समुपदेशन गीतेतून – अज्ञानजं तमः नाशयामि ज्ञानदीपेन भास्वता …

– प्रा. रमेश सप्रे

गीतेतील समुपदेशनाचा भर आतून मिळणार्‍या सामर्थ्यावर, प्रेरणेवर आहे. कुठल्याही विशिष्ट वारी, विशिष्ट देवदेवतेची, विशिष्ट पद्धतीनं उपासना करा असं गीता म्हणजेच भगवंत एकदाही सुचवत नाहीत. गीतेत अर्जुन जरी ‘शिष्य’ भावानं श्रीकृष्णाला शरण गेला तरी ‘गुरू’ म्हणून कृष्णानं शिकवण दिलेली नाही किंवा उपदेशही केला नाही. ‘भगवान् उवाच’ म्हणून गीता सांगताना एका अतिशय उच्च अवस्थेतून भगवंताची वाणी वाहत राहते. म्हणूनच गीतेत ‘उध्दरेत् आत्मन् आत्मानम्’ म्हणजे स्वतःचा उद्धार स्वतःच करावा. कोणी भगवंत, प्रेषित, मसीहा किंवा गुरू आपला उद्धार करील या भ्रमात राहू नये.

अर्जुनाला केलेला सगळा उपदेश म्हणजे एक प्रभावी समुपदेशन आहे, जे आज सार्‍या मानवजातीसाठी मार्गदर्शक आहे. गीता जेव्हा ‘संसिद्धिं लभते नरः|’ किंवा ‘सिद्धिं विंदति मानवः’ असं म्हणते तेव्हा स्पष्टपणे सारी मानवजात भगवंताच्या दृष्टीसमोर असते हे उघड आहे.
‘सगळीकडे तुझं दर्शन कसं होईल? तू कुठे कुठे अधिक स्पष्टपणे दिसशील?’ अशा आशयाचा प्रश्‍न अर्जुन विचारतो तेव्हा अर्जुनाच्या विचारण्यातील प्रामाणिक तळमळ किंवा आस्था लक्षात घेऊन भगवंत आपल्या ‘विभूती’ सांगतो. ‘भूत’ म्हणजे निर्माण झालेली प्रत्येक वस्तू- भूतजात, भूतमात्र हे शब्द अनेकदा येतात तेव्हा त्यांचा अर्थ सारे चराचर, सर्व चेतन-अचेतन, सजीव-निर्जीव असाच असतो. ‘विभूती’ म्हणजे विशेष रितीनं निर्माण झालेली किंवा विशेष स्वरूपात प्रत्ययाला येणारी वस्तू-प्राणी किंवा व्यक्ती. अशा विभूतींची अनेक उदाहरणं भगवंत देतात. त्यातल्या जवळजवळ सार्‍या विभूती या असामान्य, अलौकिक अशा स्वरूपाच्या आहेत. उदा. पर्वतात हिमालय; नद्यात गंगा; वृक्षात अश्‍वत्थ (पिंपळ); ऋषीत भृगु तर मुनीत कपिल इ. इ. इथं भव्यतेपेक्षा दिव्यतेला अधिक महत्त्व आहे. हिमालय इतर पर्वतांपेक्षा उंच, भव्य तर आहेच. पण एक पुण्यभूमी, देवभूमी, तपोभूमी म्हणूनही सार्‍या जगात हिमालयाला तोड नाही.
‘‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती| तेथे कर माझे जुळती॥ हा अनुभव क्षणोक्षणी पदोपदी घेता आला तर तो जीवनमुक्तच बनतो.
यासाठी आवश्यक आहे ती दृष्टी. म्हणून विभूतींची केवळ उदाहरणंच देऊन भगवंत थांबत नाहीत तर अशा वस्तू व व्यक्तींना भेदून जाणारी व त्यांच्यातील देवत्वाचा – दिव्यत्वाचा साक्षात्कार घडवून आणणारी दृष्टी म्हणजे एक विचारसरणी आहे नि तिला पूरक व पोषक अशी जीवनसरणीही आहे.
