गोष्ट दुसर्‍यासाठी करतो – त्याची सेवा करतो तेव्हा तो दुसरा माणूस साक्षात् देव असतो.
आईवडलांची सेवा, मुलाबाळांचं संगोपन हेही देवाचंच कार्य आहे. पण यात थोडी कर्तव्याची भावना आहे. आणि विशेष असा त्यागही नाहीये. पण इतरांची साधी सेवा सुद्धा देवाची पूजा असते. त्यांच्या जीवनात सुख-आनंद निर्माण करणं व तो आनंद निर्माण करण्यासाठी आपल्याकडच्या वस्तू वा पदार्थ सारे भगवंतानं दिलेले आहेत, ते त्यांचे आहेत हा भाव मात्र मनात जिवंत हवा.
प्राचीन काळी हा भाव राजे लोकही मनात ठेवून राज्य करत होते. त्यामुळे राज्यात न्याय-व्यवस्था-शांती नांदत होती.
* शिबि राजाची कथा प्रसिद्ध आहे. एक कबूतर खांद्यावर येऊन बसतं व त्याला मनुष्यवाणीनं म्हणतं ‘राजा माझा जीव वाचव तो ससाणा मला मारून खाईल’. इतक्यात तो ससाणाही तिथं पोचतो नि कबूतराला सोडायला सांगतो. एकाचा जीव वाचवून दुसर्‍याचा जीव जाऊ द्यायचा हा कसला न्याय? राजा आपलं मांस कबूतराच्या वजनाएवढं अर्पण करायला तयार होतो. त्यानुसार तराजूच्या एका पारड्यात कबूतराला ठेवून दुसरीकडे राजा स्वतः आपल्या मांडीचं मांस कापून दुसर्‍या पारड्यात घालतो. पण ते पुरत नाही तेव्हा राजा स्वतः त्या पारड्यात बसतो व ससाण्याला म्हणतो, ‘मी स्वतःला समर्पण करतोय. तू मला खाऊन भूक भागव. पण माझ्या आश्रयाला आलेल्या या कबूतराचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. ते मी पार पाडीनच.’ हा त्याग बघून कबूतर व ससाणा या शिबि राजाचं सत्व पाहण्यासाठी आलेल्या देवता होत्या. त्या प्रकट झाल्या. शिबी राजाची स्तुती करून, त्याचं कल्याण चिंतून निघून गेल्या.
* राजा दिलीप शिकारीला गेला असताना एका गाईवर एक सिंह झडप मारण्याच्या तयारीत बसलेला त्यानं पाहिला. तलवारीनं प्रहार करण्यासाठी सिंहावर धावून जात असताना, सिंह म्हणतो कसा? ‘ही गाय हे या क्षणीचं माझं भक्ष्य आहे. खाद्य आहे. तिला वाचवून तू मला भुकेनं मारणार की काय?’ ..दिलीप राजा विचारात पडला व त्यानं आपणहून स्वतःला अर्पण केलं. सिंह व गाय दिलीप राजाची परीक्षा पाहायला आलेले असतात. राजाला आशीर्वाद देऊन निघून जातात. पण इतरांसाठी म्हणजे भगवंतासाठी राजानं दाखवलेला त्याग हा स्वतःला भगवंतार्पण करणाराच ठरला.
* दधीची ऋषींनी आपली हाडं वज्र बनवण्यासाठी देवांना अर्पण केली नि देवांचं नि मानवांचं दानवांपासून रक्षण केलं. वृत्रासुर नावाच्या असुराला मारून मानव जातीवर खूप उपकार केले.
ही भगवंताला स्वतःला अर्पण करण्याची आदर्श उदाहरणं झाली. पण आपण आपल्या सामान्य दैनंदिन जीवनातसुद्धा अशी समर्पणावर आधारित जीवनशैली स्विकारू शकतो.
या संदर्भात भगवंताचं मार्गदर्शन काय आहे?
यत्करोषि यदश्‍नासि यज्जुहोषि ददासि यत् |
यत् तपस्यसि कौंतेय तत् कुरुष्य मदर्पणम् ॥
यापूर्वी भक्तीनं दिलेलं पान-फूल-फळ किंवा पाणीसुद्धा मी आनंदानं स्विकारतो. नि प्रसन्न होऊन त्या व्यक्तीचं कल्याण करतो. पण पान-फूल-फळ-पाणी या झाल्या वस्तू किंवा पदार्थ. ते देणंही सोपं नाही. कारण त्यागभावना ही सर्वांत महत्त्वाची पण अवघड अशी वृत्ती आहे. पण हे सारं भगवंताला अर्पण करायचं म्हटलं की सोपं वाटतं. गंमतीनं म्हणायचं तर आपण देवाला अखंड नैवेद्य दाखवतो म्हणजे केलेले सारे पदार्थ संपूर्णतः देवाला अर्पण करतो. देव यातलं काहीही खाणार नाही याची आपल्याला पूर्ण खात्री असते. पण तरीही आपला भाव बदलतो. नैवेद्यापूर्वी जे सारं ‘अन्न’ असतं ते नंतर ‘प्रसाद’ बनतं. पवित्र बनतं.