यासाठी केवळ भक्तिभाव सध्याच्या काळात तरी पुरत नाही. गोपींसारखी अनन्यभक्ती आपल्याला जमणारी नाही. त्यासाठी देहभावनेचा पूर्ण अभाव असणं जितकं आवश्यक असतं तितकंच आपण ज्याची भक्ती करतो त्याच्याशी निरंतर जोडलेलं राहणंही गरजेचं असतं. गोपींच्या संबंधात भागवतात स्वतः भगवंतानेच(भगवान् श्रीकृष्णाचे) उद्गार आहेत- माझ्याशी संपूर्णपणे निर्दोष संबंध जोडणार्‍या गोपींचे माझ्यावर न फेडता येण्यासारखे उपचार आहेत. कारण मोठमोठे ऋषी-मुनी त्यागी मंडळीही घराच्या ज्या ममत्वाच्या बेड्या सुगमतेने तोडू शकत नाहीत त्या त्यांनी (गोपींनी) सहज तोडून टाकल्या आहेत.’ असा गोपींचा अधिकार आहे.
गीतेत भगवंत सांगताहेत-
‘तेषाम् एव अनुकंपार्थम् अहम् अज्ञानजं तमः|
नाशयामि आत्मभावस्थो ज्ञानदीपेनं भास्वता॥
१०/११
याचा सरळ अर्थ – त्या भक्तांवर कृपा करण्यासाठीच (अनुकंपार्थम्) त्यांच्यात असणारा (आत्मभावस्थः) मी त्यांचा अज्ञानातून निर्माण झालेला अंधःकार (अज्ञानजं तमः) तेजस्वी अशा ज्ञानदिव्यानं नष्ट करतो. (भास्वता ज्ञानदीपेनं नाशयामि)
‘त्या भक्तांवर’ म्हणजे कोणत्या भक्तांवर? हा विषय भगवंताचा अत्यंत आवडता आहे. कारण सदासर्वदासर्वत्र भगवंताशी अनन्यभावानं जोडलेला (नित्य अभियुक्त), सतत भगवंताचं स्मरण करणारा, सर्वस्व अर्पण करणारा भक्त भगवंताचा अत्यंत लाडका आहे. अशा भक्तांमुळे म्हणजेच त्यांच्या अनन्य भक्तीमुळेच आपण आहोत व आपल्याला महत्त्व प्राप्त झालंय याची जाणीव साक्षात भगवंताला आहे. अशा भक्तांवर भगवंत कृपा करणारच.
ही कृपा म्हणजे प्रापंचिक प्रश्‍न सोडवणं, कौटुंबिक संकटं दूर करणं किंवा कुटुंबात समाधानाचं वातावरण निर्माण करणं अशी नसते. आनंद, समाधान हा अनुभवाचा विषय आहे आणि अनुभव ज्याचा त्यानं प्रत्यक्ष घ्यायचा असतो. भगवंत तयार (रेडीमेड) आनंद खिरापतीसारखा वाटत नाही किंवा फुकट लुटत नाही. ज्याचा त्यानं आनंद मिळवायचा असतो. असा आनंद आपल्या आतच असतो. आनंद प्रकाशरूप असतो.
‘‘फिटे अंधाराचे जाळे| झाले मोकळे आकाश| दरीखोर्‍यातूनि वाहेऽऽ| प्रकाश प्रकाश॥
हा अंधार म्हणजे जीवनातली संकटं, दुःखं, वियोग, अपमान, अपयश इ.! याउलट प्रकाश म्हणजे संधी, सुख, संयोग (मिलन), सन्मान, सुयश इ.
भगवंत इथं खुल्या मनानं सांगताहेत – अज्ञानातून निर्माण झालेला आतला अंधार (जो बाहेरून जाणवतो) अंतरीच्या ज्ञानदिव्यानंच घालवायचा असतो. उदाहरणार्थ – नरकासुराला कृष्णानं मारल्यावरचा विजयोत्सव म्हणजेच दिवाळी – पणत्या, आकाशदिवे, नवे कपडे, रांगोळ्या, फराळ इ. सारं म्हणजे अंधाराच्या नरकासुराचं दहन म्हणजे दारिद्य्र, अज्ञान, अंधश्रद्धा, दुःख, प्रदूषण यांचं उच्चाटन अन् प्रकाशाची पूजा. या पूजेचे दीप म्हणजे पणत्या व आकाशदीप!
भगवंत कृपा करतात तसे ते अकारण कृपासिंधू किंवा करुणासागर आहेत. म्हणजे आपल्या बर्‍याचशा भूमिका जशा सकारण असतात तसं दयासागर भगवंताचं नसतं. पण गीतेत भगवंताची भूमिका उगीच कृपावंत होण्याची नाही. तर आत्मस्मृती जागी करण्याची आहे. आपण क्षत्रिय आहोत. आपल्यावर अत्यंत अन्याय झालाय, सत्तेच्या सिंहासनावर अधर्म स्थापन झालाय. दुर्योधन-शकुनी-कंस-जरासंध-शिशुपाल हे सारे सत्ताधीश प्रजेवर अत्याचार करताहेत याची जाणीव अर्जुनाला होती. सुरू होत असलेलं युद्ध हे अधर्म-अन्याय-अनीती-अपराध यांच्यावर संपूर्ण विजय मिळवण्याची चालून आलेली संधी आहे. तरीही ऐन वेळी आपण पराक्रमी अर्जुन आहोत हे विसरून, धनुष्यबाण टाकून, युद्ध न करण्याचं ठरवून बसलो आहोत याची गंभीर जाणीव दुर्दैवानं अर्जुनाला नाहीये. ती करून देताना त्याचा आत्मविश्‍वास, आत्मभान जागं करणं भगवंताला अधिक महत्त्वाचं वाटलं. म्हणून भक्तियोग – कर्मयोग – ज्ञानयोग – ध्यानयोग यांची चर्चा करताना भगवंत अंतरंगीच्या सामर्थ्याला सर्वाधिक महत्त्व देतो. असं आत्मिक सामर्थ्य तेव्हाच मिळतं जेव्हा भक्त अगदी आतून भगवंताशी जोडलेला राहतो.
‘तेषां सततयुक्तानाम् भजतां प्रीतिपूर्वकम्‌|
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते॥
भगवंताचा आवडता भक्त हा ‘सततयुक्तानाम्’ म्हणजे सतत संपर्कात असलेला, संबंधात असलेला (जोडलेला असलेला) असा हवाच पण ‘भजतां प्रीतिपूर्वकम्’ प्रेमानं भजनपूजन करणारा – केवळ विधी-उपचार यात न गुंतणारा म्हणजे एका अर्थानं अंतरंगीच्या-मानस-उपासनेत रंगणारा असा हवा. अशा भक्तिभावानं ओथंबून राहिलेल्या भक्ताला मी बुद्धियोग देतो (ददामि बुद्धियोगम्) ज्याच्याद्वारे तो सतत माझ्यातच वास-निवास करतो. म्हणूनच त्याला माझा व माझ्या प्रिय भक्तांचा नित्य सहवास-सत्संग लाभतो. तो कर्म करत असूनही मुक्तच असतो.
एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे भक्तीतून निर्माण झालेलं ज्ञान हे स्वच्छ, निरोगी असतं. अहंकाराचा वारा अशा मनाला लागत नाही. भक्तीतून ज्ञान अन् ज्ञानातून भक्ती (ज्ञानोत्तर भक्ती) हा भगवंताकडे पोचण्याचा सहज, सुलभ राजमार्ग आहे.