भगवंताचं पुढचं सांगणं तर फार महत्त्वाचं आहे. ‘जे काही तू करशील – खाशील – यज्ञात हवन करशील – जे काही तपश्‍चर्या, कष्ट, प्रयत्न करशील ते सारं मला अर्पण कर’ म्हणजे मग त्या कृतीबद्दल, कर्म किंवा कार्याबद्दल तुला काही आसक्ती किंवा अपेक्षा राहणार नाही व तू ताण-तणाव यांनी मुक्त असं जीवन जगशील.
वस्तू ही मूर्त असल्यानं देणं सोपं आहे. पण क्रिया-कृती ही अमूर्त असल्यानं देता येत नाही. पण अर्पण मात्र करता येते. एक दाणा पेरला तर हजारो दाण्यांची कणसं येतात ना? तसं भगवंताचं सांगणं आहे, ‘ये यथा मां प्रपद्यंते तां तथैव भजामि अहम्‌|’ ज्या भावनेनं तुम्ही मला शरण येता त्याच भावनेनं, नात्यानं, संबंधानं, प्रकारानं मी तुमची सेवा करतो म्हणजे तुम्हाला वरदान देतो. ‘अनंत हस्ते कमलाकराने| देता किती घेशील दो कराने?’ असा आपला अनुभवही असतो. इथं जे भगवंताला अर्पण करीन तेच भगवंत मला अर्पण करील असा शब्दशः अर्थ करायचा नाही. दुसर्‍यासाठी काहीही चांगलं केलं, दुसर्‍याला त्याच्या उपयोगाचं- हिताचं असं काहीही दिलं तर त्यातून मला जे समाधान, जो आनंद मिळतो तो अनंत पटीनं असतो.
आपलं रक्तदान करून वाचवलेला जीव, श्रमदान करून उभारलेली लोक कल्याणाची इमारत, अवयव उदा. मूत्रपिंड(किडनी) देऊन एखाद्याच्या जीवनात निर्माण केलेलं चैतन्य हे केवढा धन्यतेचा अनुभव देतं हे त्या देणार्‍यालाच कळतं. हे आपल्या नातेसंबंधांच्या, जवळच्या व्यक्तींना दिलं तरीही आनंद मिळतो पण माहीत नसलेल्या व्यक्तीसाठी जर हे दिलं गेलं तर आनंदाला सीमाच नसते. ही गोष्ट बोलण्याची-लिहिण्याची वा वाचण्याची नाही तर स्वानुभवाची आहे. भगवंताचं या संदर्भात जे समुपदेशन आहे त्यावर सहचिंतन करणं आवश्यक आहे.
१. यत् करोषि ः- म्हणजे जे जे करशील ते भगवंताला समर्पण करायचं. या संदर्भात फार महत्त्वाचा मंत्र आहे. तो जप करण्यासाठी नसून प्रत्यक्ष जीवनाचा, जगण्याचा मंत्र आहे.
‘यत् यत् करोमि तत् तत् अखिलं शंभो तव आराधनम्‌|’
मी जे जे करीन, माझ्याकडून जे जे घडेल ते ते सर्व हे शिवशंकरा मी तुला अर्पण करतो. इथं ‘अखिलं’ म्हणजे ‘सर्व’ असं म्हटलंय. आपण आपल्या प्रिय व्यक्तीला काहीही अर्पण करताना त्याला आवश्यक, त्याला उपकारक किंवा हितकारक अशी चांगली गोष्टच अर्पण करतो ना? जे अहिताचं आहे ते अर्थातच अर्पण करायचं नसतं. चोरी केली, हिंसा केली. भ्रष्टाचार केला तर या गोष्टी आपण भगवंताला द्यायच्या नसतात. चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी आपण अर्पण करतो. सहज लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आपण गणपतीचा जो सर्वपरिचित श्‍लोक म्हणतो…
‘वक्रतुंड महाकाय..’ त्यात शेवटी मागतो काय? ‘..सर्व कार्येषु सर्वदा|’ म्हणजे वाईट हेतूनं केलेल्या कामांनाही गणेशानं आशीर्वाद द्यावा? सर्व कार्यं म्हणजे पापं, दुष्कृत्य, व्यसनं हे सारं अर्पण करण्यायोग्य आहे का?
पू. गोंदवलेकर महाराज एक गोष्ट सांगायचे- एक चोर आशीर्वादासाठी एका साधूकडे गेला. साधूनं त्याला सांगितलं ‘कोणतीही गोष्ट करताना मारुतीचं दर्शन घेऊन नंतर ती करत जा’. त्यानंतर तो चोर प्रत्येक वेळी मारुतीला प्रार्थना करून चोरी करू लागला. अनेकवेळा तो यशस्वी झाला. एकदा मात्र पकडला गेला. पोलिसांना तो म्हणाला ‘मला त्या साधूकडे दर्शनाला घेऊन जा. नंतर तुरुंगात न्या.’ पोलिसांना दया आली. साधूकडे गेल्यावर चोरानं विचारलं, ‘असं कसं झालं?’ त्यावर साधू म्हणाला, ‘चोरीसारखी गोष्ट देवाला अर्पण करणं योग्य नाही. इतके दिवस यश मिळालं, मारुतीची इच्छा. आज पकडला गेलास. आता तुला शिक्षा होईल ही ही त्या मारुतीचीच इच्छा!’ खरं आहे.- वाट्टेल ती गोष्ट अर्पण करणं चूकच आहे.
याउलट रामकृष्ण परमहंस एका विणकराची गोष्ट सांगायचे. तो इतका देवभक्त होता की प्रत्येक गोष्ट भगवंताला अर्पण करून, भगवंताची इच्छा समजूनच करायचा. विणलेलं रंगीत कापड घेऊन तो बाजारात जायचा. त्याचा माल लगेच खपायचा. कारण? तो गिर्‍हाइकाला सांगे- ‘सुताची किंमत चार आणे देवाची इच्छा! रंगाची किंमत चार आणे देवाची इच्छा! माझी मजूरी चार आणे देवाची इच्छा! कापडाची किंमत बारा आणे- देवाची इच्छा!’ सारं काही देवाला अर्पण भावनेनं करायचा. एकदा एक चोर मागे पोलीस लागल्यानं आपला चोरीचा माल त्या साध्या-भोळ्या विणकराच्या जवळ ठेवतो व स्वतः लपून बसतो. पोलिसांना ते चोरीच्या मालाचं गाठोडं या विणकराजवळ मिळतं. ते त्याला पकडून न्यायाधीशासमोर उभं करतात. विणकर म्हणतो, ‘सारी देवाची इच्छा|’ न्यायाधीशाला तो निर्दोष असल्याचे पटतं. तो त्याला सोडून देतो त्यावेळीही तो शांतपणे म्हणतो, ‘देवाची इच्छा.’
यावरून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती अशी- देवाला सर्व अर्पण करण्यासाठी चांगल्याच गोष्टी करायच्या. (काहीजण गणपतीच्या ‘वक्रतुंड महाकाय..’ या श्‍लोकात शेवटी प्रार्थना करताना ‘सर्व कार्येषु’ म्हणण्याऐवजी ‘शुभ कार्येषु’ म्हणतात. एका अर्थानं ‘शुभ म्हणजे चांगली कामं करण्याची बुद्धी दे’ असंही ते बुद्धिदात्या गणेशाला सांगत असतात.)
जीवनातली सारी कर्म करताना भगवंताची इच्छा असेल त्याप्रमाणेच घडेल हा भाव मनात ठेवायचा. अन् जे घडेल ते आपल्या अंतिम हिताचंच असेल हेही लक्षात ठेवायचं. म्हणजे जीवनात निराशा, उदासी, अपेक्षाभंग यांचं दुःख होत नाही अन् आपल्या इच्छेप्रमाणे घडेल का याबद्दल मनावर ताणही नाही आणि दडपणही नाही. फार सहजसुंदर जीवन जगायला मिळतं.