आणखी एक विशेष म्हणजे ज्ञानयोगाला समानार्थी असे बुद्धियोग, अभ्यासयोग यांच्यासारखे शब्द भगवंताच्या समुपदेशनात नेहमी येतात. ज्ञान म्हणजे उगीचच नियम, व्याख्या, सिद्धांत (लॉज – डेफिनेशन्स – थिअरीज्) यात गुंतलेलं वाटतं. त्याचा व्यवहार करताना जी बुद्धी वापरावी लागते व अभ्यास करावा लागतो त्यासाठी भगवंत हे शब्द वापरतात. अर्जुनाला विश्‍वरूपदर्शन हे त्याचे डोळे दिपवण्यासाठी किंवा आपलं तेज दाखवून त्याला आपल्या प्रभावाखाली आणण्यासाठी (म्हणजेच मुकाट्यानं आपण सांगतो तसं युद्ध करण्यासाठी घडवलेलं नाही. तर भगवंताचं रूप पाहता पाहता त्याचं स्वरूप समजून घेण्यासाठी घडवलं. यासाठी प्रथम त्याला दिव्यदृष्टी दिली. (दिव्यं ददामि ते चक्षुः) ज्यामुळे त्याला भगवंताचं योगैश्‍वर्य (दिव्य रूप) आकलन करण्याची शक्ती व बुद्धी लाभली.
या संदर्भात आपल्या जीवनासाठी जे समुपदेशन भगवंत करताहेत त्याचे पैलू–
१. अज्ञानजं तमः – अज्ञानातून निर्माण होणारा अंधार. हा अंधार बाहेरचा नाही तर आतला आहे. ज्ञानी माणूस या अंधारावर मात करतो. पण अज्ञानी व्यक्तीला ते शक्य होत नाही. याबाबतीत एक मार्मिक सुभाषित आहे. त्याचा अर्थ-
माणसांचे एकूण चार प्रकार असतात.
* ज्याला काही ज्ञान नाही अन् आपल्याला ज्ञान नाही याचंही ज्ञान नाही.
– हा मूर्ख माणूस आहे, त्याला टाळलेलंच बरं!
* ज्याला काही ज्ञान नाही पण आपल्याला ज्ञान नाही याचं मात्र ज्ञान आहे.
– हा साधा माणूस आहे. याला शिकवलेलं बरं!
* ज्याला ज्ञान आहे पण आपल्याला ज्ञान आहे याचं ज्ञान नाही.
– हा झोपलेला आहे. याला उठवलेलं बरं!
* ज्याला ज्ञान आहे अन् आपल्याला ज्ञान आहे याचंही ज्ञान आहे.
– तो शहाणा माणूस आहे. याच्या मागून गेलेलं बरं!