२. यत् जुहोषि ः- यज्ञासंबंधी सर्व क्रिया किंवा कृती भगवंताला अर्पण करायला सांगितलंय. सगळी यज्ञ सामग्री एकत्रित करणं, आहुती देणं, मंत्रोच्चार करणं हे सारं ‘इदं न मम’ या यज्ञ भावनेनंच करायला हवं. म्हणजे यज्ञ बर्‍यापैकी निष्काम बनेल. आचार्य विनोबा भावेंनी जेव्हा ‘भूदान यज्ञाची’ कल्पना जनतेसमोर मांडली तेव्हा ‘सबै भूमि गोपाल की’ ही भावना व्यक्त केली होती. लोकांनी उत्स्फूर्तपणे आपली अतिरिक्त, गरजेपेक्षा खूप जास्त असलेली जमीन भूमिहीनांना (आपल्याच शेतमजुरांना दान म्हणून दिली. त्यावेळी सर्वांच्या मनात जनताजनार्दनाविषयी कृतज्ञतेची भावना होती. उपकाराची नव्हती) सध्या नेत्रदान, देहदान याविषयी जनजागरण सुरू आहे. मृत्यूनंतर जरी हे दान करायचं असलं तरी दानपत्र करून दिलेल्या क्षणापासून दात्याला खूप शांत, समाधानी वाटू लागतं. हेच भगवंतांना ‘यत् जुहोषि’ वरून सांगायचंय.
३. ददासियत् ः- इथं वस्तू द्यायची नाही तर सेवा द्यायला सुचवलंय. काळजी घेणं (केअरटेकिंग) यापेक्षा आजकाल सेवा देणं (केअर् गिव्हिंग)ला अधिक महत्त्व आलंय. कृती एकच आहे पण वृत्ती निराळी आहे. घेण्यापेक्षा देण्याचा संस्कार महत्त्वाचा मानला गेलाय. काळजी घराची, बागेचीही घेतली जाते. तशीच वृद्धांची, आईवडलांची, निराधारांची नि अनाथांचीही काळजी घेण्यासाठी संस्था किंवा व्यक्ती (केअर् टेकर्स) असतात. काळजी घेणारी नर्स किंवा दारावरचा सुरक्षासेवक (सिक्युरिटी) हे असेच काळजी घेत असतात. पण सेवा करताना मात्र सेवाभाव, सेवावृत्ती महत्त्वाची असते. त्यात कर्तव्यभावना व बांधिलकी असते. मुलांनी आईवडलांना काळजी घेण्यासाठी वृद्धाश्रमात पाठवण्यापेक्षा स्वतः वृद्ध मातापित्यांची सेवा करणं अधिक मोलाचं आहे.
४. यत् तपस्यसि ः- कायावाचामनानं तप केल्याशिवाय जीवनात काहीही मिळवता येत नाही. अपार कष्ट, संकटांवर मात करण्याची जिद्द, अखंड अभ्यास-रियाज-तालीम हे सारं तपच आहे सध्याच्या जीवनपद्धतीतलं. तपासाठी वनातच जायला हवं असं नाही. इतरांसाठी काहीही निरपेक्ष भावनेनं करणं हे महत्त्वाचं आहे आणि ते समाजात राहूनच करायचं असतं. तपश्चर्येत इंद्रियसंयम, स्वयंशिस्त, मनबुद्धीवर नियंत्रण या गोष्टी येतात. ‘सर्वही तपसा साध्यम्’ असं म्हटलं जातं. पण ते साध्य झालेलं समाजपुरुषाच्या चरणावर अर्पण करायला शिकलं पाहिजे.
शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्ञानयोगी हा ‘मी-माझे’चा त्याग करतो तर भक्त हा ‘तू-तुझे’ (सारं देवाचंच) या भावनेचा स्विकार करतो. ज्ञानमार्ग रूक्ष, कोरडा बनायची शक्यता असते. पण भक्तिमार्ग मात्र माझं काही नाहीच. सारं परमेश्‍वराचं आहे हा भाव वाढवतो. रसपूर्ण जीवन रसिकतेनं जगतो आणि अतिशय नम्र होतो.
एक सूत्र लक्षात ठेवलं की सारं जमलं. सार्‍या कृती, क्रिया, कर्म भगवंताला अर्पण करण्याऐवजी सार्‍या क्रियेच्या मुळाशी असलेला श्‍वास भगवंताला अर्पण करायचा, म्हणजे त्याचं नामस्मरण करायचं नि त्याच्या प्रभावाचं अनुसंधान टिकवायचं. सार्‍या गोष्टी, आपला देहसुद्धा, अर्पण केला आणि ‘स्व’ अर्पण केला तर सार्‍या कृती, सारं जीवनच भगवंताला अर्पण केल्यासारखं होतं. हे अर्पण करताना सतत भाव-भान व बोध टिकवायला हवा की – ‘करोमि यत् यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि|’ ॥

Leave a Reply