याचा अर्थ उघड आहे- ज्ञान नुसतं असून भागत नाही तर आपल्याला ज्ञान आहे याची जाणीव असायला हवी तरच त्या ज्ञानाचा जीवनात चांगल्या कामासाठी, स्वतःला सुधारण्यासाठी उपयोग होईल. एरवी आतला अज्ञानातून निर्माण होणारा अंधःकार जीवनाला व्यापून राहील. हा अंधार निर्माण होण्याची कारणं म्हणजे अतिरिक्त (गरजेपेक्षा खूप अधिक) कामना (इच्छा) व कामवासना; क्रोध म्हणजे अकारण येणारा राग; मोह म्हणजे मी-माझं-मला-माझ्यासाठी असा विचार व त्यातून निर्माण होणारी लोभाची नि असुरक्षिततेची भावना; मद म्हणजे आपल्याकडे इतरांपेक्षा निराळे किंवा अधिक प्रमाणात काहीतरी (धन, सत्ता, सामर्थ्य इ.) आहे नि मत्सर म्हणजे इतरांविषयी वाटणारा हेवा (जेलसी) नि त्यातून निर्माण होणारा द्वेष (हेट्रेड)! थोडक्यात अंधार निर्माण करणारी मोठी यंत्रणा किंवा रचना आपल्या मनाबुद्धीत नि स्वभावात आहे. याचं मूळ ज्या अहंकारात आहे त्याच्यावर चिंतनातून, आत्मपरीक्षणातून, उपासनेतून, शरणागतीतून प्रकाश टाकून तो दूर केला पाहिजे. यासाठी मार्गदर्शक हवा ज्याच्याकडे प्रार्थना करायची…तमसो मा ज्योतिर्गमय|
२. भास्वता ज्ञानदीपेन (नाशयामि) – भगवंत हा अंधार नष्ट करतो ते देवळातून येऊन, मूर्तीतून प्रकट होऊन, आकाशातून अवतरून अशा रीतीनं नाहीच. तर अंतर्यामीचा भगवंत, इंद्रियांचा स्वामी हृषिकेश किंवा आत्माराम आतूनच सर्वांच्या अंतःकरणात तेवत असलेल्या (भास्वता) ज्ञानदिव्यानं हा आतून निर्माण होऊन बाहेरचं जीवन ग्रासणारा अंधःकार नष्ट करतो. यासाठी जागा व्हायला आतला आवाज (इनर व्हॉइस) किंवा अंतर्दृष्टी (इनसाइट) किंवा अंतःस्फूर्ती (इन्स्पिरेशन) किंवा अंतःप्रेरणा (इंट्यूशन)! हे सारं शक्य आहे का? निश्चित शक्य आहे पण सध्याच्या संस्कारहीन कुटुंबपद्धतीत नाही अन् ‘घोका व ओका’ प्रकारच्या शिक्षणपद्धतीतही नाही. त्यासाठी लहान वयापासूनच द्यायला हवी जीवनशक्ती – जीवनदृष्टी नि नवी जीवनशैली! हे काम अर्थातच वडील मंडळींनी, ज्ञानी लोकांनी, अनुभवी व्यक्तींनी अन् नेते मंडळींनी करायला हवं. भगवंत हेच कार्य अर्जुनाच्या माध्यमातून आपल्यासाठी करताहेत. आपण त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. भगवंताची कृपा मिळवण्यासाठी नव्हे तर आपल्याच कल्याणासाठी. हा खरा ‘स्व-अर्थ (स्वार्थ)’ साधला पाहिजे. ‘सर्व-स्व’ समर्पण करायला शिकलं पाहिजे. यासाठी गीतेत सर्व प्रकारचं समुपदेशन आहेच
काही गोष्टींचा विकास साधायला पाहिजे.
* आत्मविश्‍वास – मी हे करू शकेन – मीच हे करू शकिन – मी हे करून दाखवीनच.
* स्वावलंबन – आर्थिक नव्हे तर निर्णय घेणं व त्यांची कार्यवाही करणं यासाठी.
* सद्विचार – सद्ग्रंथवाचन – सदाचरण – यातून निर्माण होणारी स्वानुभूती – स्वानुभव.
* सत्संग – चांगल्या व्यक्ती, चांगले विचार, चांगली ध्येयं (स्वप्नं), चांगलं वातावरण.
* नित्योपासना – बाहेरच्या पूजेअर्चेबरोबरच मानसपूजा, चिंतन, ध्यान, नामस्मरण यातून सद्गुरूंची कृपा किंवा अनुग्रह निश्चित होईल. ज्याला भगवंत म्हणतात ‘अनुकंपा’. दिव्यानं दिवा लावून दिवाळी साजरी तर सारेच करतात. आपण ‘अंतरीचा ज्ञानदिवा’ तेवत ठेवू या. अन् स्वतःला (इतरांना नव्हे) सांगत राहू या… आत्मदीपो भव॥

Leave a Reply